

परळी; पुढारी वृत्तसेवा : सदरबझार, सातारा येथील दोन जीवलग मित्र रविवारी उरमोडी धरणपात्रात सायळी गावाजवळ पोहण्यासाठी गेले होते. मात्र, त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही पाण्यात बुडाले. रात्री उशिर झाल्याने त्यांचा शोध घेता आला नव्हता. सोमवारी सकाळी रेस्क्यू टीमने शोध कार्य राबवले. या मोहिमेत अखेर बुडालेल्या या दोन्ही युवकांचे मृतदेह सापडले.
सौरव सुनील चौधरी (वय 22) व आकाश रामचंद्र साठे (20) अशी बुडून मृत्यू झालेल्या मित्रांची नावे आहेत.
याबाबत मिळालेली माहिती अशी, सौरव आणि आकाश हे मित्र दुचाकीवरून उरमोडी धरणावर पोहण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी सायळी गावच्या हद्दीत असलेल्या झुडुपातील रस्त्यातून धरणपात्रात प्रवेश केला. त्या ठिकाणी दोघेही पोहण्यास गेले. या दोघांव्यतिरिक्त पोहणारे अन्य कोणीही नव्हते. ते पोहत होते त्यापासून काही अंतरावर एक कुटुंबीय गप्पा मारत बसले होते. त्या युवकांनी कपडे व मोबाईल काठावर ठेवले होते. बराच वेळ ते पोहत होते. यादरम्यान, सौरवचा मोबाईल वारंवार वाजत होता. धरणाच्या कडेला बसलेल्या कुटुंबीयांच्या लक्षात ही बाब आली. सतत फोन वाजत असल्याने त्यांनी तो फोन उचलला.
यावेळी सौरवच्या आईने सौरव कुठे आहे? कोण बोलत आहात? असे प्रश्न संबंधितांना केले. त्यावेळी कुटुंबियांनी हा मोबाईल उरमोडी धरण परिसरातील असून इथे दोन युवक पोहण्यासाठी गेले आहेत. मात्र, बराच वेळ झाले ते इकडे परत आलेच नाहीत आणि पाण्यातही दिसत नसल्याचे सौरवच्या आईला सांगितले.
हे ऐकताच सौरवच्या आईच्या पायाखालची जमीन सरकली. फोन ठेवल्यानंतर त्यांनी घरातील इतर सदस्यांना ही माहिती दिली. सौरवचा मोठा भाऊ गौरव व त्याचे काही मित्र घटनास्थळी धावले. त्यांनी परिसरात पाहणी केली मात्र त्यांना काहीही आढळून आले नाही. तोपर्यंत अंधारही झाला होता. यानंतर या घटनेची कल्पना गौरवच्या मित्रांनी आ. शिवेंद्रराजे रेस्क्यू टीमला दिली. मात्र, रात्री खूप उशिर झाल्याने रेस्क्यू टीमच्या सदस्यांनी शोध मोहीम राबवण्यास नकार दिला.
सोमवारी सकाळी स्थानिक ग्रामस्थांनी सौरव आणि आकाश यांचा शोध घेण्यास सुरूवात केली. सकाळी 9 वाजता रेस्क्यू टीमचे काही सदस्य दाखल झाले. मात्र, त्यांनाही यश आले नाही. पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांनीही स्वतः बोटीतून मृतदेह शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनाही यात अपयश आले. यानंतर अंबवडे येथील काही युवकांनी शर्थीचे प्रयत्न करत दुपारी 12 वाजता आकाशचा मृतदेह बाहेर काढला. स्थानिक नागरिक व सातारा येथील काही कातकरी व्यक्ती तसेच कुटुंबियांनी शोध मोहीम सुरूच ठेवली होती. यावेळी पाऊसही पडत होता. अखेरीस सायंकाळी 5.20 वाजता सौरवचा मृतदेह शोधण्यात यश आले. दोन्ही मृतदेह जिल्हा रूग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आले.
दरम्यान, दोन्हीही युवकांचे कुटुंबीय, नातेवाईक तसेच मित्रपरिवार उरमोडी धरणाच्या परिसरात ठाण मांडून होते. यावेळी परिसरातील मुलांनीही गर्दी केली होती. मृतदेह सापडल्यानंतर कुटुंबियांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.