सत्ताकारण : पुन्हा ट्रम्प विरुद्ध बायडेन

सत्ताकारण : पुन्हा ट्रम्प विरुद्ध बायडेन
Published on
Updated on

खरे तर बायडेन व ट्रम्प हे दोघेही अमेरिकन जनतेला पुन्हा सत्तेवर यायला नको आहेत. पण या दोघांशिवाय पर्याय नाही, असे सध्याचे चित्र आहे. बायडेन यांचे वय 81 वर्षे आहे. त्यांची लोकप्रियता दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. ट्रम्पही वयस्कर होत चालले आहेत. सत्तेसाठी काहीही करणारा कसा काय देशाचा प्रमुख असू शकतो, असा प्रश्न लोकांना पडला आहे. एकंदरीत अमेरिकेत निवडणुकीचे वारे वाहू लागले असले तरी त्यात उत्साह नाही.

अमेरिकेत येत्या नोव्हेंबरमध्ये अध्यक्षीय निवडणुका येऊ घातल्या आहेत. महासत्तेचे अध्यक्षपद म्हणजे जगातील सर्वात महत्त्वाचे. व्हाईट हाऊसचा दावेदार कोण होतो यावर जगाचे अर्थकारण व राजकारण चालते. या एवढ्या निर्णायक जागेसाठी पुन्हा रिंगणात आमने-सामने आले आहेत ते अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि विद्यमान राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन. त्यामुळे 2020 सालच्या निवडणुकीचा दुसरा भाग यंदाच्या निवडणुकीत केवळ अमेरिकेलाच नाही तर सगळ्या जगाला बघायला मिळणार आहे. 1956 नंतर आता पहिल्यांदाच अमेरिकेत गत जोडी पुन्हा एकमेकांसमोर उभे ठाकली आहे. तेव्हा रिपब्लिकन पक्षाचे एल्सानवर व डेमोक्रॅटिक पक्षाचे स्टिव्हन्सन असेच परत आमने-सामने आले होते. सध्या या दोन्ही राजकीय पक्षांच्या केवळ प्राथमिक फेर्‍या होत आहेत. त्यामध्ये ट्रम्प व बायडेन आघाडीवर आहेत. दोन्ही पक्षांकडून जून ते ऑगस्ट दरम्यान अधिकृतरीत्या उमेदवार जाहीर होईल. पण ते केवळ औपचारिकता म्हणून असेल. खरे चित्र तर आत्ताच समोर आहे.

मागील निवडणूक हरल्याची सल अजून ट्रम्प यांच्या मनातून गेलेली नाही. त्यामुळे या निवडणुकीत ते उभे राहणे गृहितच होते.ते तर गुडघ्याला बाशिंग बांधून तयारच होते. म्हणून तर त्यांनी प्रत्यक्ष निवडणुकीच्या जवळपास दोन वर्षे आधी 15 नोव्हेंबर 2022 लाच आपली उमेदवारी जाहीर केली. पण विशेष म्हणजे ट्रम्प यांच्यावर अत्यंत संवेदनशील कागदपत्रे जवळ बाळगणे, 2020 सालच्या निवडणुकीचा निकाल फिरवण्याचा प्रयत्न करणे व 2016 च्या निवडणुकीत प्रचारादरम्यान पॉर्न स्टारशी असलेले अनैतिक संबंध लपविण्यासाठी पैसे देणे यासाठी केंद्र व राज्य पातळीवर मिळून एकूण 91 गुन्हे दाखल झाले आहेत. 25 मार्चपासून त्यांची न्यूयॉर्क येथे सुनावणी सुरू होणार होती. ती पुराव्याअभावी पुढे ढकलण्यात आली. पण तरीही ट्रम्प यांच्या लोकप्रियतेत फारसा फरक पडलेला नाही. सलग तिसर्‍यांदा रिपब्लिकन पक्षाचे प्रतिनिधित्व ट्रम्प करत आहेत. यावरून पक्षात त्यांचे किती वजन असेल, याचा अंदाज करता येतो. पक्षात त्यांना सगळेच पसंत करतात असे नाही; पण डेमोक्रॅटिकवाल्यांना रोखायचे म्हणजे ट्रम्पशिवाय पर्याय नाही, असे त्यांना वाटते.

