

खडकवासला : पुढारी वृत्तसेवा: महापालिकेच्या नवीन प्रभागाच्या प्रारूप मतदार याद्यांत चुकीच्या मतदारांचा समावेश केल्याने सावळागोंधळ उडाला. निवडणूक विभागाने तयार केलेली प्रभागाची भौगोलिक रचना न पाहता अधिकार्यांनी मनमानीपणे प्रभागाच्या मतदार याद्या तयार केल्याचे गंभीर चित्र पुढे आले आहे. एका प्रभागात एक लाखाहून अधिक, तर काही प्रभागांत पन्नास हजारांहून कमी मतदार आहेत. एका कुटुंबातील काही एका, तर काही नावे दुसर्या प्रभागात समाविष्ट करण्यात आली आहेत. चुकीच्या मतदार याद्यांमुळे इच्छुक उमेदवारांची धावपळ उडाली आहे.
धायरी-आंबेगाव प्रभाग 54 च्या यादीत सर्वाधिक चुका आहेत. प्रभागाची लोकसंख्या 64 असताना मतदार यादीत एक लाख चार मतदार आहेत. शेजारच्या खडकवासला धायरी प्रभाग क्रमांक 53, वडगाव पाचगाव प्रभाग क्रमांक 55 व 58 या तिन्ही प्रभागांतील मतदार प्रभाग 54 मध्ये समावेश करण्यात आले. अशीच स्थिती शिवणे, उत्तमनगर भागातील प्रभागांत आहे. मतदार यादीतील सावळागोंधळ चव्हाट्यावर आल्यानंतर कार्यकर्त्यांनी हरकती नोंदविण्यासाठी धाव घेतली.
राष्ट्रसेवा समूहाचे अध्यक्ष राहुल पोकळे म्हणाले की, भौगोलिक रचनेनुसार सुधारित मतदार यादी तयार करावी. खडकवासला भाजप ओबीसी आघाडीचे अध्यक्ष अतुल चाकणकर म्हणाले की, त्यांच्या कुटुंबातील दोन नावे धायरी प्रभागात, तर आठ नावे नांदेड सनसिटी प्रभागात गेली आहेत. जिल्हा परिषद सदस्या अनिता इंगळे म्हणाल्या की, शिवणे प्रभागाच्या मतदार यादीत कोथरूड, हॅपी होम कॉलनी आदी ठिकाणचे मतदार आहेत. महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी शहराध्यक्षा स्वाती पोकळे म्हणाल्या, "बहुतांश प्रभागाच्या मतदार यादीत हद्दीबाहेरचे मतदार आहेत. खडकवासला धायरी प्रभागातील मतदार कमी केले आहेत.