दत्तवाड (कोल्हापूर); पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याचे कारण पुढे करत कर्नाटक शासनाच्या वतीने महाराष्ट्राच्या सीमा बंद करण्याचे काम सुरू आहे. याच अनुषंगाने दतवाड-सदलगा हा मार्ग बंद करण्याचा प्रयत्न कर्नाटक शासनाचे कर्मचारी करीत होते.
पूरग्रस्त नागरिकांची कोणती ही विनंतीला ते जुमानत नसल्याने अखेर संतापलेल्या दोन्ही भागाकडे नागरिकांनी बंद केलेला रस्ता पुन्हा खुला केला.
दत्तवाड परिसरातील अनेक पूरग्रस्त नागरिक भागात आलेल्या महापुरामुळे कर्नाटकातील आपल्या नातेवाईकाकडे जनावरासहित स्थलांतरित झाले होते. महापूर जसजसे ओसरत जाईल तसतसे हे पूरग्रस्त नागरिक आपली घरे व जनावरांचे गोठे स्वच्छ करून पुन्हा आपली गावी परतत आहेत.
दानवाड एकसंबा, दत्तवाड एकसंबा, दतवाड मलिकवाड, घोसरवाड सदलगा हे सर्व बंधारे अद्याप पाण्याखाली आहेत. त्यामुळे कर्नाटकात जाण्यासाठी दत्तवाड-सदलगा हा एकच मार्ग जवळचा सुरू होता त्यामुळे या मार्गावरून स्थलांतरित झालेले नागरिक परतत होते.
पण अचानक कर्नाटक शासनाच्या वतीने आज (दि. २) दुपारी चार वाजता दत्तवाड सदलगा फुलावर मोठमोठे दगड टाकून व काटेरी झुडपे लावून कर्नाटक शासनाचे कर्मचारी रस्ता बंद करत होते.
दोन्ही भागाकडील नागरिक त्यांना विनंती करत होते की आमची जनावरे व घरातील व्यक्ती अद्याप कर्नाटकात आहेत. त्यामुळे रस्ता किमान आणखी दोन-तीन दिवस तरी सुरू ठेवावा. पण हे कर्मचारी कशालाच दाद देत नव्हते. आम्ही आमच्या वरिष्ठांच्या आदेशाचे पालन करीत असल्याचे ते सांगत होते.
नागरिकांनी हुज्जत घातली तरी त्याला कर्नाटकचे अधिकारी कसलीही दाद देत नव्हते. त्यामुळे संतापलेल्या दोन्ही भागाकडे नागरिकांनी कर्मचारी रस्ता बंद करून गेल्यानंतर सर्व काटेरी झुडपे व दगडे काढून टाकून रस्ता सुरू केला.
महाराष्ट्र कर्नाटक शासनाच्या नेतेमंडळींनी सद्यस्थितीतील महापूराची समस्या लक्षात घेता सदर मार्ग सुरू ठेवावा अशी दोन्ही भागाकडे नागरिकांतून मागणी होत आहे.