

परभणी/गंगाखेड; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील खासगी शिक्षण संस्थेत केलेल्या नियमबाह्य शिक्षक भरती प्रकरणात सखोल चौकशीअंती प्राथमिक शिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे व तत्कालीन शिक्षणाधिकारी आशा गरुड यांना सेवेतून निलंबित करण्यात आले. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे उपसचिव टि. वा. करपते यांनी मंगळवारी तसे आदेश दिले.
प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी भुसारे व गरुड यांनी त्यांच्या कार्यकाळात खासगी शिक्षण संस्थेच्या प्राथमिक विभागात नियमबाह्य शिक्षक भरती केल्याची तक्रार शासनाकडे आली होती. त्यामुळे शासनाचे भविष्यात कोट्यवधीचे आर्थिक नुकसान होत असल्याचे सामाजिक कार्यकर्ते एम. बी. भिसे यांनी म्हटले होते. याविषयी त्यांनी लोकायुक्तांकडेही दाद मागितली होती. भुसारे यांच्याकडे माध्यमिक शिक्षण विभागाचा पदभार येताच त्यांनी जिल्ह्यात दलालांची साखळी तयार करत माध्यमिक विभागात बनावट प्रस्तावाच्या आधारे शिक्षक भरतीचा खेळ चालू केला होता. तसेच गरुड या परभणीत प्राथमिक विभागात असताना त्यांनी गैरव्यवहार केले होते. त्यांची बदली जालना येथे झालेली असताना 'प्राथमिक'च्या असंख्य शिक्षकांना मागील तारखेत वैयक्तिक मान्यता सेवासातत्य दिले होते.