सांगलीच्या तुरुंगाची सुरक्षा धोक्यात! दोन कैद्यांचे पलायन

सांगलीच्या तुरुंगाची सुरक्षा धोक्यात! दोन कैद्यांचे पलायन
Published on
Updated on

सांगली : येथील जिल्हा कारागृहाची (तुरुंग) सुरक्षा धोक्यात आली असल्याचे चित्र आहे. गेल्या वर्षभरात दोन कैद्यांनी पलायन केले. तुरुंगाच्या तटरक्षक भिंतीवरून कैद्यांना दारू, गांजाच्या पुड्या फेकण्याचे प्रकार आजही सर्रास सुरूच आहेत. सुरक्षेचा भार पेलताना प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. 235 क्षमता असलेल्या या तुरुंगात सध्या 575 कैदी आहेत. क्षमता ओलांडली असल्याने तुरुंग 'हाऊसफुल्ल' झाला आहे. हा तुरुंग कवलापूर (ता. मिरज) येथे स्थलांतर करण्याचा प्रश्न शासनदरबारी प्रलंबितच आहे.

सुरक्षा धोक्यात

तुरुंगापासून दोनशे मीटर परिसरात बांधकामे असू नयेत, असा नियम आहे. मात्र, सभोवताली टोलेजंग इमारती झाल्या आहेत. कैद्यांना दारू, गांजा, नशेच्या गोळ्या संरक्षक भिंतीवरून फेकण्याचे प्रकार सुरू आहेत. चारच दिवसांपासून तुरुंगातील टॉवर क्रमांक दोनखाली दारूच्या दोन बाटल्या, दोन मोबाईल व गांजा सापडला. कैद्यांची संख्या वाढत असल्याने बरॅक कमी पडू लागले आहेत. वाढत्या गुन्हेगारीमुळे कैद्यांची संख्या वाढत आहे. अनेकदा कैद्यांमध्ये मारामारीचे प्रकार घडत आहेत. सध्या कैद्यांना झोपायला जागा नाही, अशी स्थिती आहे.

कैद्यांचे पलायन

कैद्यांच्या सुरक्षेचा भार पेलण्यासाठी पुरेशी यंत्रणा नाही. 575 कैदी असताना किमान अधिकारी व कर्मचारी असा शंभर जणांचाही स्टाफ नाही. प्रत्येक कैद्यावर लक्ष ठेवणे अशक्य होत आहे. कैद्यांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत. 31 जुलै 2022 रोजी सुनील ज्ञानू राठोड (वय 26, रा. यळगूड, ता. सिंदगी, जि. विजापूर) या कैद्याने पलायन केले. खून प्रकरणात तो न्यायालयीन कोठडीत होता. अजूनही त्याचा सुगावा लागलेला नाही. बुधवारी सायंकाळी सदाशिव अशोक सनदे (25, आष्टा, ता. वाळवा) हा कैदी पळाला.

स्थलांतराचा प्रस्ताव धूळखात

तुरुंगाभोवती लोकवस्ती वाढली असल्याने ते धोक्याचे ठरले आहे. यासाठी हा तुरुंग कवलापूर (ता. मिरज) येथे स्थलांतर करण्याचा प्रस्ताव होता. तत्कालीन महानिरीक्षक मीरा बोरवणकर यांनीही कवलापूरच्या जागेची पाहणी केली होती. सध्याचा हा तुरुंग सहा एकर जागेत आहे. समोरासमोर दोन मजली इमारत आहे. यामध्ये चार बरॅक आहेत. महिला कैद्यांसाठी वेगळा बरॅक आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात कैद्यांना ठेवण्यासाठी वेगळ्या चार बरॅक होत्या; पण त्यांचा काहीच उपयोग केला जात नाही.

सीसीटीव्ही कॅमेर्‍याची नजर… तरीही!

तुरुंगात प्रत्येक ठिकाणी अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. तरीही कैदी पळून जाण्याच्या घटना घडतात, म्हणजे आश्चर्याची बाब आहे. सुनील राठोड हा कैदी तर तीन पोलिसांसमोर 25 फूट संरक्षक भिंतीवरून उडी मारून पळून गेला. सदाशिव सनदे हा कैदी बलात्काराच्या गुन्ह्यात होता. तो स्वयंपाक खोलीत पाणी भरण्याच्या निमित्ताने गेला. त्याच्यासोबत एखादा पोलिस जाणे गरजेचे होते. मात्र, कोणीच गेले नाही. स्वयंपाक खोली लहान आहे. त्यावर चढून तो पटवर्धन हायस्कूलच्या छतावर गेला आणि तेथून पळून गेला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news