सांगली: मांत्रिकाला घेऊन पोलिस सोलापूरला

सांगली;पुढारी वृत्तसेवा: म्हैसाळ (ता. मिरज) येथील नऊ जणांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या आब्बास बागवान याला घेऊन पोलिसांचे पथक शुक्रवारी सोलापूरला रवाना झाले आहे. तेथील जेलरोड पोलिसांची मदत घेऊन पथकाने बागवानच्या
घरावर तसेच आणखी काही ठिकाणी छापे टाकले. हत्याकांडप्रकरणी महत्वाचे धागेदोरे हाती लागल आहेत.
म्हैसाळ येथे दि. 20 जून रोजी वनमोरे कुटुंबातील नऊ जणांचे मृतदेह आढळून आले होते. कर्जास कंटाळून वनमोरे कुटुंबाने आत्महत्या केल्याचे सुरुवातीला दिसून आले. दरम्यानच्या काळात पोलिसांनी कुटुंबातील नऊ जणांचे मोबाईल ‘कॉल डिटेल्स’काढले. मांत्रिक व गुप्तधानाचा मुद्दा तपासातून पुढे आला होता. मांत्रिक आब्बास मुल्ला व त्याचा साथीदार धीरज सुरवशे या दोघांची नावे निष्पन्न झाली.
चार दिवसांपूर्वी दोघांना सोलापुरातून अटक करण्यात आली. सध्या दोघेही पोलिस कोठडीत आहेत. त्यांची कसून चौकशी केली जात आहे. पोलिस उपअधीक्षक अशोक वीरकर यांचे पथक शुक्रवारी बागवानला घेऊन सोलापूरला रवाना झाले. त्याला अटक होताच त्याचे कुटुंब घराला कुलूप लावून पसार झाले आहे. या पथकाने सोलापुरातील जेलरोड पोलिसांची मदत घेऊन घराचे कुलूप काढून झडती घेतली. दोन तास घर झडती सुरू होती. यामध्ये महत्वाचे धागेदोरे हाती लागले आहेत. सूरवशे याच्या घराचीही झडती घेण्यात आली.
बागवान हा पोलिसांच्या चौकशीला काहीच प्रतिसाद देत नसल्याचे चित्र आहे. ‘तो मी नाहीच’, असा त्याने पावित्रा घेतला आहे. नऊ जणांच्या मृतदेहाच्या विच्छेदन तपासणीचा अहवालही अजून आलेला नाही. तो अहवाल आल्यानंतर तपासाला आणखी गती मिळणार आहे. बागवानने कशातून विषप्रयोग केला? याचा उलघडा होणार आहे.