

पुढारी ऑनलाईन डेस्क : आपला मुलगा/मुलगी ही हुशार व्हावीत, ही अपेक्षा प्रत्येक पालकाची असते. आजच्या आधुनिक जगात सर्वच क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी चांगली बुद्धीमत्ता ही अनिवार्य आहे. त्यामुळे मुलांना चांगली शाळा- क्लास, तसेच घरात अभ्यासाला पोषक वातावरण देण्यावर पालकांचा भर असतो. मुले स्मार्ट असणं आणि त्यांची आईक्यू लेव्हल ( बुद्ध्यांक स्तर ) चांगली असणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. आजवर यासंदर्भात झालेल्या अनेक संशोधनात लहानपणापासून मुलांकडे लक्ष दिले तर त्यांची आईक्यू लेव्हल ( Child IQ Level ) वाढण्यास मदत होते, हे स्पष्ट झाले आहे. पालकांनी मुलांची वाढ करताना लहानपणापासूनच काही गोष्टींवर लक्ष दिले तर त्यांची आईक्यू लेव्हल वाढण्यास मदत होते. जाणून घेवूया मुलांचा आईक्यू लेव्हल वाढविण्यासाठीच्या पाच टिप्स…
मुलांचा एखादे वाद्य शिकवा. त्यामुळे त्यांच्या IQ Level मध्ये वाढ होवू शकते. संशोधनात असे स्पष्ट झाले आहे की, संगीतामुळे मुलांच्या गणित आकलनात सुधारणा होवू शकते. त्यामुळे मुलांना गिटार, सितार, पेटी किंवा अन्य कोणत्याही प्रकारचे एक वाद्य शिकवा. संगीत हे मनावरील ताण कमी करण्यातील सर्वात महत्त्वाचे साधन ठरते, असे आजवरच्या शारीरिक व मानसिक संशोधनात स्पष्ट झाले आहे.
मुलांच्या योग्य शारीरिक व मानसिक वाढीसाठी त्यांनी अधिक खेळावे. तसेच पालकांनीही त्यांना सातत्याने अभ्यासाचे ओझे न देता त्यांना विशिष्ट वेळेत त्यांना खेळण्यासाठी प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. तसेच तुम्हाला मुलांचा IQ Level वाढवा असे वाटत असेल तर तुम्हीही त्याच्याबरोबर काही वेळ खेळा. यामुळे पालक आणि पाल्य यांच्यातील नाते अधिक घट्ट होते. भावनिक दृष्टया सक्षम मुलांची आईक्यू लेव्हल चांगली असते.
पालकांनी मुलांबरोब खेळावे. तसेच खेळातूनच त्यांना गणितासंदर्भात प्रश्न विचारावेत. दररोज तुम्ही १० ते १५ मिनिटं असे केल्या मुलांच्या आईक्यू लेव्हलमध्ये चांगली वाढ होते.
आजच्या धावपळीच्या जगण्यात मुलांवरील मानसिक ताण वाढला आहे. दीर्घ श्वसनामुळे मुलांची एकाग्रता वाढते. मानसिकदृष्ट्या निरोगी राहण्यासाठी लहानपणापासूनच मुलांना दीर्घ श्वसनाचे महत्त्व पटवून द्या. त्यांना दीर्घ श्वसन कसे करावे याबाबत प्रशिक्षण द्या. यामुळे एखाद्या गोष्टींवर लक्ष एकाग्र करण्याच्या प्रवृत्तीमध्ये लक्षणीय वाढ होते. त्यामुळे दररोज सकाळी आणि सायंकाळी मुलांकडून १० ते १५ मिनिटे दीर्घ श्वसनाचा अभ्यास करुन घ्या. तसेच बुद्धीला चालना देणारे खेळ उदा. बुद्धीबळ खेळा. अशा माइंड गेम्समुळेही मुलांचे आयक्यु लेव्हल वाढविण्यास मदत होते.
मुलांना कधीच मारहाण करु नका, तसेच त्यांच्याशी संवाद साधताना अश्लील भाषेचा उपयोग करु नका. त्यांना निसर्गाचे महत्त्व पटवून द्या तसेच ते अधिक काळ नैसर्गिक वातावरणात कसे राहतील, यासाठी प्रयत्न करा. मुलांनी विचारलेल्या प्रश्नांची शास्त्रीय उत्तरे द्या. त्यांना भूत, रहस्यमय गोष्टींची भीती दाखवू नका यामुळे मनात अंधश्रद्धा निर्माण होतात. तुमची प्रत्येक कृती मुलांचा आत्मविश्वास वाढविणारी असावी, याचे स्मरण ठेवा.
हेही वाचा :