

पुढारी ऑनलाईन डेस्क : सध्या राज्यात शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमुळे वातावरण चांगलेच तापले आहे. या दरम्यान सर्वात जास्त चर्चेत राहिलेला मतदारसंघ म्हणजे नाशिक पदवीधर मतदारसंघ. या मतदारसंघात युवक कॉँग्रेसच्या अध्यक्षपदी राहिलेल्या सत्यजित तांबे यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला. यादरम्यान सत्यजित यांना भाजपा पाठिंबा देणार अशी चर्चाही रंगली होती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तांबे यांच्या कामाचं कौतुकही केलं होतं.
या सगळ्या पार्श्वभूमीवर अखेर आज भाजपने सत्यजित तांबे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. भाजपाच्या स्थानिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून तांबे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय झाल्याचं राधाकृष्ण विखे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना जाहीर केलं. यावेळी बोलताना 'सत्यजित तरुण नेतृत्व आहे तसेच होतकरूही आहेत. यामुळे भाजप कार्यकर्त्यांनी त्यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.' असं विखे पाटील म्हणाले.
सत्यजित यांनी अपक्ष म्हणून फॉर्म भरल्यानंतर महाविकास आघाडीने शुभांगी पाटील यांना पाठिंबा जाहीर केला. यामुळे आता नाशिक पदवीधर मतदारसंघात शुभांगी पाटील विरुद्ध सत्यजित तांबे असा थेट सामना होणार असल्याचं चित्र स्पष्ट झालं आहे.