अहंकारी ‘एनडीए’चा पराभव ‘इंडिया’ आघाडीकडून निश्चित : उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरे
Published on
Updated on

हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : आगामी लोकसभा निवडणुकीत अहंकारी 'एनडीए'चा पराभव 'इंडिया' ही विरोधकांची आघाडी करेल, असा विश्वास व्यक्त करतानाच एनडीएचा मूळ तोंडवळाच हरवल्याचा घणाघात माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. ते रविवारी येथे एका जाहीर सभेत बोलत होते.

ते म्हणाले, अमिबा जसा क्षणाक्षणाला आकार बदलतो, तशी एनडीएची अवस्था झाली आहे. आयाराम-गयाराम ही त्यांची प्रमुख ओळख बनली आहे. पक्ष सत्तेवर येण्यासाठी मूळ भाजपच्या कार्यकर्त्यांची धडपड सुरू आहे. तथापि, त्यांची पक्षात घुसमट होत चालली आहे. राज्यातील सरकारला आधी डबल इंजिन सरकार म्हटले जात होते. आता अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर ते ट्रिपल इंजिन सरकार बनले आहे.

शिंदे गटावर हल्लाबोल

मी गद्दारांवर टीका करण्यात वेळ घालवणार नाही. मी तुमच्याशी बोलायला आलो आहे. मला तुमच्या समस्या जाणून घ्यायच्या आहेत, असे त्यांनी आपल्या भाषणात सुरुवातीलाच सांगितले. मात्र, नंतर शिंदे गटावर जोरदार हल्ला चढवला. आपण गद्दारांना दूध पाजले; पण त्याने पलटून चावा घेण्याचा प्रयत्न केला. अशांना आता जनताच धडा शिकवेल, असे ते म्हणाले.

कांद्यावरील निर्यात शुल्क वाढवले जात आहे. अशावेळी डबल आणि ट्रिपल इंजिनचे सरकार शेतकर्‍यांसाठी काय करत आहे? राज्यात दुष्काळ आहे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जपानमध्ये आहेत. 'सरकार आपल्या दारी आणि घोषणा केवळ कागदावर' अशी परिस्थिती असल्याची टीका त्यांनी केली.

आमचे हिंदुत्व मुखात राम आणि हाताला काम देणारे असल्याचे सांगून ते म्हणाले, आगामी आयसीसी वन-डे वर्ल्ड कपमध्ये 14 ऑक्टोबर रोजी भारत-पाकिस्तान या कट्टर प्रतिस्पर्धी संघात हाय व्होल्टेज सामना पार पडणार आहे. हा सामना तुम्हाला कसा चालतो, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

राव यांनी भूमिका स्पष्ट करावी

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी ते एनडीएसोबत आहेत की इंडियासोबत याबद्दल स्वतःची भूमिका स्पष्ट करावी, असेही ठाकरे म्हणाले. विरोधी मतांतील फाटाफूट रोखणे हे गरजेचे आहे; अन्यथा केवळ संभ्रम निर्माण होईल. लोकशाही आणि संविधान वाचविण्यासाठी इंडिया आघाडीला पर्याय नसल्याचे प्रतिपादनही त्यांनी केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news