दात किडू नयेत म्हणून घरच्या घरी करा ‘हे’ उपाय करा

दात किडू नयेत म्हणून घरच्या घरी करा ‘हे’ उपाय करा
Published on
Updated on

आरोग्याच्या इतर समस्यांकडे आपण जेवढं लक्ष देतो तेवढं दातांच्या आरोग्याकडे देत नाही. पण अन्न पचनाच्या प्रक्रियेत दातांची भूमिका महत्त्वाची असल्याने त्यांच्याकडेही तेवढंच लक्ष देणं आवश्यक आहे.

दातांचं दुखणं खरोखरच वेदनादायक असतं. अनेकदा दातांच्या सुरुवातीच्या दुखण्याकडे आपण दुर्लक्ष करतो. वेदना जास्त वाढल्या की मगच डॉक्टरकडे जातो. खरंतर दात हे अन्न पचनाच्या प्रक्रियेतील महत्त्वाचे घटक आहेत आणि एकूणच प्रचनक्रियेवर आपलं संपूर्ण आयुष्य अवलंबून असतं. म्हणून दातांच्या दुखण्याकडे दुर्लक्ष न करता वेळीच उपचार घ्यावेत. बर्‍याच जणांना दातांवरील उपचारांची भीती वाटत असते. कारण होणार्‍या वेदनांना ते घाबरत असतात, पण अलीकडे दातांचे उपचार वेदनारहीत पद्धतीने केले जातात. भुलीचं इंजेक्शन देण्यासाठीही आधी भुलीचं मलम लावतात. त्यामुळे ती जागा बधिर होते आणि मग इंजेक्शन तितकसं वेदनादायक राहत नाही. दातातील कीड काढणे, दात साफ करणे यासारख्या कामापूर्वीही हल्ली दंतवैद्य अशा प्रकारची भूल देतात.

दाढदुखी सुरू झाली की ती काढून टाकणे हाच एक उपाय असाही एक गैरसमज लोकांमध्ये दिसून येतो. किडलेली दाढ काढून टाकण्याऐवजी त्यावरही उपचार उपलब्ध आहेत. अशी दाढ आतपर्यंत जेव्हा कीडते तेव्हा अधिक त्रास होऊ शकतो. अशा वेळी ती नस कापून दाढेची मुळं स्वच्छ केली जातात आणि त्यामध्ये सिमेंट भरलं जातं. अशा प्रकारच्या उपचारांना रूट कॅनॉल ट्रिटमेंट असं म्हणतात. या उपचारानंतर दात थोडा ठिसूळ होतो, पण त्याला वरून कॅप बसवली जाते. त्यामुळे दात मजबूत होतो. एकंदरीत योग्य प्रकारे उपचार करून घेतले तर दात कायमस्वरूपी वाचवता येतात.

काही वेळा दातांमध्ये वरचेवर कीड असते. म्हणजे दातांवर थोडे काळे डाग दिसू लागतात. दातात खड्डा पडून त्यात अन्नकण अडकू लागतात. दाताला थंड पदार्थ किंवा गोड खाताना बारीक कळ जाणवू लागते. अशा वेळी दातांमध्ये कीड पसरू लागलेली असते. ही कीड साफ करून घेणे गरजेचे असते.

दातांमध्ये कोणत्या प्रकारचं सिमेंट भरलं आहे त्यावर त्याचे टिकण्याचं प्रमाण ठरतं. चांदी ही टिकायला चांगली असते पण ती दातांमध्ये बसवल्यावर काळपट दिसते. त्यावर पर्याय म्हणून हल्ली नवीन प्रकारचं सिमेंट किंवा दातांच्या रंगांचं कॉम्पोझिट भरलं जातं. त्याचा रंग दातांसारखाच असल्यामुळे ते दिसत नाही. शिवाय ते टिकायलाही चांगलं असतं. आणखी उपयोगाची गोष्ट म्हणजे या मधल्या सिमेंटमध्ये फ्लोराईड असतं. हे फ्लोराईड दात किडू नये म्हणून उपयोगाचं ठरतं. म्हणूनच तज्ज्ञ डॉक्टर फ्लोराइड असलेली टूथपेस्ट वापरण्याचा सल्ला देतात.

पण हे झाले उपचारांचे ! हे दात किडू नये म्हणून रोज उपाय करता येतात. रोज सकाळी आणि रात्री योग्य पद्धतीने दात घासावेत. काहीही खाल्लं तरी खळखळून चूळ भरावी. कारण अन्नकण दातांमध्ये अडकून पडल्यानंतर ते कुजतात आणि त्यामुळे दात किडतात. डॉक्टरांकडून नियमितपणे दातांची तपासणी करून घ्यावी. म्हणजे वेळीच उपचार होऊ शकतात आणि भविष्यात त्रास वाचू शकतो. दातांबद्दलच्या तपासण्यांबाबत आपण तितकेसे जागरूक नसतो. पण, त्याकडे दुर्लक्ष केल्याने भविष्यात बरेचसे त्रास उद्भवू शकतात. म्हणून हे दुखणं कमी असतानाच काळजी घेणे शहाणपणाचं ठरतं.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news