

पुणे, पुढारी वृत्तसेवा: गाडी पार्क करण्याच्या कारणातून झालेल्या वादात पाच जणांंनी एका पोलिस कर्मचार्याच्या डोक्यात सिमेंट ब्लॉक घालून मारहाण करण्याची घटना रविवारी सकाळी धानोरी जकातनाका परिसरात घडली. पी. आर. मोटे असे जखमी पोलिसाचे नाव आहे.
या प्रकरणी विमानतळ पोलिसांनी कालिदास खांदवे (वय 35, रा. राखपसरे वस्ती, लोहगाव), माऊली खांदवे (रा. लोहगाव) व त्यांचे इतर तीन अनोळखी साथीदार अशा पाच जणांविरोधात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिस कर्मचारी मोटे चारचाकी गाडीतून धानोरी जकात नाक्याजवळील प्रतीक मटण शॉप येथे आले होते. त्यांनी आपली गाडी तेथील पेट्रोल पंपाकडे जाणार्या रस्त्यावर पार्क केली होती. त्या वेळी खांदवे याने दुचाकीवर येऊन मोटे यांना गाडी बाजूला काढून घेण्यास सांगितले.
मोटे यांनी आपण पोलिस असल्याचे सांगून खांदवेला थोडे थांबण्यास सांगितले. कालिदास व माऊली या दोघांनी दुचाकी मोटे यांच्या गाडीला आडवी लावून हुज्जत घालण्यास सुरूवात केली. त्यातून मोटे यांना मारहाण करण्यात आली. तसेच इतर आरोपींना बोलावून मोटे यांना जिवे मारण्याची धमकी देऊन फिर्यादीच्या डोक्यात पाठीमागून सिमेंट ब्लॉक घातला. यात मोटे जखमी झाल्याचे फिर्यादित म्हटले आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक लहाने करीत आहेत.