पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात एकूण 71 घोषित व अघोषित झोपडपट्ट्या आहेत. झोपडपट्टीतील रहिवाशांसाठी महापालिका 1 लाख रुपयांचा अपघाती आरोग्य विमा योजना राबवित आहे. या झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभागाच्या प्रस्तावास आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी मंगळवारी (दि.28) मंजुरी दिली.
शहरात सन 2002 झालेल्या सर्वेक्षणानुसार 71 झोपडपट्टया अस्तित्वात आहेत. त्यातील निवासी, बिगर निवासी व मिश्र असे नियमित सेवाशुल्क भरणारे झोपडीधारकांकडून आतापर्यंत एकूण 4 कोटी 65 लाख 42 हजार 669 रूपयांचा सेवाशुल्क भरणा करण्यात आला आहे. तर, 14 कोटी 68 लाख 52 हजार 174 इतकी थकबाकी आहे. सेवाशुल्क भरण्यास रहिवाशी प्रतिसाद देत नसल्याचे चित्र आहे. सेवाशुल्क वसुल करण्यासाठी अपघाती विमा योजना लागू केल्यास रहिवाशी पुढे येतील. त्याचा पालिकेस फायदा होईल, असा दावा संबंधित विभागाने केला आहे. त्यासाठी विमा योजनेचा घाट घालण्यात आला आहे.
झोपडीधारकांसाठी ही विमा योजना असणार आहे. त्यासाठी 18 ते 70 अशी वयोमर्यादा आहे. तीन महिन्यांच्या आत सेवाशुल्क तसेच, संपूर्ण थकबाकी भरल्यास विम्याचा लाभ मिळणार आहे. या योजनेत अपघातामध्ये निधन झाल्यास वारसाला 1 लाख आर्थिक मदत मिळणार आहेत.