

जीवनावरचं प्रेम शिकवणार्या मंगेश पाडगावकरांचा जन्म कोकणातल्या वेंगुर्ल्याजवळच्या उभादांडा या गावी झाला आणि आता त्याच गावाला महाराष्ट्र शासनाने कवितांचे गाव म्हणून घोषित केले आहे. त्यांचा झालेला गौरव हा कवितेचं गाव या माध्यमातून स्थायी स्वरूपात नव्या पिढीपर्यंत पोहोचू शकेल.
हे गाणं कानावर पडल्याबरोबर कविवर्य मंगेश पाडगावकरांची हमखासपणे आठवण येते. जन्माला येणारा मनुष्य आपल्या वाट्याला आलेले आयुष्य जगतच असतो. परंतु त्या जगण्याला जर आनंदाचा, निसर्गाचा, समाधानाचा स्पर्श असेल तर ते जगणेच एक जीवनगाणे होते आणि अशा जगण्यावर सहजपणे, अगणित वेळा, शतदा प्रेम करण्याची ऊर्मीही निर्माण होते. कोकणासारखा निसर्ग आणि जीवनातले नितांत समृद्ध अनुभव यांची साथसंगत लाभलेल्या पाडगावकरांनी असेच दिलखुलासपणे आपल्या जगण्यावर प्रेम तर केलेच आणि समस्त मराठी अभिजनांना, रसिकांना आयुष्यावर मनापासून प्रेम करण्याचा एक मोठा संदेशही ते देऊन गेले. जीवनावरचं प्रेम शिकवणार्या मंगेश पाडगावकरांचा जन्म कोकणातल्या वेंगुर्ल्याजवळच्या उभादांडा या गावी झाला आणि आता त्याच गावाला महाराष्ट्र शासनाने कवितांचे गाव म्हणून घोषित केले आहे. सरकारच्या या निर्णयातून स्वाभाविकपणे पाडगावकरांच्या या जन्मगावावरही मराठी रसिकांचं प्रेम अभिव्यक्त करण्याची संधीच प्राप्त होत आहे. 10 मार्च 1929 हा पाडगावकरांचा जन्मदिवस. गेल्या 10 मार्चला या संकल्पनेची अधिकृतपणे घोषणा झाली.
लहानपणापासूनच साहित्य, काव्य किंवा निसर्गाशी मनोमन संवाद साधण्याची ऊर्मी पाडगावकरांमध्ये होती. प्रामुख्याने महाविद्यालयीन जीवनात आणि नंतरच्या नोकरी व्यवसायाच्या काळात त्यांचा काव्यनिर्मितीचा मुक्तछंद खर्या अर्थाने बहरला. काव्यासंदर्भात अशी व्याख्या केली जाते की, 'वाक्यं रसात्मकं काव्यम्' म्हणजे साध्या वाक्यात जरी एक विशिष्ट भाव असेल तर ते काव्य होते. या व्याख्येचा विचार केला तर पाडगावकरांच्या प्रत्येक ओळीमध्ये भावभावना ओतप्रोत भरलेल्या असायच्या आणि म्हणूनच त्यांनी लिहिलेले प्रत्येक वाक्य हे काव्य होऊन जायचे. त्यांच्या पावसांवरच्या कवितेचा 'पाऊसगाणे' हा संग्रह राजहंस प्रकाशनाने प्रकाशित केला होता. त्यासंदर्भात श्रीनिवास कुलकर्णी यांनी एके ठिकाणी असे म्हटले होते की, पाडगावकरांनी पावसाची इतकी अकल्पित रूपं प्रकट केली आहेत की, पाऊस हा नुसता शब्द त्यांनी लिहिला की, तो गाऊ लागतो आणि त्या एका शब्दाच्या कवितेतला भारलेपणा गाण्याची आणि कवितेची सुरावट अंतर्मनाला ऐकवू लागतो.
