

वॉशिंग्टन : हिवाळ्यात दिवस लहान आणि रात्र मोठी होत असते. मात्र अमेरिकेतील सर्वात उत्तरेकडील शह उटकियाविकमध्ये आता पुढील काही दिवस रात्रच असणार आहे. हे शहर अलास्कामध्ये आहे. शनिवारी यावर्षीचा इथे शेवटचा सूर्यास्त झाला. आता जानेवारीच्या अखेरीस इथे सूर्योदय होईल. आर्क्टिक म्हणजेच उत्तर ध्रुवाच्या परिसरात आता दोन महिन्यांची दीर्घ रात्र सुरू झाली आहे आणि हे शहर या वर्तुळातच येते.
उटकियाविकला 'बॅरो' या नावाने ओळखले जात होते. मात्र सुमारे एक दशकापूर्वी या शहराचे नाव बदलून ते पारंपरिक अलास्काच्या नावावर ठेवण्यात आले. आर्क्टिक वर्तुळात असल्याने या शहरात दरवर्षी 66 दिवस रात्र असते. अर्थात शहरात पूर्णपणे अंधार असत नाही, संध्याकाळच्या वेळेसारखी स्थिती असते. पृथ्वीच्या अक्षातील झुकलेल्या स्थितीमुळे असे घडते. अमेरिकेच्या हवामान विभागाने म्हटले आहे की ज्यावेळी सूर्याचे केंद्र क्षितिजापासून 6 अंश खाली जाते त्यावेळी अशा दीर्घ रात्री सुरू होतात. उटकियाविक हे आर्क्टिक सर्कलमधील एकच शहर नाही, जिथे असे घडते. मात्र हे तेथील पहिले शहर असल्याने त्याची चर्चा अधिक होते.
23 जानेवारीलाच होणार सूर्यदर्शन
याठिकाणी 23 जानेवारी 2024 मध्ये सूर्यदर्शन घडेल. स्थानिक वेळेनुसार दुपारी 1 वाजून 9 मिनिटांनी तेथील लोकांना सूर्यदर्शन घडेल व हे दर्शन काही तासांचे असेल. त्यानंतर प्रत्येक नव्या दिवशी सूर्यप्रकाश वाढत जाईल. उन्हाळ्यात याच्या बरोबर उलट स्थिती असते. त्यावेळी एक काळ असा असतो ज्यावेळी सूर्यास्त होतच नाही!