डिसेंबरमध्ये कोलोरॅडो राज्याच्या उच्च न्यायालयाने ट्रम्प यांचे नाव प्राथमिक निवडणुकीच्या मतपत्रिकेवरून काढून टाकण्याचा निर्णय दिला. त्यांच्या मते, सहा जानेवारी 2021 रोजी अमेरिकेच्या संसदेवर जो हल्ला झाला, त्याला ट्रम्प जबाबदार आहेत. चौदाव्या घटनादुरुस्तीनुसार जर कार्यकारीपदाची शपथ घेतलेली व्यक्ती जर अशा प्रकारच्या देशद्रोही कृत्यात सहभागी असेल तर त्या व्यक्तीला निवडणूक लढविता येणार नाही, असा दाखला कोर्टाने दिला. त्यानंतर मेन व इलिनियस राज्यांनी पण ट्रम्प यांचे नाव मतपत्रिकेवरून काढून टाकले. त्यावर ट्रम्प यांनी सर्वोच्च न्यायालयात अपिल केले. त्यात ट्रम्प यांच्या बाजूने निकाल देत न्यायालयाने या राज्यांना ट्रम्प यांचे नाव पुन्हा समाविष्ट करण्याचे आदेश दिले. न्यायालयाच्या मते, ही निवडणूक कोणा एका राज्याची नाही तर संपूर्ण देशाची आहे. एका राज्याच्या मतपत्रिकेवर त्या उमेदवाराचे नाव आहे अन् दुसर्‍या राज्याच्या नाही तर ती निवडणूक पारदर्शी व समान पातळीवर होणार नाही.

यावेळेस ट्रम्प यांच्यासोबत त्यांच्या पक्षातील एकूण अकराजण निवडणुकीसाठी उभे राहिले होते. त्यातील महत्त्वाचे उमेदवार म्हणजे फ्लोरिडा राज्याचे गव्हर्नर रॉन डी सँटिझ. रिपब्लिकन पक्षातील नवीन उभरता चेहरा म्हणून त्यांच्याकडे बघितले जाते. पण ट्रम्प यांच्या झंझावातापुढे ते टिकू शकले नाहीत. त्यांनी आपली उमेदवारी मागे घेतली. दुसरा उमेदवार म्हणजे भारतीय वंशाच्या निकी हेली. त्या साऊथ कॅरोलिना राज्याच्या माजी गव्हर्नर व ट्रम्प प्रशासनात संयुक्त राष्ट्रसंघाच्या अमेरिकेच्या राजदूत होत्या. ट्रम्प यांनी उमेदवारी जाहीर केल्यानंतर स्वतःची उमेदवारी जाहीर करत पक्षातून त्यांना आव्हान देणार्‍या त्या पहिल्याच होत्या अन् माघार घेणार्‍याही शेवटच्या होत्या. सुरुवातीपासूनच ट्रम्प यांच्यासमोर टिकणे कठीण आहे, हे हेली यांना माहिती होते. त्यांचे समर्थक त्यांना माघार घेण्यास वारंवार सांगत होते. पण त्या मागे हटल्या नाहीत. आता दोन आठवडे आधी त्यांनी शेवटी माघार घेतली. हेली जर पुढे आल्या असत्या तर कदाचित महासत्तेला पहिली महिला राष्ट्राध्यक्षा मिळाली असती.

रिपब्लिकन पक्षात ट्रम्प एवढे लोकप्रिय व तगडे उमेदवार असताना इतर अकराजणांनी त्यांना आव्हान दिले. पण डेमोक्रॅटिक पक्षात तर बायडेन विरोधात दोघेजण उभे राहिले होते. एक म्हणजे डीन फिलिप्स, ज्यांनी आधीच माघार घेतली. दुसर्‍या आहेत मरीन विलियम्सन, ज्या अजूनही या शर्यतीत आहेत, पण बायडेन त्यांच्यापेक्षा खूप पुढे आहेत. त्यामुळे बायडेन हेच डेमोक्रॅटिक पक्षातर्फे उमेदवार असणार हे नक्की.'ट्रम्प निवडणुकीसाठी उभे राहिलेत म्हणूनच मी पुन्हा निवडणूक लढवित आहे. ट्रम्पमुळे अमेरिकेच्या लोकशाहीला धोका आहे हे निश्चित. लोकशाहीला तडा गेलेला मी बघू शकत नाही', असे मत व्यक्त करत बायडेन यांनी आपली उमेदवारी गेल्या एप्रिलमध्ये जाहीर केली होती. डेमोक्रॅटिक पक्षालापण खात्री असेल की, ट्रम्प यांना टक्कर द्यायची असेल तर बायडेन हवेत. जर ट्रम्प उभे नसते तर कदाचित पक्षाने बायडेन यांचा विचार केला नसता.

