नारायणगावचे पोस्ट ऑफिस लवकरच तळमजल्यावर; कोल्हे यांच्या प्रयत्नांना यश | पुढारी

नारायणगावचे पोस्ट ऑफिस लवकरच तळमजल्यावर; कोल्हे यांच्या प्रयत्नांना यश

नारायणगाव : पुढारी वृत्तसेवा: नारायणगाव ग्रामपंचायतीने पोस्ट ऑफिससाठी तळमजल्यावर जागा उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शविली आहे. त्यामुळे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या मागणीनुसार लवकरच नारायणगाव पोस्ट ऑफिस तळमजल्यावर स्थलांतरित करण्यात येणार आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना दिलासा मिळणार आहे. नारायणगाव येथील पोस्ट ऑफिस सध्या पहिल्या मजल्यावर सुरू आहे. ज्येष्ठ नागरिकांना त्याचा त्रास होतो. त्यामुळे हे पोस्ट ऑफिस तळमजल्यावर स्थलांतरित करण्याची मागणी ज्येष्ठ नागरिकांकडून केली जात होती. खासदार कोल्हे यांनी त्याची दखल घेत केंद्रीय दूरसंचारमंत्री अश्विनी वैष्णव आणि पुणे ग्रामीण पोस्टचे वरिष्ठ अधीक्षक गोपाराजू सतीश यांना पत्र पाठविले होते.

त्यात ज्येष्ठ नागरिकांची अडचण विचारात घेऊन सर्वच ठिकाणची पोस्ट ऑफिस तळमजल्यावर असावीत यासाठी धोरणात्मक निर्णय घेण्याची सूचना केली. खासदार डॉ. कोल्हे यांच्या मागणीची तत्काळ दखल घेत पुणे ग्रामीण पोस्टचे अधीक्षक बी. पी. एरंडे यांनी तळमजल्यावरील पर्यायी जागेसाठी वारूळवाडी व नारायणगाव ग्रामपंचायतीकडे मागणी केली. त्यानुसार नारायणगाव ग्रामपंचायतीने तळमजल्यावर 1274 चौ. मी. जागा पोस्ट ऑफिससाठी देण्याची तयारी दर्शविली.

पोस्ट ऑफिसच्या कार्यालयीन कामकाजाच्या दृष्टीने या जागेत आवश्यक बदल करून घेतल्यानंतर सध्याचे पोस्ट ऑफिस नव्या इमारतीत तळमजल्यावर स्थलांतरित करण्यात येणार असल्याचे अधीक्षक एरंडे यांनी कळविले आहे. या संदर्भात खासदार कोल्हे म्हणाले की, नारायणगाव पोस्ट ऑफिस पहिल्या मजल्यावर असल्याने मुदत ठेव, पेन्शन, पीपीएफ आदी कामांसाठी जाणार्‍या ज्येष्ठ नागरिकांना खूपच त्रास होतो. याबाबत तक्रार येताच त्वरीत पत्रव्यवहार केला. त्याला यश आले असून लवकरच हे पोस्ट ऑफिस तळमजल्यावर स्थलांतरित होईल.

Back to top button