

सोन्याच्या दरांनी भारतीय बाजारात 67 हजारांची ऐतिहासिक पातळी गाठल्याचे दिसून आले आहे. केवळ मार्च महिन्यात सोन्याच्या दरात सहा टक्क्यांची वाढ झाली आहे. सोन्याने गुंतवणूकदारांना कधीही निराश केले नाही. सोन्याच्या दरात 24 वर्षांत 600 टक्क्यांनी वाढ झाली आहे. आताही 67 हजारांवर पोहोचलेले सोने लवकरच 70 हजारांकडे झेपावेल, असे अभ्यासकांचे म्हणणे आहे.
संपूर्ण जगभरात सोन्याच्या दरात अचानक प्रचंड तेजी आली आहे. सोन्याच्या दरांनी सध्या ऐतिहासिक उच्चांकी पातळी गाठल्यामुळे गुंतवणूक म्हणून सोने खरेदी करणार्यांच्या गोटात आनंदाचे वातावरण आहे; तर लग्नसराई किंवा अन्य कारणांसाठी सोने खरेदी करणार्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे. पण सोन्यामध्ये अचानक इतकी तेजी येण्यामागचे कारण काय, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर सोने आणि शेअर बाजार यांचे विषम गुणोत्तरही मांडले जाते. म्हणजे असेे की, जगभरातील शेअर बाजारात जेव्हा घसरण होते तेव्हा सोन्याचे भाव वाढतात आणि बाजारात तेजीचा माहौल असतो तेव्हा सोन्याचे भाव पडलेले असतात, असे ढोबळमानाने इतिहासातील उदाहरणांवरून सांगितले जाते. चार वर्षांपूर्वी कोविड काळामध्ये जगभरातील शेअर बाजारांमध्ये ऐतिहासिक घसरण झाली होती तेव्हा सोन्याच्या भावांमध्ये मोठी उसळी दिसून आली होती. अर्थात या दोन्हींवर परिणाम करणारे काही घटक हे समसमान असले तरी त्यापलीकडे जाऊन विचार करता सोन्याच्या दरांवर इतरही काही घटकांचा प्रभाव दिसून येतो.
ताज्या दरवाढीची कारणे जाणून घेतानाच नेमकी किती वाढ झाली आहे हे आधी पाहूया. मार्चमध्ये तर सोन्याच्या दरात सुमारे 6 टक्के म्हणजेच जवळपास 3800 रुपयांची वाढ झाली आहे. सद्य:स्थितीत सोन्याचे भारतीय बाजारपेठेतील भाव हे सुमारे 65 ते 68 हजारांपर्यंत पोहोचले आहेत. ही आतापर्यंतची सर्वांत उच्चांकी पातळी आहे. गेल्या वर्षभराचा विचार केल्यास सोन्याच्या किमतीत 11,000 रुपयांहून अधिक वाढ झाली आहे. याचा अर्थ गेल्या एका वर्षात गुंतवणूकदारांना 20 टक्क्यांहून अधिक परतावा मिळाला आहे. परदेशी बाजारातही सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. कॉमेक्सवर सोन्याच्या किमतीने प्रति तोळा 2200 डॉलरची पातळी ओलांडली आहे.
