Lok Sabha Election 2024 : बेळगाव-चंदगडसाठी होता एकच खासदार!
बेळगाव, चंदगड, गडहिंग्लज, गोकाक, पारसगड अशा मराठी आणि कन्नड तालुक्यांचा खासदार एकच होता, असे कोणी सांगितले, तर विश्वास बसणे कठीण. पण तसे झालेले आहे. 1952 च्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमाभागातील सात तालुक्यांचा समावेश असलेला एक मतदारसंघ होता. तो म्हणजे बेळगाव दक्षिण लोकसभा मतदारसंघ. तत्कालीन मुंबई प्रांतात समाविष्ट असलेल्या बेळगाव-चंदगड सीमाभागासाठी एकच खासदार होता!
स्वातंत्र्यानंतर पहिली लोकसभेची पहिली निवडणूक 23 मार्च 1952 रोजी झाली. याला 72 वर्षांचा कालावधी शनिवार दि. 23 रोजी होणार आहेत. सध्या कोल्हापूर जिल्ह्यात समाविष्ट असणारे चंदगड, गडहिंग्लज तालुके बेळगाव दक्षिण लोकसभा मतदार संघात समाविष्ट होते. त्याशिवाय गोकाक, रामदुर्ग आणि पारसगड हे कन्नडबहुल तालुकेही याच मतदारसंघात होते. देशात सध्या अशी स्थिती कुठेही नाही. सगळे मतदारसंघ राज्यनिहाय आहेत.
मतदार संघात मराठी व कन्नड मतदारांची संख्या जवळजवळ समान होती. निवडणुकीत राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार शंकरगौडा वीरण्णगौडा पाटील यांना 1 लाख 19 हजार 521 मते घेत विजय मिळविला. विरोधी उमेदवार जकाती यांना 70 हजार 43 मते मिळाली. 49 हजार 478 मतांनी त्यांचा पराभव झाला. त्यानंतर दुसर्या लोकसभा निवडणुकीत भाषावार प्रांतरचना करण्यात आली. नवीन राज्ये अस्तित्वात आली.

