सातारा : मृतदेहांची चिरफाड करताना हात थरथरायचे, पाय लटपटायचे ! | पुढारी

सातारा : मृतदेहांची चिरफाड करताना हात थरथरायचे, पाय लटपटायचे !

सातारा : विशाल गुजर
शवविच्छेदन गृहाकडे जायचे म्हटले तरी अनेकांना कापरं भरतं, जीव नकोसा होतो, मग मृतदेहाची चिरफाड करणे तर लांबच. पण आम्ही आयुष्याची 15 वर्षे शवविच्छेदन गृहात बेडरपणे हे काम करतोय. सुरूवातीला मृतदेहांची चिरफाड करताना अंगावर शहारे यायचे, हात थरथरायचे, पाय लटपटायचे, भिती वाटायची पण नंतर मात्र हे काम ड्युटीचाच एक भाग बनला. सेवा म्हणूनच हे काम आता इमानेइतबारे करत असताना कधीकधी काळजावर दगडही ठेवावा लागतो, हे सांगताना विश्‍वास माने आणि शंकर शिंदे यांनी आपल्या अनोख्या सेवाकार्याचा उलगडा केला. या जोडगोळीने आत्तापर्यंत 978 मृतदेहांची चिरफाड केली असून त्यांचे अनुभव अंगावर शहारे आणणारे आहेत.

शवविच्छेदनगृहात मृतदेहाला स्पर्श करायचे म्हटले तरी भल्याभल्यांची बोबडी वळते. मात्र, सिव्हील हॉस्पिटलमधील विश्‍वास माने व शंकर शिंदे ही जोडगोळी मृतदेहांची चिरफाड करण्यात आता पारंगत झाली आहे. विश्‍वास यांनी 570 तर शंकर शिंदे यांनी 408 मृतदेहांचे शवविच्छेदन केले आहे. माने हे अनुभवी असून त्यांचा शवविच्छेदन करण्याचा पहिला अनुभव अंगावर काटे आणणारा होता.
सिव्हिलच्या वॉर्डमध्ये काम करणे वेगळे आणि शवविच्छेदन गृहात काम करणे वेगळे. येथे मृतदेहांची चिरफाड करावी लागते. सुरूवातीच्या काळात मन चलबिचल झाले. पण ड्युटीतर करावीच लागणार. त्यामुळे हे काम हाती घ्यावे लागले. सुरूवातीला मृतदेहांची चिरफाड करायची वेळ आली तेव्हा अंगावर काटा आला, मनात भितीही वाटली. पण हे करणे भागच होते असे सांगून विश्‍वास माने यांनी आपला शवविच्छेदनाचा पहिला अनुभव कथन केला. ते म्हणाले, कामाच्या पहिल्याच दिवशी एका वृद्धाचा मृतदेह टेबलवर ठेवण्यात आला होता. शेजारी उभ्या असलेल्या डॉक्टरांच्या सांगण्यानुसार हे काम करत होतो. मृतदेहाच्या अंगातून मोठया प्रमाणात रक्‍तस्त्राव होवू लागला. ते पाहून घाबरून गेलो. त्यावेळी डॉक्टरांनी मला धीर दिला. मृतदेहाच्या डोक्याला जखम झाली होती. त्यामुळे त्या मृत वृद्धाच्या डोक्याची कवटी फोडायची होती. पण माझे धारिष्ट्य होत नव्हते. डोळे झाकून त्या मृत वृध्दाच्या डोक्यावर हातोडा घातला अन् अक्षरश: ठिकर्‍या उडाल्या, हे सांगताना विश्‍वास माने काहीसे भावूकही झाले होते.

शंकर शिंदे यांचेही अनुभव थरारक आहेत. ते म्हणाले, मृतदेहाच्या चिरफाडीचा पहिला अनुभव भेदरवून टाकणारा होता. मृतदेहाच्या पोटामध्ये विष होते. ते शरीरात कुठपर्यंत भिनलं आहे, हे पाहायचं होतं. त्यासाठी मला पोट फाडण्यास सांगण्यात आले. जेव्हा मी पोट फाडले त्यावेळी क्षणभर मला भोवळ आली. परंतु, आता त्यात आम्ही तरबेज झालोय. कोणतीही भीती वाटत नसल्याचे शंकर शिंदे यांनी सांगितले.

प्रत्येक अवयव वेगळा करावा लागतो…

शवविच्छेदन करताना मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे पाहण्यासाठी प्रत्येक अवयव आम्हाला वेगळा करावा लागतो. बरणीमध्ये हे अवयव ठेवले जातात. त्यानंतर पुढील तपासणीसाठी प्रयोगशाळेत पुणे येथे पाठवले जातात. त्याच्या अहवाल आल्यानंतर संबंधित व्यक्तीचा कसा झाला हे समजत असल्याचे विश्‍वास माने व शंकर शिंदे यांनी सांगितले.

 

शवविच्छेदन करत असल्याचे कुटूंबियांना समजल्यानंतर त्यांनी विरोध केला. पण जे काम स्वीकारलंय ते केलेच पाहिजे हे घरातल्यांना पटवून दिलं. त्यामुळे त्यांचा विरोध मावळला. आता घरातल्यांना याची सवय झालीय.
-विश्‍वास माने
शवविच्छेदन कर्मचारी

जिवलग मित्राचे शवविच्छेदन करताना मन गलबलून गेले

जिल्हयात कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने थैमान घातले होते. त्यावेळी माझ्या लहान भावाप्रमाणे असणार्‍या जीवलग मित्राचा आजारपणामुळे मृत्यू झाला होता. त्याला सिव्हिलमध्ये शवविच्छेदनास आणण्यात आले. दुर्दैवाने मीच कामावर असल्यामुळे मित्राचे शवविच्छेदन मलाच करण्याची वेळ आली. पहिले शवविच्छेदन करताना ज्याप्रमाणे हात थरथरत होते, मृतदेहाकडे पहावेसे वाटत नव्हते, हात लावायला मन धजावत नव्हते, तशी माझी अवस्था झाली. शवविच्छेदन करण्यास सुरुवात करताना मनस्थिती होत नसल्याने दोन वेळा बाहेर जावून आलो. मात्र, तिसर्‍या वेळी आपले काम आहे आणि ते करावेच लागेल ही मानसिकता ठेवून शवविच्छेदन केले. ज्या जिवलग मित्रासोबत मैत्रीचे अनेक किस्से रंगवले होते त्याच मित्राच्या मृतदेहाची चिरफाड करताना मन गलबलून गेलं हे सांगताना विश्‍वास माने यांचे डोळे पाणावले.

त्यांची मला खूप काळजी वाटते : लता माने

मला व घरातील लोकांना ज्यावेळी कळले कि माझे पती मृतदेहाचे शवविच्छेदन करण्याचे काम करत आहेत. त्यावेळी आम्ही सर्वानीच त्याला विरोध केला. त्यावेळी त्यांनी आम्हाला समजवण्याचे काम केले. हे काम ही एक सेवा व जबाबदारी आहे, हे त्यांनी आम्हाला पटवून दिले. तेव्हा मात्र आमचा विरोध मावळला. मात्र, आजही खूप काळजी वाटते, त्यांना आरोग्याचा थोडाही त्रास झाला तरी लगेचच डॉक्टरांकडे घेऊन जात असल्याचे शवविच्छेदन करणार्‍या विश्‍वास माने यांच्या पत्नी लता माने यांनी सांगितले.

Back to top button