पुणे: पुढारी वृत्तसेवा; 'गेली तीन वर्षे सातत्याने स्वयंसेवी संस्था, ग्रामस्थ, ग्रामपंचायत आणि किर्लोस्कर कंपनीच्या कर्मचार्यांच्या मदतीने खाटपेवाडी येथील तलाव पुनरुज्जीवनाचे काम यशस्वी करून एक आदर्श प्रारूप उभे कले आहे,' अशी माहिती किर्लोस्कर वसुंधरा राम नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाचे समन्वयक वीरेंद्र चित्राव यांनी दिली. ड्रोनद्वारे नुकतेच या तलावाचे सर्वेक्षण करण्यात आले असून त्यातून हा निष्कर्ष पुढे आला आहे. सातत्य आणि चिकाटीने खाटपेवाडी तलावावर काम केल्याने या तलावाच्या पाण्याची क्षमता 45 टक्क्यांनी वाढली असल्याचे सर्वेक्षणानंतर लक्षात आले आहे.
खाटपेवाडीचा हा तलाव राम नदीच्या उगमक्षेत्रात असून किर्लोस्कर वसुंधरा राम नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाअंतर्गत तो तलाव दत्तक घेण्यात आला होता. 1972 साली पडलेल्या भीषण दुष्काळात हा मानवनिर्मित पाझर तलाव बांधण्यात आला होता. तेव्हापासून या तलावातील गाळ काढण्यात आलाच नव्हता. किर्लोस्कर वसुंधरा राम नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाअंतर्गत या तलावातून सुमारे 300 ट्रक गाळ काढण्यात आला. या पाझर तलावातील पाण्याची क्षमता वाढल्याने आजूबाजूच्या विहिरींंची पाण्याची क्षमता वाढली. त्यामुळे यंदाच्या उन्हाळ्यात रहिवाशांचे तुलनेने कमी हाल झाले. या सर्व कामात पर्यावरण क्षेत्रात काम करणार्या 12 संस्था, 33 महाविद्यालये, राम नदी परिसरातील 25 शाळा, तसेच किर्लोस्कर कंपनीच्या कर्मचार्यांच्या मदतीने हे काम उभे राहिले असल्याचे चित्राव यांनी यावेळी सांगितले.