

अनेकदा आपल्याला सांधेदुखी किंवा आर्थ्रायटीससारख्या शरीरवेदना जाणवत असतात. त्याकडे आपण काहीवेळा दुर्लक्षही करतो; पण आपल्या शरीराची काळजी घ्यायला हवी ही मागणी शरीर आपल्याकडे करत असते, त्या हाका आपण ऐकल्या पाहिजेत. शरीराला वेदना झाल्या की, गोळ्या घेणे ही सर्वांचीच नेहमीचीच सवय आहे; पण आपल्या शरीराच्या हाका ऐकून त्याला खरंच प्रतिसाद द्यायचा असेल, तर या दुखण्याचे मूळ कारण जाणून घेतले, तर त्यावर योग्य ते उपाय करता येतील. ( Healthy Joints)
वाढत्या वयानुसार सांधेदुखी होणे काही नवीन नाही. आपण आयुष्यभर घेतलेले शारीरिक श्रमाचा ताण खांदे, कोपरे, गुडघे, मनगटे आणि नितंब यांच्यावर येत असतो. थोडक्यात सतत शारीरिक ताण दिलेल्या शरीराकडे लक्ष न दिल्याने सांधेदुखीच्या रूपात त्याची परतफेड होते; पण काही प्रतिबंधक उपाय वेळीच केल्यास आपण खूप काळ वेदनाविरहीत आयुष्य व्यतीत करू शकतो.
सांधेदुखी आणि सांध्यांची होणारी जळजळ यासाठी ऑलिव्ह तेलाने खांदे आणि गुडघे यांना मसाज करावा. त्यामुळे तुलनेने दोन्हीला आराम मिळतो. सांध्यांना मसाज करताना हृदयाच्या दिशेने मसाज करावा. ही गोष्ट कायम लक्षात असू द्या. अर्थात, दैनंदिन आयुष्यात सांधे खूप अधिक दुखत असतील आणि सहन होत नसेल, तर मात्र वैद्यकीय सल्ला घेणेच उत्तम!