अमेरिकेतील प्रमुख राजकीय पक्ष म्हटले तर रिपब्लिकन व डेमोक्रॅटिक हे दोनच पक्ष सर्वश्रुत आहेत अन् हेच पक्ष आलटून पालटून व्हाईट हाऊसवर राज्य करत असतात. पण त्यामुळे अमेरिकेत तिसरे पक्ष नाहीत असे नाही. या दोनपेक्षा व्यतिरिक्त असणार्‍या इतर सर्व पक्षांना 'थर्ड पार्टीज' म्हणूनच ओळखले जाते. त्यामध्ये ग्रीन पार्टी, लिबर्टीयन, कॉन्स्टिट्यूशन पार्टी असे काही पक्ष आहेत. ते सोडून काहीजण अपक्ष वा स्वतंत्र म्हणून उभे राहतात. यावेळेस ग्रीन पार्टीमधून जिल स्टियन तर अपक्ष म्हणून कॉर्नेल वेस्ट व रॉबर्ट केनेडी ज्युनिअर निवडणूक लढवित आहेत. यापैकी केनेडी 1988 व 2008 सालीही अध्यक्षीय निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. ते वकील, लेखक व पर्यावरण बचत चळवळीचे प्रमुख कार्यकर्ते आहेत. तसेच ते तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जॉन एफ केनेडी यांचे पुतणे आहेत. रिपब्लिकन व डेमोक्रॅटिक यांच्या वर्चस्वामुळे बाकीचे पक्ष झाकोळले जातात. पण त्यामुळे त्यांचे अस्तित्व नाकारून चालत नाही. बर्‍याच अध्यक्षीय निवडणुकीत या तिसर्‍या पक्षांनीच छुपा रुस्तमचे काम केले आहे. महत्त्वाचे म्हणजे मते खाण्याचे वा फोडण्याचे काम तर या पक्षांकडून केलेच जाते. यावेळेस रॉबर्ट केनेडी यांच्यावर सर्व लक्ष ठेवून आहेत. बरेच लोक त्यांच्या समाज माध्यमांशी जोडलेले असून त्यांचाही मोठा चाहता वर्ग आहे.

विशेष म्हणजे बहुतांश मतचाचण्या दर्शवतात की, बायडेन व ट्रम्प हे दोघेही अमेरिकन जनतेला पुन्हा सत्तेवर यायला नको आहेत. त्यांना आता नवे नेतृत्व हवे आहे. रुटर्स पोल्सनुसार 67 टक्के लोक या दोघांच्यावर नाखूश आहेत. 18 टक्के लोक म्हणतात की, या दोघांपैकी कोणालाच मत देणार नाही. लोकांनी या दोघांना नाकारण्याचे प्रमुख कारण म्हणजे त्यांचे वय. बायडेन अगोदरच अमेरिकेचे सर्वात वयस्कर राष्ट्राध्यक्ष आहेत. त्यात आता सध्या त्यांचे वय 81 वर्षे आहे. आता इथून पुढे त्यांचे वय वाढेल तशा तब्येतीच्या तक्रारी वाढतील, स्मरणशक्ती कमकुवत होत जाईल. अशा परिस्थितीत महासत्तेचा पदभार बायडेन सांभाळू शकतील की नाही याबद्दल अमेरिकन जनता साशंक आहे. त्यात बायडेन यांनी इस्रायल-हमास युद्ध चुकीच्या पद्धतीने हाताळले, असे बहुतांश जनतेला वाटते. त्यामुळे बायडेन यांची लोकप्रियता दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. ट्रम्पही आता वयस्कर होत चालले आहेत. त्यांचे वय 77 आहे. त्यात त्यांच्या कृष्णकृत्यांना लोक कंटाळले आहेत. एवढे सगळे आरोप अमेरिकेच्या इतिहासात कोणत्याच अध्यक्षांवर दाखल झाले नव्हते. सत्तेसाठी काहीही करणारा कसा काय देशाचा प्रमुख असू शकतो, असा प्रश्न इथल्या लोकांना पडला आहे. एकंदरीत काय, अमेरिकेत निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. पण त्यात उत्साह नाही. त्याला एक प्रकारची निराशेची झालर आहे.

