पुणे: खडकी बाजारातील वाहतूककोंडी फुटणार, बोपोडीतील 63 मिळकतींवर कारवाई 

पुणे: खडकी बाजारातील वाहतूककोंडी फुटणार, बोपोडीतील 63 मिळकतींवर कारवाई 
Published on
Updated on
नवी सांगवी(पुणे): बोपोडी चौकातील पुण्याच्या दिशेने तसेच पिंपरीच्या दिशेने दुतर्फा बाजूस असणारे अतिक्रमण पुणे महापालिकेच्या मालमत्ता विभाग, भूसंपादन विभागाच्या वतीने कारवाई करून काढण्यात आले आहे. या वेळी 63 मिळकतींवर कारवाई करण्यात आली. गुरुवारी सकाळी आठ ते सायंकाळी उशिरापर्यंत कारवाई सुरू होती.

मेट्रोच्या कामामुळे वाहतूककोंडी

पुणे मेट्रोच्या कामामुळे गेली काही महिने बोपोडी येथील चौकातून पुण्याकडे जाण्यासाठी खडकी बाजारमार्गे एकेरी वाहतूक करण्यात आली होती. एकेरी वाहतुकीमुळे तसेच येथील अरुंद रस्त्यावर होणार्‍या वाहतूककोंडीमुळे ही वाहने रेंजहिल्स चौकात जाण्यासाठी साधारण पंधरा ते वीस मिनिटांचा कालावधी लागत होता. याआधी दापोडीपासून येणारी वाहने बोपोडी चौकातून सरळ एक किलोमीटर असलेल्या रेंजहिल्स चौकात जाण्यासाठी केवळ दोन ते तीन मिनिटे लागत होती. मेट्रोची कामे पूर्ण झाल्याने येथील रस्त्याचे दुतर्फा बाजूस रुंदीकरण करण्यासाठी पुणे महापालिकेने धडक कारवाई करीत दुतर्फा बाजूकडील अतिक्रमणावर गुरुवारी कारवाई करण्यात आली.

व्यावसायिक दुकाने हटविली

63 मिळकतींवर अतिक्रमण विभागाकडून धडक कारवाई करण्यात आली. यामध्ये इमारती, बैठी घरे, व्यावसायिक दुकाने, मंदिर, सार्वजनिक शौचालय आदी जमीनदोस्त करण्यात आले. या कारवाई प्रसंगी उपायुक्त भूसंपादन विभाग प्रतिभा पाटील, उपायुक्त मालमत्ता व्यवस्थापन अजित देशमुख, उपायुक्त अतिक्रमण विभाग माधव जगताप, कार्यकारी अभियंता दिनकर गोजारे, खडकी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विष्णू ताम्हाणे आदी उपस्थित होते.
पोलिस बंदोबस्त तैनात
याप्रसंगी महापालिकेचे 50 हून अधिक अधिकारी, महिला अधिकारी, 25 ते 30 पोलिस कर्मचारी सहभागी होते. यामध्ये 10 जेसीबी, 3 पोकलंड, 10 डंपर, 10 ट्रक, 4 अग्निशामक दलाची वाहने, 2 रुग्णवाहिका, 6 अतिक्रमण विभागाची वाहने, 10 पोलिसांची वाहने आणि 100 मदतनीस कर्मचारी यांच्या मदतीने कारवाई करण्यात आली. या वेळी बाधित कुटुंबातील नागरिक रस्त्यावर गर्दी करून उभे होते. अनेकांनी आक्षेप घेत अधिकार्‍यांकडून पुन्हा मोजणी करून अतिक्रमण कारवाई बंद करण्यासाठी अट्टहास केला. तसेच, अनेकजण संबंधित अधिकार्‍यांसोबत हुज्जत घालत असल्याचेही दिसून आले.
पुणे महापालिकेच्या वतीने दुतर्फा बाजूस पूर्वी 21 मीटर रुंद असलेल्या रस्त्याचे सध्या 42 मीटर रुंदीप्रमाणे जागा ताब्यात घेऊन रस्त्याचे काम करण्यात येणार आहे. यामध्ये साडेदहा मीटर सिमेंट काँक्रीटीकरण रस्ता, साडेचार मीटर सर्व्हिस रस्ता, फूटपाथ, सायकल ट्रॅक करण्यात येणार आहे. उद्यापासून लगेच रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात येणार आहे. अडीच महिन्यांत दुतर्फा बाजूकडील रस्ता पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे.
– दिनकर गोजारे, कार्यकारी अभियंता
650 मीटर दुतर्फा बाजूकडील रस्ता करण्यासाठी येथील रस्त्याच्याकडेला अतिक्रमण केलेली जागा पुणे महापालिकेच्या ताब्यात आली आहे. महापालिकेच्या वतीने बाधित रहिवाशांना अन्य ठिकाणी पुनर्वसन करण्यात आले आहे.
– प्रतिभा पाटील, उपायुक्त भूसंपादन विभाग
गोपीचाळ येथील अनेक नागरिक मोठ्या संख्येने वास्तव्यास आहेत. महापालिकेच्या वतीने येथील नागरिकांसाठी सार्वजनिक सुलभ शौचालय जमीनदोस्त केल्याने येथील नागरिकांची मोठी गैरसोय होणार आहे. येथील अनेक वर्षांपूर्वीचे नागरिकांचे श्रद्धास्थान असलेले शंकराचे मंदिरही जमीनदोस्त केल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
– स्थानिक, गोपीचाळ
काही बाधितांचे पुनर्वसन करण्यात आले आहे. मात्र, बाधित व्यावसायिक दुकानदारांचे काय? त्यांच्याही पुनर्वसनाचा महापालिकेने निर्णय करावा. वर्षानुवर्षे याठिकाणी ते व्यवसाय करीत आहेत. महापालिका काही बाधितांना तसेच रहिवाशी यांना 25 हजार रुपये देणार आहे. यामध्ये कसा काय यांचा उदरनिर्वाह होणार ?
– जीवन घोंगडे, अध्यक्ष, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news