Gold Rate Today : सोन्याला झळाळी! ५० हजारांच्या पार, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटचा दर | पुढारी

Gold Rate Today : सोन्याला झळाळी! ५० हजारांच्या पार, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटचा दर

पुढारी ऑनलाईन डेस्क

सराफा बाजारात सोन्याने ५० हजारांचा टप्पा पार केला आहे. आज शुक्रवारी (दि.१८) शुद्ध सोन्याचा प्रति १० ग्रॅम दर ५०,२१४ रुपयांवर पोहोचला. सोन्यासह चांदीही महागली आहे. चांदीचा प्रति किलो दर ६४,१३३ रुपयांवर गेला आहे.

इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या माहितीनुसार, आज शुक्रवारी २४ कॅरेट सोने ५०,२१४ रुपये, २३ कॅरेट ५०,०१३ रुपये, २२ कॅरेट ४५,९९६ रुपये, १८ कॅरेट सोने ३७,६६१ रुपये आणि १४ कॅरेट सोन्याचा दर २९,३७५ रुपये होता. चांदीचा दर प्रति किलो ६४,१३३ रुपयांवर पोहोचला आहे. (हे दुपारपर्यंतचे अपडेटेड दर असून त्यात बदल होऊ शकतो)

काल गुरुवारी (दि.१७) शुद्ध सोन्याचा दर ४९,९६८ रुपयांवर खुला झाला होता. त्यानंतर हा दर ५०,१०९ रुपयांवर जाऊन बंद झाला होता. त्यात आज पुन्हा तेजी दिसून आली.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोने तेजीत

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. यामुळे देशांतर्गत बाजारातही सोन्याला झळाळी मिळत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा दर १,८७६ डॉलर प्रति औंसवर पोहोचला आहे. तर चांदीचा दर २३.५८ डॉलर प्रति औंसवर आहे. (१ औंस म्हणजे २८.३५ ग्रॅम, १ तोळा म्हणजे १० ग्रॅम)

तीन वर्षापूर्वी सोन्याच्या दराने ५६,२०० रुपयांपर्यंत उसळी घेत उच्चांक गाठला होता. पण २०२१ मधील ऑगस्टमध्ये सोने ४८ हजार रुपयांवर आले. त्यानंतर पुन्हा आता २०२२ मध्ये सोन्याने ५० हजारांचा टप्पा पार केला आहे.

शुद्ध सोने कसे ओळखाल?

सराफा बाजारात २४ कॅरेट सोने सर्वांत शुद्ध सोने समजले जाते. मात्र दागिने बनविण्यासाठी २२ कॅरेट सोन्याचा वापर केला जातो. त्यात ९१.६६ टक्के सोने असते. दागिन्यांच्या शुद्धतेसाठी हॉलमार्क संबंधित ५ चिन्हे असतात. २४ कॅरेट सोन्यावर ९९९, जर २२ कॅरेट सोन्याचा दागिना असेल तर त्यावर ९१६, २१ कॅरेट दागिन्यावर ८७५ आणि १८ कॅरेट सोन्याच्या दागिन्यावर ७५० असे लिहिलेले असते. जर दागिना १४ कॅरेटचा असेल तर त्यावर ५८५ असे लिहिलेले असते.

Back to top button