

कोल्हापूर : 'ग्लोबल हंगर इंडेक्स'च्या मानांकनानुसार देशातील अन्नसुरक्षा निर्देशांक चिंताजनक पातळीवर जाऊन पोहोचलेला आहे. अन्नसुरक्षेच्या बाबतीत देशातील ओडिशा हे राज्य सर्वाधिक 'भुकी' गणले गेले आहे; तर लडाख हे राज्य याबाबतीत सर्वाधिक 'सुखी' म्हणून सूचिबद्ध करण्यात आले आहे. अन्नसुरक्षेच्या बाबतीत महाराष्ट्राची अवस्था मात्र समाधानकारक असल्याचे दिसून येत आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने निश्चित केलेल्या निकषानुसार जगभरातील देशांचे जागतिक भूक निर्देशांक निश्चित करण्यात येतात. या निर्देशांकानुसार त्या त्या देशातील अन्नसुरक्षेची स्थिती समजण्यास मदत होते. या निकषानुसार 1 ते 9 गुणांक हे त्या देशातील अन्नसुरक्षा चांगली किंवा उत्तम असल्याचे दर्शवितात. 10 ते 19.9 समाधानकारक, 20 ते 34 धोकादायक, 35 ते 49.9 चिंताजनक आणि 50 च्या वरील गुणांक हे त्या देशातील अन्नसुरक्षा निर्देशांक अतिचिंताजनक असल्याचे सूचित करतात. 'ग्लोबल हंगर इंडेक्स'ने भारताला 28.7 गुणांक बहाल केला आहे. यावरून देशातील अन्नसुरक्षा निर्देशांक धोकादायक पातळीवर पोहोचल्याचे स्पष्ट झाले आहे. जगातील पाचवी महासत्ता असलेल्या देशाच्या द़ृष्टीने ही बाब चिंताजनक समजायला हवी. केंद्रीय अन्न मंत्रालयाच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्याभूक निर्देशांकानुसार देशातील अनेक राज्यांची अवस्थाही चिंताजनक असल्याचे स्पष्ट झाले आहे. (World Food Safety Day)
वेगवेगळ्या कारणांनी जगभरात वाया जाणार्या अन्नाचे प्रमाण माणसी सरासरी 100 ग्रॅम इतके आहे. जगाची लोकसंख्या 800 कोटी, प्रत्येकाने 100 ग्रॅम अन्न वाया घालविले, असे गृहीत धरले तर वाया जाणार्या अन्नाचे प्रमाण होते तब्बल 80 कोटी टन, म्हणजे जगभरात दररोज 80 कोटी टन अन्न चक्क कचर्यात जाते. विशेष म्हणजे जगभरातील कुपोषित लोकांची संख्याही साधारणत: तेवढीच आहे. केवळ कचर्यात जाणारे हे अन्न जरी वाचविले, तरी जगभरातील कुपोषणाची समस्या किमान काहीअंशी कमी व्हायला मदत होईल. वाया जाणार्या या अन्नाचा सदुपयोग केल्यास जगभरातील भूकबळीही कमी होण्यास हातभार लागू शकतो. (World Food Safety Day)
अन्नसुरक्षेच्या बाबतीत एकूण जगभरातील लोकांची अवस्था चिंतनीय स्वरूपाची आहे. कुठे अन्न नाही म्हणून लोक भुकेने तडफडून मरताहेत, तर कुठे अन्नाच्या 'ओव्हरडोस'मुळे करोडो लोकांना वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. भूकबळी ही अन्नसुरक्षा यंत्रणेची काळी बाजू आहे, तशीच स्थूलपणा, लठ्ठपणा याही अन्नातूनच लाभलेल्या 'देणग्या' आहेत. याबाबतीत जगभरातील आकडेवारी…
1) ओडिशा, 2) उत्तर प्रदेश, 3) आंध्र प्रदेश, 4) गुजरात, 5) त्रिपुरा 6) दादरा-नगर-हवेली, 7) मध्य प्रदेश,
8) बिहार, 9) कर्नाटक, 10) तामिळनाडू, 11) हिमाचल प्रदेश, 12) झारखंड, 13) केरळ, 14) तेलंगणा, 15) सिक्कीम, 16) महाराष्ट्र, 17) पश्चिम बंगाल, 18) राजस्थान, 19) पंजाब, 20) हरियाणा, 21) दिल्ली, 22) छत्तीसगड, 23) नागालँड, 24) उत्तराखंड, 25) गोवा, 26) मिझोराम, 27) आसाम, 28) अरुणाचल, 29) लक्षद्वीप 30) जम्मू-काश्मीर 31) अंदमान, 32) मणिपूर, 33) मेघालय, 34) लडाख. (World Food Safety Day)