खडकवासलात बुडून बेपत्ता झालेल्या दोन मुलींचा अखेर मृत्यू

फोटो :  गोऱ्हे खुर्द (ता. हवेली) येथे सोमवारी सकाळी खडकवासला धरणात बुडालेल्या मुलींंचा शोध घेताना ग्रामस्थांसह अग्निशमन दलाचे जवान संजय माताळे.
फोटो : गोऱ्हे खुर्द (ता. हवेली) येथे सोमवारी सकाळी खडकवासला धरणात बुडालेल्या मुलींंचा शोध घेताना ग्रामस्थांसह अग्निशमन दलाचे जवान संजय माताळे.
Published on
Updated on

वेल्हे(पुणे); पुढारी वृत्तसेवा : पुणे-पानशेत रस्त्यावरील गोऱ्हे खुर्द (ता. हवेली) येथील कलमाडी फार्म हाऊस जवळ खडकवासला धरणाच्या पाणलोटात आंघोळीसाठी उतरलेल्या दोन मुलींचा बुडून मृत्यू झाला. खुशी संजय खुर्दे ( वय १३ ) व शितल भगवान टिटोरे (वय १५, दोघी रा. बुलढाणा) अशी त्यांची नावे आहेत. सावडण्याच्या विधीसाठी धरणतीरावरील दशक्रियाविधी घाटावर आलेला युवक संजय माताळे व ग्रामस्थांच्या प्रसंगावधानतेने सात जणींना जीवनदान मिळाले. ही दुर्घटना सोमवारी (दि. १५) सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास घडली.

या दुर्घटनेतून कुमोदिनी संजय खुर्दे (वय १६), शितल अशोक धामणे (वय १७), पायल संतोष साबणे (वय १६), शशी सुरेश मांडवे (वय ९), पल्लवी संजय लहाने (वय १०), मीना संजय लहाने (वय ३२) व राखी संजय लहाने (वय १३, सर्व रा. बुलढाणा) यांना वाचविण्यात माताळे व ग्रामस्थांना यश मिळाले. यातील कुमोदीनी खुर्दे हिची प्रकृती चिंताजनक असल्याने तिला उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

खोल पाण्यात बुडून बेपत्ता झालेल्या खुशी खुर्दे व शितल टिटोरे यांना पीएमआरडीएच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी ग्रामस्थांच्या मदतीने बाहेर काढले. दोघींचा बुडून मृत्यू झाल्याचे हवेली पोलिस ठाण्याचे हवालदार दिनेश कोळेकर यांनी सांगितले. ग्रीन थंब संस्थेच्या वनिकरण प्रकल्पात काम करणारे संजय नारायण लहाने यांच्याकडे रविवारी (दि. १४) बारशाच्या कार्यक्रमासाठी पाहुणे आले होते. सोमवारी सकाळी एक महिला व आठ मुली अशा ९ जणी कपडे धुणे व आंघोळीसाठी धरणावर आल्या होत्या.

आंघोळीसाठी पाच जणी धरणाच्या तीरावरील पाण्यात उतरल्या. तर दोघी तिरावरच बसल्या. आंघोळ करताना काही जणी पुढे गेल्या. खोल पाण्याचा अंदाज न आल्याने त्या बुडू लागल्या. त्यावेळी तीरावरील मुलींनी जोरदार आरडाओरडा केला. तो ऐकूण सावडण्याच्या विधीसाठी चाललेले संजय सिताराम माताळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. संजय माताळे याने प्रसंगावधान दाखवत तीन मुलींना बाहेर काढले. दमछाक होत असताना स्वतः च्या जीवाची पर्वा न करता त्याने मुलींचे प्राण वाचविण्यासाठी शर्थ केली.

संजयच्या मदतीला गणेश शांताराम माताळे, माजी जिल्हा परिषद सदस्य नवनाथ पारगे, अतुल भांगरे मालखेडचे माजी सरपंच राजेंद्र जोरी आदीं धावून आले. मानवी साखळी करून साड्यांच्या साह्याने दोन मुलींना त्यांनी पाण्यातुन बाहेर काढले. खुशी खुर्दे व शितल ठिंबोरे या खोल पाण्यात बुडून बेपत्ता झाल्या. तिरावर असलेल्या दोन मुलींच्या समोर दुर्घटना घडल्याने त्या प्रचंड घाबरल्या.

त्यांच्यासह बाहेर काढलेल्या पाच अशा सात जणींना पोलिस पाटील कालीदास माताळे यांनी आपल्या गाडीतून खानापूर येथील जिल्हा परिषदेच्या आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. डॉ. एस. टी. जिने यांनी त्यांच्यावर उपचार केले. त्यातील कुमोदिनी खुर्दे हिची प्रकृती चिंताजनक असल्याने तिला उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले.

तसेच दोघींचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वागत रिंढे यांनी दिली. घटनेची माहिती मिळताच हवेलीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन नम ,पोलिस हवालदार दिनेश कोळेकर यांनी अग्निशमन दलाच्या जवानांसह घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या जवानांनी खोल पाण्यातून खुशी व शितल यांचे मृतदेह बाहेर काढले.

पोहणे जिवावर बेतले

संजय लहाने गेल्या पाच सहा वर्षांपासून वनीकरण प्रकल्पात काम करत आहेत. सकाळी संजय यांची पत्नी मीना लहाने यांच्या समवेत आंघोळीसाठी मुली धरणावर गेल्या. आंघोळ करताना काही मुलींनी पोहायला शिकवण्याचा हट्ट केला. पाणी खोल आहे असे सांगूनही मुली दूरवर गेल्या. पोहायला शिकणे दोघींच्या जीवावर बेतले. या दुर्घटनेने संजय लहाने व त्यांच्या नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसळला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news