

पुढारी ऑनलाईन डेस्क : मागील काही दिवसांत विदेशातील भारतीय नागरिकांच्या मृत्यूच्या घटनांची मालिका सुरुच राहिली आहे. अमेरिकेत भरतनाट्यम नृत्याचा अभ्यासक अमरनाथ घोष यांच्या हत्येची घटना ताजी असतानाच आता पश्चिम आफ्रिकेतील आयव्हरी कोस्टमध्ये दोघा भारतीयाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. भारतीय दुतावासाने या घटनेची पुष्टी करत स्थानिक अधिकार्यांकडे सखोल चौकशीची मागणी केली आहे.
"आयव्हरी कोस्टमधील आबिदजानमध्ये दोन भारतीय नागरिक मृतावस्थेत आढळले आहेत. स्थानिक पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. मृतावस्थेत सापडलेल्या दोन भारतीय नागरिकांची ओळख श्रीमती संतोष गोयल आणि श्री. संजय गोयल, अशी झाली आहे. या कुटुंबाप्रती आमची मनापासून संवेदना. दूतावास कुटुंबाला सर्वतोपरी मदत करत आहे. आम्ही स्थानिक अधिकाऱ्यांशी समन्वय साधत आहाेत. असे दूतावासाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वरील पोस्टमध्ये म्हटले आहे.
संतोष गोयल आणि संजय गोयल यांचे मृतदेह भारतात परत आणण्यासाठी स्थानिक अधिकाऱ्यांशी सक्रियपणे समन्वय साधत आहेत. आमचे दूतावास या दुःखाच्या वेळी कुटुंबाला शक्य ती सर्व मदत देण्यास पूर्णपणे वचनबद्ध आहे. या प्रकरणाची खखोल चौकशीसाठी स्थानिक अधिकाऱ्यांशी जवळून काम करत आहोत, असेही दूतावासाने स्पष्ट केले आहे.