आजघडीला अमेरिकेच्या खजिन्यात 8133 टन, जर्मनी 3353 टन, इटलीकडे 2452 टन, फ्रान्सकडे 2437 टन, रशियाकडे 2333 टन, स्वित्झर्लंडकडे 1040 टन, जपानकडे 847 टन, भारताकडे 801 टन, नेदरलँड 612 टन, तुर्कस्तान 440 टन, तैवान 424 टन सोने आहे. सोने ही एक बहुलोकप्रिय कमोडिटी आहे. त्यामुळे सोन्याचे अर्थकारण हे प्रामुख्याने मागणी आणि पुरवठा यावर अवलंबून असते. सोन्याची मागणी वाढल्यास दरही वाढत जातात; याउलट मागणी आक्रसली आणि सोन्याचा पुरवठा वाढला तर किंमत कमी होत जाते. याखेरीज जागतिक आर्थिक परिस्थितीचाही सोन्याच्या किमतीवर परिणाम होतो. आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्था खराब कामगिरी करत असल्यास, गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणूक पर्याय म्हणून सोन्याकडे पाहतात आणि त्यामुळे सोन्याच्या किमतीत वाढ होते. अलीकडील काळात जगभरातील वातावरण पाहिल्यास आखाताच्या भूमीवर आणि युरोपच्या भूमीवर दोन घनघोर युद्धे सुरू आहेत. रशिया-युक्रेन युद्धाला नुकतीच दोन वर्षे पूर्ण झाली आहेत; तर इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धालाही पाहता पाहता चार महिन्यांहून अधिक काळ उलटला आहे. या दोन्ही युद्धांचे जगाच्या अर्थकारणावर नकारात्मक परिणाम झाले आहेत. जागतिक पुरवठा साखळीतील विस्कळीतपणामुळे महागाई गगनाला भिडल्याने जगभरातील केंद्रीय मध्यवर्ती बँकांनी व्याज दरात वाढ करण्यास सुरुवात केली होती. परंतु याचा विकास दरावर परिणाम होत असल्याचे लक्षात आल्यामुळे आणि महागाईमध्ये काहीशी घट होऊ लागल्यामुळे आता अमेरिकन फेडरल रिझर्व्हकडून व्याज दर कपातीचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे डॉलर इंडेक्समध्ये काहीशी घसरण झाली आहे. याचा परिणाम सोन्याच्या दरवाढीवर झाल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. याखेरीज जगातील बहुतेक देशांच्या केंद्रीय बँकांकडून सोन्याच्या मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या खरेदीमुळेच सोन्याचे भाव सर्वोच्च पातळीवर पोहोचले आहेत, हे लक्षात घेतले पाहिजे.
विशेषतः सध्याच्या सुवर्णझळाळीमध्ये चीनचे योगदान मोठे असल्याचे समोर आले आहे. चीनची मध्यवर्ती बँक आपला सोन्याचा साठा वाढवत आहे. चीनच्या सोन्याच्या साठ्यात 15 व्या महिन्यात तेजी आली आहे. चीनचा सोन्याचा साठा आता 2245 टनावर पोहोचला आहे. ऑक्टोबर 2022 च्या तुलनेत चीनच्या सोन्यात 300 टनांनी वाढ झाली आहे. चीनच्या मध्यवर्ती बँकेसोबतच चीनचे नागरिकही मोठ्या प्रमाणावर सोने खरेदी करत आहे. जगात चीन हा सोन्याचा मोठा खरेदीदार आहे. सोन्याच्या दरात वाढ होत असतानाही चिनी लोक नाणी, सोन्याच्या लगडी, दागिने खरेदी करत आहेत. कारण चीनच्या शेअर बाजार व मालमत्ता विभागाची अवस्था खराब आहे. त्यामुळे चिनी लोक आपली संपत्ती वाचवण्यासाठी सोन्यात मोठी गुंतवणूक करत आहेत.
अलीकडील काळात अमेरिकी डॉलरच्या तुलनेत सोनेखरेदी करण्यावर चीनचा अधिक भर आहे. कच्च्या तेलाचा साठा असलेले अनेक आखाती देशही सोने खरेदी करीत आहेत. 'पेट्रो डॉलर' हे अमेरिकेकडील प्रभावी अस्त्र असले, तरी डॉलरला अनेक पर्याय वेगाने समोर येत आहेत. अशा स्थितीत जागतिक अर्थव्यवस्थेत डॉलरच्या तुलनेत सोने अधिक लाभदायक ठरत आहे.
अमेरिकेत येणार्या ज्या वस्तूंवरील आयातशुल्क वाढले आहे, त्यामुळे अनेक देशांना डॉलरकेंद्रित व्यवस्थेपासून दूर जाण्यास प्रवृत्त केले आहे. अशा वेळी नजीकच्या भविष्यात सोन्याची स्थिती मजबूतच राहील, अशी शक्यता आहे. चीन आणि रशियासह अमेरिकेला विरोध करणार्या अनेक देशांकडून डॉलरचे महत्त्व कमी करण्याचा होत असलेला प्रयत्नही सोन्याचे भाव वाढण्यास कारणीभूत ठरला आहे. हे देश डॉलरपेक्षा सोन्याला अधिक महत्त्व देत असून, विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या सोन्यापैकी बरेचसे सोने हे देश खरेदी करीत आहेत.
