

खडकवासला(पुणे); पुढारी वृत्तसेवा : बिबट्यासह साळिंदर, मुंगूस अशा दुर्मीळ वन्यप्राण्यांच्या अवयवांच्या तस्करीचा प्रकार फिरत्या वन पथकाने पुण्यातील शिवाजी रस्त्यावरील दत्त मंदिर परिसरात बुधवारी (दि. 11) दुपारी हाणून पाडला. या कारवाईत वन्यप्राण्यांचे अवयव जप्त केले. मात्र, गर्दीचा फायदा घेत तस्करी करणारी व्यक्ती पसार झाली. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुण्यातील दत्त मंदिर परिसरात वन्यप्राण्यांच्या अवयवांची विक्री केली जात असल्याची गोपनीय माहिती खबर्यांमार्फत मिळाली होती. त्यानुसार पुणे विभागाचे मुख्य वनसंरक्षक एन. आर. प्रवीण व विभागीय वन अधिकारी आर. एस. धोत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्हा फिरत्या वन पथकाचे वनपरिक्षेत्र अधिकारी दत्तात्रय पिसाळ, वनरक्षक मनोज पाखरे, पोलिस जवान अमोल माटे, राजू साबळे यांच्या पथकाने बुधवारी दत्त मंदिर परिसरात सापळा रचला.
या वेळी संशयित व्यक्ती अवयव घेऊन आली असता पोलिसांना छापा टाकला. मात्र, गर्दीचा फायदा घेत तो पसार झाला. या कारवाईत पथकाने बिबट्याचे नखे, साळिंदराचे काटे, मुंगसाचे शेपूट, घोरपडीचे मुंडके, 8 इंद्रजाल तसेच इतर वन्यप्राण्यांची हाडे, दात असे अवयव जप्त केले.
बिबट्यासह दुर्मीळ वन्यप्राण्यांचे अवयव जप्त केले आहेत. वन्यप्राण्यांच्या अवयवांची तस्करी रोखण्यासाठी फिरते वन पथक सज्ज आहे. फरार तस्कराचा कसून शोध सुरू आहे.
– दत्तात्रय पिसाळ,
वनपरिक्षेत्र अधिकारी
हेही वाचा