औरंगाबाद : रेल्वेच्या धडकेत रिक्षाचालकाचा मृत्यू | पुढारी

औरंगाबाद : रेल्वेच्या धडकेत रिक्षाचालकाचा मृत्यू

करमाड, पुढारी वृत्तसेवा : रेल्वेच्या धडकेत रिक्षाचालकाचा मृत्यू झाला. ही घटना औरंगाबाद तालुक्यातील कुंभेफळ शिवारात
शुक्रवारी (दि. 1) सकाळी साडेनऊच्या सुमारास घडली. शेख सजन शेख बुढण (वय 53, रा. खाजानगर, देवळाई, औरंगाबाद) असे मृताचे
नाव आहे.

करमाड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कुंभेफळ शिवारात औरंगाबाद ते जालना जाणार्‍या रेल्वे स्टोन क्रमांक 131/7 जवळ एकाला रेल्वेने धडक झाल्याची माहिती मिळाली होती. घटनास्थळी तत्काळ जाऊन पाहणी केली असता अंदाजे 50 ते 53 वयाची व्यक्‍ती गंभीर जखमी अवस्थेत आढळले. तर रस्त्याच्या कडेला एक रिक्षा उभी असल्याचे निदर्शनास आले.

घटनास्थळी असलेल्यांना विचारपूस केली असता सदरील व्यक्‍ती रिक्षा घेऊन येथे आला असल्याची प्राथमिक माहिती मिळाली. चौकशीत मृताचे नाव शेख सजन शेख बुढण असून, औरंगाबाद येथील देवळाई परिसरातील खाजानगरचा रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले. मृताच्या नातेवाईकांसोबत संपर्क साधून घटनास्थळी पाचारण करण्यात आले. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार घरात वाद सुरू असल्याची प्राथमिक माहिती समजली.

या प्रकरणी करमाड पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास सहायक पोलिस निरीक्षक राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार संदीप जाधव, अनिल गायकवाड, दादाराव पवार हे करीत आहेत.

हेही वाचलंत का? 

Back to top button