

पुणे; पुढारी वृत्तसेवा: शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना बघून शिवसेनेत आलो. त्यामुळे उद्धव ठाकरे काही बोलले तरी त्यावर न बोलण्याचा मी निर्णय घेतला होता. परंतु दसरा मेळाव्यात आमच्या आमदार आणि सरकारबाबत काहीही बोलले गेले. त्यामुळे शिवसेनेचा मुख्य प्रवक्ता म्हणून त्याचे उत्तर मी 100 टक्के देणार आहे. त्यामध्ये उद्धव साहेबांना कमी लेखण्याची माझी कोणतीही भूमिका नाही. परंतु आमची बाजू मांडून गैरसमज दूर करणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पाठ्यपुस्तकांमध्ये वह्यांची पाने टाकण्याबाबत बालभारती येथे विषय तज्ज्ञ आइधिकार्यांसोबत आयोजित बैठकीनंतर केसरकर पत्रकारांशी बोलत होते. केसरकर म्हणाले, जे शिक्षक पैसे देऊन टिईटी परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. त्यांना कोणतीही माफी दिली जाणार नाही. त्यामुळे यासंदर्भातील परीणामांना त्यांना सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे जे शिक्षक पोलिस चौकशीच्या फेर्यात आहेत. त्यांना वगळुन परीक्षेचा निकाल जाहीर केला जाणार आहे. येत्या काही दिवसांमध्येच हा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. त्यामुळे ज्यांनी कष्ट करून संबंधित परीक्षा दिली आहे. त्यांना देखील न्याय मिळणार आहे.