

बीजिंग : पृथ्वीच्या खालील स्तरातील कक्षेत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक (आयएसएस) फिरत असून, तिथे विविध देशांचे अंतराळवीर राहून वैज्ञानिक प्रयोग व निरीक्षणे करीत असतात. अमेरिकेची 'नासा', रशियाची 'रॉसकॉसमॉस', जपानची 'जाक्सा', युरोपची 'इएसए' आणि कॅनडाच्या 'सीएसए' या अंतराळ संशोधन संस्थांचा हा संयुक्त प्रकल्प आहे.
1998 पासून हे अंतराळस्थानक सातत्याने संचालित राहिले असून, नोव्हेंबर 2000 पासून तिथे वेगवेगळ्या देशांच्या अंतराळवीरांचे पथक विशिष्ट कालावधीसाठी जात-येत राहिलेले आहे. हे अंतराळस्थानक या दशकाच्या अखेरीस निवृत्त केले जाणार आहे. सध्या चीनने अशाच स्वतःच्या अंतराळ स्थानकाची निर्मिती केलेली असून, त्याचे नाव 'तियांगोंग' असे आहे. तिथे अंतराळवीर राहून वैज्ञानिक प्रयोगही करीत आहेत. या अंतराळ स्थानकाचा विस्तारही सुरू असून, ते आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकापेक्षाही मोठे बनवण्याची चीनची योजना आहे.
आगामी तीन वर्षांमध्ये चीनकडून त्यांचे हे अंतराळ स्थानक आणखी मोठे करण्यात येणार असून, त्याची व्याप्ती 6 मॉड्यूलइतकी असेल. जगभरातील (इतर देशांतील) अंतराळवीरांना आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाशिवाय दुसरा एक पर्याय म्हणून या स्पेस स्टेशनचा वापर करता येईल. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाचे आयुर्मान पूर्ण होण्याच्या सुमारास चीनचे हे अंतराळस्थानक पृथ्वीभोवतीच्या मोहिमांसाठी मदतीचे ठरेल, असे म्हटले जात आहे. चीन सर्व देशांपेक्षा सरस असल्याचे दाखवण्यासाठी हे करतोय की त्यामागे त्यांचा आणखी काही हेतू आहे, हे स्पष्ट झालेले नाही. प्राथमिक माहितीनुसार चीनच्या या स्पेस स्टेशनचं आयुर्मान 15 वर्षे असणार आहे.
अझरबैझानमधील बाकू येथे झालेल्या 74 व्या इंटरनॅशनल अॅस्ट्रॉनॉटिकल काँग्रेसमध्ये 'चायना अॅकॅडमी ऑफ स्पेस टेक्नॉलॉजी'कडून यासंदर्भातील माहिती देण्यात आली. 2022 पासूनच चीनचे हे 'तियांगोंग' नावाचे अंतराळ स्थानक पूर्ण क्षमतेने सुरू झाले. ज्यामध्ये जास्तीत जास्त तीन अंतराळवीरांना राहता येऊ शकते. पृथ्वीपासून दूर सुमारे 280 मैल अंतरावर हे अंतराळ स्थानक आहे. सध्या चीनच्या या स्पेस स्टेशनची क्षमता सात अंतराळवीरांसाठी पूरक असणार्या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या तुलनेत अवघी 40 टक्के आहे. 'आयएसएस' 2030 मध्ये बंद होणार असल्याचं सांगितलं जात आहे.