दावडी गावात पडला 50 कोटींचा पाऊस? | पुढारी

दावडी गावात पडला 50 कोटींचा पाऊस?

डोंबिवली : पुढारी वृत्तसेवा :  भारतात आजही शहरी तसेच ग्रामीण भागात अंधश्रद्धेला कित्येकजण बळी पडत आहेत. भ्रामक भुलय्यांना तथाकथिक सुशिक्षत अशा भोंदूबाबांकडून दिवसाढवळ्या फसले जात आहेत. अशीच घटना सुशिक्षितांच्या सांस्कृतिक नगरीत उघडकीस आली आहे. 50 कोटींच्या पैशांचा पाऊस पाडतो, असे सांगून डोंबिवलीजवळच्या दावडी गावातल्या बिल्डरला भोंदूबाबानी चक्क 56 लाखांचा गंडा घातला आहे.

चोळेगाव-ठाकुर्लीतील अनुसया बिल्डींगमध्ये राहणारे सुरेंद्र पांडुरंग पाटील (51) यांनी या संदर्भात मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सुरेंद्र पाटील हे व्यवसायाने बिल्डर आहेत. त्यांचे कल्याण-शीळ मार्गावरील दावडी गावात असलेल्या पाटीदार भवनजवळच्या सेंट जॉन हायस्कूलसमोर श्री एकविरा स्वप्ननगरी बिल्डींग नं. 3 मध्ये कार्यालय आहे. बिल्डर सुरेंद्र पाटील यांच्या संपर्कात काही लोक आले. तुमची आर्थिक भरभराट करून घ्यायची असेल तर आम्ही पैशांचा पाऊस पाडतो. तुम्ही 56 लाख रुपये खर्च केले तर 50 कोटी रुपये नोटांचा पाऊस पाडून दाखवू, असे बुवाबाजी करणार्‍या एका टोळक्याने बिल्डर सुरेंद्र पाटील यांना सांगितले. या बिल्डरने बुवांच्या बोलण्यावर विश्वास ठेऊन 56 लाख रुपयांची तजवीज करून घरात 50 कोटी रुपयांचा पाऊस पाडण्यासाठी पुजा-पाठासाठी चार ढोंगी बुवांना घरात घेतले. या बुवांनी विकासकाला गुंगी तंत्राचा अवलंब करून मोहीत केले आणि पूजेच्या नावाखाली विकासकाच्या कार्यालयातील 56 लाख रुपयांची रोख रक्कम गोड बोलून लुटून नेली.

गेल्या महिन्यात बिल्डर सुरेंद्र पाटील यांना महेश नावाच्या बुवाने संपर्क करून आपल्याकडे पैशाचा पाऊस पाडणारी काही माणसे असल्याचे सांगितले. या बोलण्यावर त्यांनी विश्वास ठेवला होता. अशोक शंकर गायकवाड (रा. रामचंद्रनगर, कामगार रुग्णालयाजवळ, वागळे इस्टेट, ठाणे) याची ओळख महेश याने बिल्डर पाटील यांच्याशी करून दिली. अशोक हा नियमितपणे सुरेंद्र पाटील यांच्या कार्यालयात येत-जात होता. अशोकने आपला परिचित रमेश मोकळे (रा. कसारा) पैशांचा पाऊस पाडतो, असे सांगून गणेश यासाठी मदत करतील, असे सांगितले होते. या सगळ्यांना भुलून पाटील यांनी विश्‍वास ठेवला होता.

गणेश या ढोंगी बुवाने बिल्डर पाटील यांना 56 लाख रुपये खर्च केले तर त्यानंतर 50 कोटी रुपये नोटांचा पाऊस पडेल, असे सांगितले. पाटील यांनी या टोळक्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवत 56 लाख रुपयांची तजवीज केली. गणेशने पूजा साहित्याची यादी पाटील यांना दिली. शनिवारी सकाळी दावडी गावातल्या पाटीदार भवन जवळील कार्यालयात बिल्डर पाटील यांना पूजेसाठी येण्यास सांगितले.

पहाटे पाटील आणि त्यांचा चालक आशीष शर्मा हा सकाळी साडेपाच वाजता पोहोचला. गणेश, शर्मा गुरुजी, अशोक गायकवाड कार्यालयात उपस्थित होते. कार्यालयावर असलेल्या पाटील यांच्या घरात बाबांनी पूजा मांडली. 56 लाखांच्या रोकडचा बटवा कुठे ठेवला आहे याची खात्री या बुवांनी पाटील यांच्याकडून करून घेतली. ही पूजा सव्वाआठ वाजता संपली.

गणेश व शर्मा गुरुजींनी बिल्डर पाटील यांना बाजूच्या खोलीत ध्यानमग्न होऊन दिलेल्या मंत्रांचा जप करण्यास सांगितले. पाटील जपाला बसताच या टोळक्याने पाटील यांनी मुलीच्या बेडरूममधे ठेवलेली 56 लाखांची रोकड असलेली पुरचंडी गुपचूप काढून घेतली. इमारतीखाली जाऊन पूजा-विधी करतो आणि प्रदक्षिणा मारून येतो, असे सांगून गेलेल्या भोंदूबाबांनी तेथून पळ काढला.

दोघे संशयित ताब्यात, अंधश्रद्धा कायद्यानुसार कारवाई

बराच उशीर झाला तरी गुरूजी पूजेच्या ठिकाणी येत नाहीत, तर अशोकही तेथे आढळून आला नाही म्हणून सुरेंद्र पाटील यांनी परिसरात शोध घेतला. मात्र ते कुठेही आढळून आले नाहीत. पाटील यांनी घरात येऊन पाहिले तर 56 लाखांची रोकड असलेली पुरचंडी गायब झाली होती. फसगत झालेल्या बिल्डर सुरेंद्र पाटील यांनी मानपाडा पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी भादंवि कलम 420, 406, 34 सह महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष, अनिष्ट आणि अघोरी कृत्यांना प्रतिबंध/निर्मूलन व काळी जादू अधिनियम 2013 चे कलम 3 अन्वये गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आतापर्यंत दोघा संशयितांना ताब्यात घेतले आहे.

Back to top button