सत्तांतरानंतर उद्धव ठाकरेंच्या विदर्भातील पहिल्याच सभेची उत्सुकता

सत्तांतरानंतर उद्धव ठाकरेंच्या विदर्भातील पहिल्याच सभेची उत्सुकता
Published on
Updated on

बुलढाणा, पुढारी वृत्तसेवा : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची शेतकरी संवाद यात्रेची विदर्भातील पहिलीच भव्य जाहीर सभा बुलढाणा जिल्ह्यातील चिखली शहरात आज (दि. २६) होत आहे. ठाकरे यांच्या सत्तांतराला कारणीभूत ठरलेल्या बंडामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील दोन आमदार व एक खासदार सामील असल्याने चिखली येथील सभा राजकीयदृष्ट्या महत्वाची मानली जात आहे. या सभेत उद्धव ठाकरेंची तोफ कोणावर धडाडणार, कोणत्या विचारांची मशाल पेटणार?, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

शिवसेनेचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड व मेहकरचे आमदार संजय रायमूलकर आणि खासदार प्रतापराव जाधव अशा तीन लोकप्रतिनिधींनी शिंदे गटाची वाट धरलेली आहे. मात्र, बुलढाणा जिल्ह्यात अलिकडेच युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे व विरोधीपक्षनेते अंबादास दानवे या नेत्यांच्या सभांना मिळालेला मोठा प्रतिसाद पाहता जिल्ह्यात शिवसेनेचे लोकप्रतिनिधी दुस-या बाजूला गेले असले, तरी मूळ शिवसेनेचा जनाधार कायम असल्याचे दिसून आला आहे. बंडखोर आमदारांच्या बुलढाणा व मेहकर या दोन्ही मतदारसंघांच्या केंद्रस्थानी असलेले चिखली शहर हा भाजपचा बालेकिल्ला आहे. जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाणी आहे. चिखली मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे प्राबल्य नसतानाही शक्तिप्रदर्शन करत भाजपला डिवचण्याची ठाकरे गटाची ही खेळी असल्याचे सांगण्यात येते.

चिखली येथील जाहीर सभेत एक लाखांवर शिवसैनिकांची उपस्थिती राहील, असा दावा आयोजकांनी केला आहे. ही सभा यशस्वी होण्यासाठी शिवसेनेच्या मुंबईतील नेत्यांनीही जातीने लक्ष घातले आहे. उद्धव ठाकरे हे चिखलीच्या सभेत शेतकरी संवाद यात्रेच्या निमित्ताने शेतक-यांच्या विविध प्रश्नांवर शिंदे-फडणवीस सरकारला लक्ष्य करतील. त्याचबरोबर जिल्ह्यातील तीनही बंडखोर नेत्यांवर टीकेची झोड उठवत चांगलेच धारेवर धरतील, असा कयास लावला जात आहे. राज्यपालांचे शिवरायांबाबतचे वक्तव्य, रामदेव बाबा यांचे महिलांविषयीचे वक्तव्य, बोम्मई यांचे महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावर वक्तव्य आदी मुद्दयांचा समाचार उद्धव ठाकरे आपल्या भाषणातून घेतील. परंतू राज्याच्या राजकारणात काही नवी समीकरणे आकाराला येण्याविषयीचे संकेत त्यांच्या भाषणातून मिळतील काय? याकडे सर्वांचे लक्ष आहे. विदर्भात शिवसेनेची 'मशाल' पेटवण्यासाठी शिवसैनिकांमध्ये ठाकरे कोणती ऊर्जा भरतात ?, हेही पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सभा शिवसेना ठाकरे गटाची, महाविकास आघाडीची नाही

चिखली येथील सभा शिवसेनेची आहे, महाविकास आघाडीची नाही, असे खासदार अरविंद सावंत यांनी शुक्रवारी चिखलीतील सभास्थळी पत्रकारांशी बोलताना सांगितले होते. या जिल्ह्यात 'गद्दार' जास्त असल्याने उद्धवजींची येथील सभा 'धारदार' होणार असल्याचे खा. सावंत यांनी म्हटले आहे. उद्धव ठाकरे व वंचित बहूजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यात‌ही एकत्र येण्याबाबच चर्चा झाल्याचे समजते. दरम्यान शनिवारी सकाळी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी उद्धव ठाकरे यांच्या सभास्थळाला भेट देऊन पाहणी केली आहे.

हेही वाचलंत का ? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news