पाडगावकरांचे हे काव्यविश्व इतकं विविधांगी आहे की, बालपणापासून ते वृद्धापकाळापर्यंतचा एक जीवनानुभव त्यांच्या विविध कवितांमधून प्रत्ययाला येतो. त्यांच्या कविता म्हणजे ज्या जीवनावर ते प्रेम करायला सांगतात, त्याच जीवनविषयक कवितांचं सर्वार्थाने डवरलेलं, फळांनी बहरलेलं, परिपक्व अशा फळांचं झाडच ते लावून गेले. त्याच वृक्षाच्या छायेत आता त्यांच्याच जन्मगावी त्यांच्या सर्व कविता रसिकांना पुन्हा भेटतील आणि पुनर्भेटीचा पुनर्प्रत्ययसुद्धा देतील. पाडगावकरांना पुनर्भेट नावानं आत्मकथन लिहायचं होतं. ते राहून गेलेलं त्यांचं काम कवितांचं गाव संकल्पनेतून थोड्या वेगळ्या प्रकाराने का होईना, पण होऊ शकेल असं वाटतं.
काही वर्षापूर्वी भिलार हे पहिलं पुस्तकांचे गाव म्हणून जाहीर झालं. त्याच कल्पनेचा विस्तार म्हणून आता हे कवितांचं पहिलं गाव आकाराला येतं आहे. स्वाभाविकपणे पाडगावकरांचं एकूणच साहित्य विश्वातलं योगदान मोठं होतं. साहित्य अकादमीच्या पुरस्कारापासून ते महाराष्ट्र भूषण पुरस्कारांपर्यंत अनेक प्रकारे त्यांचा झालेला गौरव हा कवितेचं गाव या माध्यमातून बर्याच स्थायी स्वरूपात नव्या पिढीपर्यंत पोहोचू शकेल. असं म्हणतात की, अशाच प्रकारचं गाव बा. सी. मर्ढेकरांच्या सातारा जिल्ह्यातील मर्ढे या गावी करण्याची घोषणा झाली होती. सातारा जिल्ह्यातही जकातवाडी येथे घरांच्या भिंतींवर प्रसिद्ध कवींच्या कविता लावून कवितांचं गाव साकार करण्याचा प्रयत्न झाला. आता पाडगावकरांच्या उभादांडा या गावी पाडगावकरांच्या सर्व कवितांशी भेट घडवणारं दालन उभं राहील. दरवर्षी तिथे काही ना काही कार्यक्रम पाडगावकरांच्या स्मृत्यर्थ होत राहतील. गावाला एक मोठी आकर्षक प्रवेश कमानही केली जाणार आहे.
पुस्तकांच्या गावाची संकल्पना इंग्लंडमध्ये वेल्स येथे हे ऑन वे याठिकाणी राबवली गेली आहे. भिलारमध्ये तो प्रकल्प सुरू झाला आणि आता कवितेच्या गावाचाही उपक्रम राबवला जातो आहे. एकूणच मराठी काव्यविश्व हे अनेक अर्थांनी समृद्ध आहे. केशवसुत, गोविंदाग्रज, बा. सी. मर्ढेकर, भा. रा. तांबे, कवी अनिल, ग्रेस अशा अनेक कवींनी समृद्ध असे हे कव्यविश्व. विंदा करंदीकर, वसंत बापट आणि पाडगावकर या त्रिकुटाचे अनेक ठिकाणी काव्याचे कार्यक्रमही झाले आहेत. कवी अनिलांनी त्यांच्या दशपदी काव्य संग्रहामध्ये
असे काहीतरी आगळे लावण्य केव्हा
कधीकाळी दिसून जाते
वेगळ्या सौंदर्य पर्युत्सुक जीवा
जन्मांतरीचे सांगत नाते॥
कवी अनिलांची आगळ्या लावण्याची ही कल्पना पाडगावकरांच्याही संदर्भात लागू होते आणि प्रेम, निसर्गसौंदर्य यांच्याशी असलेलं जन्मांतरीचं नातंच पाडगावकरही आपल्या कवितांमधून सांगतात. म्हणूनच त्यांचे जन्मठिकाण कवितांचं जन्मगाव होणं एकूणच निसर्गाबरोबरच्या नात्यालाही घनिष्ठ करणारं ठरतं.