संभाजीनगरवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाम; एमआयएमला दिला इशारा | पुढारी

संभाजीनगरवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाम; एमआयएमला दिला इशारा

ठाणे; पुढारी वृत्तसेवा : औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर करण्यावरून आक्रमक झालेल्या एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इशारा दिला आहे. औरंगाबादचे नाव संभाजी नगर केल्यास कायदेशीर लढाई लढण्याबरोबरच रस्त्यावर उतरण्याचा इशारा देखील जलील यांनी दिला आहे. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार असो किंवा खासदार कोणालाही कायदा हातात घेता येणार नाही, कोणत्याही प्रकारचे सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होणार नाही यासाठी सरकार सक्षम असल्याचा इशाराच शिंदे यांनी एमआयएमला दिला आहे.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादचे संभाजीनगर असे नामकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात एकनाथ शिंदे यांचे सरकार आले असले तरी ठाकरे सरकारच्या या निर्णयाबाबत मात्र कोणत्याही प्रकारचा बदल करण्यात आलेला नाही. मात्र एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर करण्याला आपला विरोध दर्शवला आहे. कोणाच्या घराण्यासाठी औरंगाबादचे संभाजीनगर असे नामकरण करणे योग्य नसल्याची भूमिका जलील यांनी व्यक्त केली होती. आपला जन्म औरंगाबादमध्ये झाला असून मृत्युपत्रावर देखील औरंगाबादचेच नाव असेल असेही जलील यांनी म्हटले होते. जलील यांच्या भूमिकेबाबत मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कायदा कोणालाही हातात घेता येणार नाही, असा स्पष्ट इशारा दिला आहे. आमदार असो किंवा खासदार, कोणाला कायदाव्यवस्था बिघडवता येणार नाही. रस्त्यावर उतरण्याची भाषा कोणीही करू नये, यासंदर्भात चर्चा केली पाहिजे. चर्चेचे दरवाजे खुले आहेत, असे सांगत सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे हे सरकारचे कर्तव्य असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. शिंदे यांनी संभाजीनगर हे नाव कायम राहील याचेच संकेत आपल्या भूमिकेतून दिले आहेत. दरम्यान, या भूमिकेचे भाजपमधूनही स्वागत करण्यात आले आहे.

Back to top button