

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : आप नेते आणि दिल्ली सरकारचे मंत्री सत्येंद्र जैन तसेच तिहार तुरुंगाचे माजी महासंचालक संदीप गोयल यांच्यापासून आपल्या जीवाला धोका आहे, असा आरोप महाठग सुकेश चंद्रशेखर (Sukesh Chandrasekhar) याने एका पत्राद्वारे केला आहे. सुकेशचे हे तिसरे पत्र असून त्याने ते दिल्लीचे उपराज्यपाल व्ही. के. सक्सेना यांना लिहिले आहे. याआधीच्या पत्रांमध्ये त्याने सत्येंद्र जैन तसेच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कोट्यवधी रुपये दिल्याचा दावा केला होता.
जैन आणि गोयल यांच्याकडून वारंवार धमक्या येत असून त्यांच्यापासून माझ्या जीवीतास धोका आहे. या प्रकरणाच्या सीबीआय चौकशीचे आदेश दिले जावेत, असे सुकेशने या तिसऱ्या पत्रामध्ये म्हटले आहे. जर मी सर्वात मोठा घोटाळेबाज आहे तर माझ्याकडून 50 कोटी रुपये कशासाठी घेतले? आम आदमी पक्षासोबत व्यापार्यांना जोडून त्यांच्याकडून 500 कोटी रुपये जमविण्यास कशासाठी सांगितले? कर्नाटकातून राज्यसभेची उमेदवारी देण्याची ऑफर का दिली? अशी प्रश्नांची सरबत्ती केजरीवाल यांना उद्देशून सुकेशने याआधीच्या पत्रात केली होती. तुरुंगात संरक्षण देण्याच्या नावाखाली सत्येंद्र जैन यांनी माझ्याकडून 10 कोटी रुपये उकळले होते, असा सनसनाटी आरोप सुकेशने पहिल्या पत्रात केला होता. हे पत्र सार्वजनिक झाल्यापासून जैन आणि तिहार तुरुंगाचे माजी महासंचालक संदीप गोयल हे जीवे मारण्याच्या धमक्या देत आहेत, असे सुकेशचे म्हणणे आहे.
हेही वाचा