अशी होते अध्यक्षीय निवडणूक

अमेरिकतील अध्यक्षीय निवडणुका या दर चार वर्षांनी नोव्हेंबरमधील पहिल्या सोमवारनंतर येणार्‍या मंगळवारीच होतात. 1845 मधील केंद्रीय कायद्याद्वारे ही तरतूद करण्यात आलेली आहे. अगदी युद्धजन्य परिस्थिती, नैसर्गिक आपत्ती व इतर कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यात बदल झालेला नाही. या कायद्यात दुरुस्ती केल्याशिवाय निवडणुकीच्या तारखेत बदल करता येत नाही. अमेरिकेच्या अध्यक्षीयपदासाठी पात्रता म्हणजे त्या व्यक्तीचे वय किमान पस्तीस वर्ष असावे. ती जन्माने अमेरिकन नागरिक असावी आणि त्या व्यक्तीचे अमेरिकेत किमान चौदा वर्षे वास्तव्य असावे. एका व्यक्तीला दोन वेळेलाच अध्यक्षीय पद भूषविता येते. 1951 च्या बाविसाव्या घटनादुरुस्तीनुसार हा कायदा करण्यात आला.

या निवडणुकीची प्रक्रिया किचकट व प्रदीर्घ असते. जवळपास दोन वर्षांपासून त्याची तयारी सुरू होते. हळूहळू एक एक टप्पा पार करत राष्ट्राध्यक्षांची निवड झाल्यावरच ही प्रक्रिया पूर्ण होते. सर्वांत पहिला टप्पा म्हणजे पक्षाअंतर्गत उमेदवार निवडण्याची प्रकिया. एका पक्षातील लोकच एकमेकांविरुद्ध निवडणूक लढवण्यासाठी सज्ज होतात. इच्छुक उमेदवार केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आपले नाव नोंदवून उमेदवारी जाहीर करतात. उमेदवारी जाहीर करण्यासाठी अंतिम अशी काही मुदत नसते. पण त्या उमेदवाराने 5000 पेक्षा जास्त रक्कम खर्च केली तर त्याची नोंदणी करणे आणि आर्थिक अहवाल दाखल करणे आवश्यक असते. तसेच या उमेदवारांनी स्वतःची एक प्रमुख प्रचार समिती नियुक्त करणे आवश्यक असते. ही प्रचार समिती उमेदवाराच्या प्रचारासाठी योगदान देते आणि खर्च करते.

प्रत्यक्ष निवडणुकीच्या वर्षी जानेवारी ते जून यादरम्यान प्रत्येक राज्यात पक्षांतर्गत प्राथमिक निवडणुका होतात. ज्या त्या पक्षाचे नोंदणीकृत मतदार मतदान करतात. ही मते थेट त्या उमेदवाराला न जाता ठरावीक प्रतिनिधींना जातात ज्यांना 'डेलिगेटस्' म्हणतात. जून ते सप्टेंबर दरम्यान पक्षांचे राष्ट्रीय अधिवेशन होते. त्यामध्ये त्या त्या पक्षाचे डेलिगेटस् (प्रतिनिधी) अंतिम उमेदवार जाहीर करतात. याचवेळी अध्यक्षीय उमेदवार उपराष्ट्राध्यक्षाचा उमेदवार जाहीर करतो. त्यानंतर पुढील दोन महिने प्रचार व अध्यक्षीय उमेदवारांमध्ये वादविवाद सभेचे आयोजन केले जाते. नोव्हेंबरमध्ये सार्वजनिक मतदान होते. त्यानंतर डिसेंबरमध्ये इलेक्ट्रोल कॉलेजचे मतदान होते.

काय असते हे इलेक्ट्रोल कॉलेज? खरे तर अमेरिकन मतदार हा प्रत्यक्षपणे अध्यक्षीय पदाच्या उमेदवाराला मतदान करत नाही तर जे अध्यक्षाची निवड करणार आहेत, अशा प्रतिनिधींना ते मतदान करतात. या प्रतिनिधींना इलेक्ट्रोल म्हणतात आणि त्यांच्या संपूर्ण गटाला इलेक्ट्रोल कॉलेज म्हणतात. राज्याच्या लोकसंख्येनुसार अशा प्रतिनिधींची संख्या ठरवली जाते. अमेरिकेत एकूण 50 राज्ये आहेत. सर्व राज्यात निवडून आलेले असे एकूण 538 उमेदवार डिसेंबरमध्ये अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी मतदान करतात. या मतदानाचा निकाल जानेवारीमध्ये घोषित केला जातो. 270 पेक्षा अधिक बहुमत असलेल्या उमेदवाराला अध्यक्षपदाचा बहुमान प्राप्त होतो. शेवटी वीस जानेवारीला नवनिर्वाचित अध्यक्ष अध्यक्षीयपदाची शपथ घेऊन पदभार स्वीकारतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news