कालौघात ‘ही’ फळे झाली गायब! | पुढारी

कालौघात ‘ही’ फळे झाली गायब!

लंडन : जगातून पशुपक्ष्यांच्या काही प्रजाती नामशेष होत असतात. काही फळेही आता या जगातून अशीच नामशेष झालेली आहेत. त्यामध्येच अ‍ॅन्सॉल्ट पिअर आणि तालियाफेरो सफरचंद या फळांचा समावेश होतो. विशेष म्हणजे एके काळी ही फळे अतिशय लोकप्रिय होती.

अ‍ॅन्सॉल्ट पिअर हे सामान्यपणे मिळणार्‍या पिअर फळापेक्षा थोडे वेगळे होते. सन 1863 मध्ये फ्रान्सच्या अँजर्स येथे प्रथम त्याची लागवड करण्यात आली. या फळातील मऊ व स्वादिष्ट गर, गोड चव आणि सुगंध यामुळे ते इतरांपेक्षा वेगळे ठरले. त्याला त्यावेळी ‘सर्वोत्कृष्ट चवीचे फळ’ म्हणून ओळखले जाऊ लागले. 1917 च्या ‘द पिअर्स ऑफ न्यूयॉर्क’ या पुस्तकात हेन्ड्रिकने त्याचे बरेच कौतुक केले आहे. त्याचे वर्णन ‘बटरी’ अशा शब्दात करण्यात आले आहे.

मात्र, जसजसे व्यावसायिक शेतीची वाढ झाली तसे या लोण्यासारख्या फळाच्या लागवडीकडे दुर्लक्ष होत गेले. अन्य पिअरच्या तुलनेत या प्रकाराला जागा आणि वेळ अधिक लागत असे. त्यामुळे शेतकर्‍यांनी त्याकडे दुर्लक्ष करून उत्पन्नासाठी अन्य फळांना प्राधान्य दिले. हळूहळू अ‍ॅन्सॉल्ट पिअर बाजारातून दिसेनासे झाले आणि विसाव्या शतकाच्या सुरुवातीस ते गायब झाले! असेच आणखी एक गायब झालेले फळ म्हणजे तालियाफेरो सफरचंद.

थॉमस जेफरसनने अमेरिकेत मोंटिसेलो येथे या प्रकाराच्या सफरचंदांची लागवड केली. सन 1814 मध्ये आपल्या नातवाला लिहिलेल्या पत्रात त्यांनी या फळाचा उल्लेख केला होता. त्यांनी म्हटले आहे की हे फळ लहान असले तरी त्याची चव अतिशय उत्कृष्ट आहे. असे मानले जाते की हे तालियाफेरो सफरचंद मूळ बागेसह हरवले आणि ते परत कुणालाही मिळाले नाही! मात्र अजूनही या सफरचंदाची जात सापडेल अशी आशा अनेकजण बाळगून आहेत.

Back to top button