

काकडी केवळ उन्हाळ्यातच खावी असे नाही. तसे पाहता सर्व ऋतूंमध्ये काकडी उपलब्ध असते. बर्याचदा काकडी सॅलडमध्ये खाल्ली जाते. काकडीमध्ये वजन कमी करण्यास आणि संपूर्ण आरोग्यास चालना देण्यासाठी पुरेसे घटक आहेत. मुख्यतः काकडीमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त (सुमारे 96 टक्के) आणि कॅलरीजचे प्रमाण कमी असल्याने वजन कमी करण्यासाठी ती फायदेशीर ठरते. त्यामुळे आपल्या रोजच्या आहारात काकडीचा समावेश करणे फायदेशीर ठरू शकते. काकडीच्या सेवनाने होणारे हे काही लाभ…
काकडीत चरबी घटवण्यासह भरपूर पौष्टिक गुणधर्म आहेत. त्यामुळे ते निरोगी जीवनशैलीचा एक महत्त्वाचा घटक बनतात.
आरोग्यासाठी योग्य हायड्रेशन महत्त्वाचे आहे. आपल्या शरीरातील रोजची पाण्याची गरज पूर्ण करण्यासाठी काकडी महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. त्यात नैसर्गिक डिटॉक्सिफिकेशन गुणधर्मही आहेत; ज्यामुळे शरीरातील हानिकारक विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत होते.
काकडीत दाहकविरोधी गुणधर्म असतात आणि त्यात पोटॅशियम व मॅग्नेशियम यासारखी संयुगे असतात; जी निरोगी रक्तदाब पातळी राखण्यासाठी फायदेशीर असतात. हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधीच्या रोगांचा धोका ती कमी करतात. फायबर कोलेस्ट्रॉलचे व्यवस्थापन करते. बर्याच अभ्यासांमध्ये काकडी आणि रक्तदाब यांच्यात संबंध आढळला आहे. कारण-काकडी रक्तवाहिन्यांची रुंदी (व्हॅसोडिलेशन) वाढवते. 2017 च्या इंडोनेशियन अभ्यासात, उच्च रक्तदाब असलेल्या 20 वृद्ध व्यक्तींनी 12 दिवस काकडीचा रस प्यायल्याने त्यांच्या रक्तदाबाच्या पातळीत लक्षणीय घट झाल्याचे दिसून आले.
काकडीत आढळणारे सिलिका द्रव्य कोलेजन उत्पादनास प्रोत्साहन देते; ज्यामुळे त्वचा निरोगी आणि तेजस्वी होते. काकडीच्या सेवनामुळे डोळ्यांभोवतालचा फुगीरपणा आणि काळी वर्तुळे कमी होण्यास मदत होते.
काकडीमधील व्हिटॅमिन के हे हाडांचे आरोग्य सुधारण्यास मदत करते; शिवाय फॅ्र क्चर आणि ऑस्टिओपोरोसिसचा धोका कमी करते.
काकडीत ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो; ज्यामुळे मधुमेह असलेल्या लोकांसाठी किंवा रक्तातील साखरेची पातळी स्थिर ठेवू इच्छिणार्यांसाठी ती योग्य मानली जाते. एक कप काकडीत कॅलरीजचे प्रमाण 16 टक्के असते. काकडीमधील क्युकरबिटासिन्स इन्सुलिनचे उत्पादन आणि यकृतातील ग्लायकोजेनचे चयापचय नियंत्रित करण्यास मदत करतात.
काकडी ही फायटोन्यूट्रिएंटस्चा चांगला स्रोत आहे. त्यामध्ये फ्लेव्होनॉइडस्, लिग्नॅन्स व ट्रायटरपेन्स आहेत; ज्यात अँटिऑक्सिडंटस्, दाहकविरोधी तत्त्व आणि कर्करोगविरोधी फायदे आहेत.