इचलकरंजीतील जर्मनी टोळीच्या तिघांना अटक

इचलकरंजीतील जर्मनी टोळीच्या तिघांना अटक
Published on
Updated on

यड्राव, पुढारी वृत्तसेवा : इचलकरंजीतील कुख्यात जर्मनी टोळीच्या 9 जणांनी शनिवारी रात्री शहापूर येथील रिअल इस्टेट व्यावसायिक सरदार अमिन मुजावर (48, रा. गैबान रेसिडेन्सी, म्हसोबा मंदिरमागे, शहापूर) यांना 11 लाख 35 हजार रुपयांना लुटले होते. या गुन्ह्यातील संशयित रुपेश पंडित नरवाडे (23, रा. दत्तनगर कबनूर), सिद्धू जटाप्पा पुजारी (22) व अरबाज महंमद हनीफ शेख (24, दोघे रा. फकीरमळा जवाहरनगर इचलकरंजी) यांना रविवारी रात्री उशिरा पोलिसांनी अटक केली. त्यांना सोमवारी न्यायालयासमोर हजर केले असता 5 दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले.

कोयत्याचा धाक दाखवत अपहरण करून, पेट्रोलने जाळून मारण्याची धमकी देऊन तसेच महापुरुषांबद्दलचा आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन जर्मनी टोळीने 19 तोळे सोन्याच्या दागिन्यांसह चार लाख रुपये रोख असा एकूण 11 लाख 35 हजार रुपयांचा मुद्देमाल लुटल्याची घटना घडली होती. फिल्मी स्टाईलने घडलेल्या या घटनेने इचलकरंजी परिसरात खळबळ उडाली होती.

पोलिसांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, शहापूर, गावभाग, शिवाजीनगर पोलिसांची चार पथके नेमून संशयितांचा शोध सुरू केला होता. या गुन्ह्यातील रुपेश नरवाडे, सिद्धू पुजारी व अरबाज शेख या संशयितांना इचलकरंजी परिसरातून अटक केली.

पोलिसांनी न्यायालयासमोर हजर करून गुन्ह्यातील इतर अन्य साथीदार, गुन्ह्यासाठी वापरलेले एक चारचाकी, मोपेड व मोटारसायकल, हत्यारे, सोने व रोख रक्कम हस्तगत करण्यासाठी सात दिवसांची पोलिस कोठडी मागितली होती. न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. संशयित आनंद्या, मेहबुब यासह इतरांच्या शोधासाठी पोलिस पथके महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागाकडे रवाना करण्यात आली आहेत.

दरम्यान, काही संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असल्याचेही समजते. अपहरणकर्त्यांनी गुन्ह्यात वापरलेले चारचाकी वाहन सोमवारी सकाळी लालनगर परिसरात आढळले.

महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह व्हिडीओ बनवण्यासाठी मुजावर यांना धाक दाखविण्यासाठी रिव्हॉल्व्हर सारख्या हत्याराचा वापर झाला आहे का या अनुषंगानेही तपास सुरू असल्याचे समजते. अपहरण केल्यानंतर मुजावर यांना चारचाकीमध्ये घालून त्यांना पाच तास फिरवले, त्या ठिकाणांचे सीसीटीव्ही फुटेज मिळते का याबाबतही माहिती घेण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news