भारताचा विचार करता सोन्याच्या जागतिक मागणीतील एक तृतीयांश मागणी भारताकडून आहे. भारतात सोन्याची 90 टक्के मागणी दागिन्यांसाठी आणि देवस्थानांमध्ये दान करण्यासाठी असते. सोन्याचे अलंकार धारण करणे ही आपली संस्कृती आहे. श्रीमंतांकडून सोन्यात केल्या जात असलेल्या मोठ्या गुंतवणुकीबरोबरच मध्यमवर्गीयांकडूनही सोन्यात सातत्याने गुंतवणूक केली जात आहे. या वर्गातील नागरिक छोट्या प्रमाणावर बचत करून सोन्याचे लहान-सहान दागिने, वळी, मणी खरेदी करत राहतात आणि भविष्याची तरतूद करू पाहतात. परिणामी सोन्याची खरेदी वाढून दरवर्षी देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पादनाचा (जीडीपी) जवळपास तीन टक्के भाग सोनेखरेदीच्या स्वरूपात अनुत्पादक भांडवलात रूपांतरित होत आहे. सोने खरेदी हा भारतीयांच्या जुन्या सवयीचा भाग आहे, असे गृहित धरून जर आपण सोन्याची मागणी वाढत असल्याचे नाकारले, तर आपले विश्लेषण चुकीचे ठरेल. देशात सध्या वाढत असलेल्या सोन्याच्या मागणीचे आणखीही एक कारण आहे. बचतीच्या वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवणूक केल्यास अपेक्षेइतका परतावा मिळत नाही. वेगवेगळ्या अल्पबचत योजनांवरील व्याज मागील काळाशी तुलना करता बर्याच प्रमाणात कमी झाले आहे. दुसरीकडे शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमीची असते ही धारणा आजही कायम आहे. त्यामुळे जुनेजाणते लोक आजही सोन्यामध्ये पैसा गुंतवण्याला प्राधान्य देतात.
वास्तविक भारतासारख्या विकसनशील देशात सोन्यातील गुंतवणूक वाढणे योग्य नाही. कारण ही उत्पादक गुंतवणूक नव्हे. अशा स्थितीत सोन्याची मागणी कमी करण्यासाठी प्रभावी प्रयत्न केले जाण्याची गरज आहे. त्यासाठी वेगवेगळ्या बचतीच्या आणि गुंतवणुकीच्या योजना अधिक आकर्षक आणि सुरक्षित कराव्या लागतील. आज नागरिकांमध्ये वाढलेल्या एसआयपीच्या सवयीमुळे म्युच्युअल फंडांमध्ये मोठ्या प्रमाणावर पैसा येत असला तरी त्यालाही सुरक्षिततेचे कोंदण द्यायला हवे. अलीकडेच सेबीच्या अध्यक्षा माधवी पुरी बूच यांनी काही स्मॉल व मिड कॅप समभागांचे वधारलेले भाव हे बुडबुडा असल्याचे दर्शवणारे असल्याचे विधान केले होते. शेअर बाजारातील पडझडींमुळे गुंतवणूकदारांमध्ये असुरक्षितता निर्माण होत असते. याउलट सोन्याने गुंतवणूकदारांना कधीही निराश केले नाही.
सोन्याच्या दरात 24 वर्षांत 600 टक्क्यांनी वाढ झाली आहे. आताही 67 हजारांवर पोहोचलेले सोने लवकरच 70 हजारांकडे झेपावेल, असे अभ्यासकांचे म्हणणे आहे. अमेरिकन फेडरल रिझर्व्हने अद्याप व्याज दर कपातीची घोषणा केलेली नाही; पण जेव्हा पहिल्या व्याज दर कपातीचा निर्णय जाहीर केला जाईल, त्यानंतर सोन्याच्या दरात उसळी दिसू शकते.