

नारायणगाव (पुणे), पुढारी वृत्तसेवा: भरधाव वाहनाने पाठीमागून दिलेल्या धडकेत दुचाकीवरील दोन जण जागीच ठार झाले. जुन्नर तालुक्यातील कांदळी फाटा-१४ नंबर येथे पुणे-नाशिक महामार्गावर बुधवारी (दि. १) सायंकाळी ७.३० वाजता हा अपघात घडला. जुल्फीकार दिलशाद मालिक (वय २२, रा. चुडिवाला मोहनपूर, ता. रुडकी, जि. हरिद्वार, उत्तराखंड) व इस्तकार मलिक (रा. खाताखेडा, ता. रुडकी, जि. हरिद्वार, उत्तराखंड) अशी या अपघातात ठार झालेल्या दोघांची नावे आहेत. सुहास जगन्नाथ घाडगे (वय ४०, रा. कांदळी, ता. जुन्नर) यांनी नारायणगाव पोलिस ठाण्यात याबाबत फिर्याद दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुल्फीकार मालिक व इस्तकार मलिक हे दोघे फिर्यादी सुहास घाडगे यांच्या गुऱ्हाळावर कामगार होते. बुधवारी सांयकाळी ७.३० वाजता ते कांदळी फाटाहून १४ नंबरच्या दिशेने पुणे-नाशिक महामार्गाच्या सेवा रस्त्याने दुचाकीने (एमएच १२ बीझेड ६८६) जात होते. यावेळी बुलेट गॅरेजसमोर त्यांच्या दुचाकीला पाठीमागून भरधाव आलेल्या वाहनाने जोरात धडक दिली. यामध्ये दोघांचाही जागीच मृत्यू झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार नारायणगाव पोलिसांनी अपघातास कारणीभूत ठरलेल्या वाहनधारकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलिस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार मोहरे हे तपास करीत आहेत.