

कण्हेर; पुढारी वृत्तसेवा : अवकाळी पावसाने शनिवारी रात्री कण्हेरसह सातारा तालुक्यात काही ठिकाणी धुमाकूळ घातला. या पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान तर झालेच पण या पावसाने अक्षरश: थरकाप उडवला. सातार्यासह तालुक्यातील अनेक गावांमध्ये रात्रीच्या वेळी जनजीवन भेदरून गेले. वीजांचा प्रचंड कडकडाट अन् लखलखाट वातावरण भयावह करत होता. त्यातच अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडीत झाल्याने नागरीकांच्या त्रासात भरच पडली.
सातारा शहरासह तालुक्यातील कण्हेर, वर्ये, संभाजीनगर, कोडोली, लिंब, म्हसवे, शिवथर, मालगाव परिसरात शुक्रवारी रात्री अवकाळी पावसाने थैमान घातले. अचानक कोसळलेल्या पावसाने जनजीवन कोलमडले. ऊसतोड कामगार व धनगरांच्या पालात पावसाचे पाणी घुसून संसारोपयोगी साहित्य भिजून मोठे नुकसान झाले आहे.
अवकाळी पावसाने ऊसतोड मजुरांच्या पालावरील खोपींमध्ये पावसाचे पाणी घुसून प्रापंचिक साहित्य भिजले. तसेच ऊसतोड मजुरांनी आणलेले काही ठिकाणचे धान्यही भिजल्याने नुकसान झाले. गळीत हंगाम सुरू झाल्याने सर्वत्र ऊस तोड सुरू आहे. ऊस तोडीच्या कालावधीतच रात्री पावसाने थैमान घातल्याने उसाचे तसेच ज्वारीचेही पीक भुईसपाट झाले.
सध्या परिसरात भात काढणी युद्धपातळीवर सुरू आहे. भात झोडपून भात्याने तसेच शेतामध्ये पडून आहेत. जोरदार पावसामध्ये भाताच्या खचरामध्ये पाणी साचून शेतातील भात्याने बुडून नुकसान झाले आहे. आधीच पावसाच्या कमतरतेने जनावरांच्या चाराचा प्रश्न निर्माण झाला असताना त्यातच भाताच्या जनावरांचा चारही भिजल्याने चारा काळा पडून वाया जाण्याच्या मार्गावर आहे.
शनिवारी रात्री झालेल्या पावसाने वर्ये ते नेर्ले या मुख्य मार्गावर बाभळीचे झाड उन्मळून पडले आहे. यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. येथील वाहनधारकांना ये-जा करण्यासाठी लांब पाल्याचा वापर करावा लागला. या मार्गावरून प्रवास करताना नागरिकांना अवघड होत आहे. या ठिकाणाहून जाताना काही नागरिक आपली दुचाकी उचलून पलीकडे नेऊन ये-जा करताना दिसत होते.