मेंदूतील चिपने काय साधणार?

मेंदूतील चिपने काय साधणार?
Published on
Updated on

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असणारा एलॉन मस्क सध्या न्यूरालिंक कंपनीमुळे पुन्हा चर्चेत आला आहे. या कंपनीने मानवी मेंदूमध्ये यशस्वीरीत्या चिप (न्यूरल) बसवली आहे. यामुळे शरीरावर नियंत्रण ठेवण्यात येणार आहे. माणसांच्या मेंदूमध्ये चिप बसवल्यानंतर ते अनेक गोष्टी करू शकतील जे ते सामान्यपणे करू शकत नाहीत. अवयवांवर नियंत्रण गमावलेल्या लोकांना चिप इम्प्लांटचा फायदा होऊ शकतो, असा दावा करण्यात येत आहे.

विज्ञानाचे चमत्कार आपण यापूर्वी पाहिले आणि पुढेही पाहत राहू. विज्ञानातील नवनवीन शोध आणि संशोधनामुळे मानवी जीवन सुलभ होण्यास हातभार लागला आहे आणि जगही बदलले आहे. शास्त्रीय शोध हे मानवी जीवनाला वरदान ठरले आहे. अर्थात, आगामी काळात असे बदल होणार आहेत की, त्याचा काही दशकांपूर्वी विचार केला नव्हता. त्यापैकीच एक म्हणजे 'न्यूरल चिप'चे मानवी मेंदूतील प्रत्यारोपण होय. आतापर्यंत आपण संगणक, लॅपटॉप आणि अँड्रॉईड फोनची मदत घेऊन व्यवहार करत होतो; मात्र ही सर्व कामे नाण्यासारखे दिसणार्‍या एका उपकरणाच्या मदतीने म्हणजेच 'न्यूरल चिप'ने करता येणार आहेत. न्यूरल चिप मेंदूला जोडल्यानंतर माणसाचे काम अधिक सुसह्य होणार आहे. ही कमाल मस्कच्या कंपनीने केली आहे. नाण्याएवढे हे यंत्र एका चुटकीसरशी मेंदूचा अविभाज्य घटक होईल. अर्थात, ते कोठे बसविले हे संबंधित माणसाला कळणारही नाही. यापूर्वी मानवी मेंदूत चिप बसविली जाईल, असे म्हटले जात होते; मात्र मस्कच्या कंपनीने ही गोष्ट सिद्ध करून दाखविली आहे.

सप्टेंबर 2023 मध्ये मस्कच्या कंपनीला मानवावर प्रयोग करण्याची परवानगी मिळाली. न्यूरालिंकच्या मते, प्रयोग किंवा चाचणीसाठी सर्व्हाईकल स्पायनल कॉर्डला मार लागलेली व्यक्ती किंवा क्वाड्रिप्लोझिया असलेल्या व्यक्तीची निवड करण्यात आली. या चाचणीत सहभागी होणार्‍या व्यक्तीचे वय किमान 22 असणे गृहित धरले होते. वास्तविक, या चाचणीतून ठोस निष्कर्ष काढण्यासाठी आणखी सहा वर्षे लागू शकतात, असा अंदाज आहे. मस्कच्या नियोजनानुसार, ब्रेन कॉम्प्युटर इंटरफेसची रचना केली जात असून त्यानुसार त्याचे प्रत्यारोपण करून त्याचा मेंदूच्या नैसर्गिक कार्यात आणि तत्त्वांशी मेळ बसवला जाईल. या चिपमध्ये कोणतेही संगणक किंवा मोबाईल यास सहजपणे हाताळण्याची क्षमता असेल. आगामी काळात नागरिकांना संगणक किंवा मोबाईल वापरण्यासाठी बोलण्याची गरजही भासणार नाही, असे भाकित मस्कने केले आहे. काहींना वाटते की, हे यंत्र सूचनेनुसार काम करू शकेल. सोप्या शब्दांत सांगायचे झाल्यास टेलिपॅथी म्हणजेच मेंदूच्या विचारशक्तीच्या आधारे सहजपणे स्मार्ट फोन आणि संगणकाला हाताळता येणार आहे.

या चिपच्या मदतीने आपण अनेक आठवणी सहजपणे साठवू शकतो का, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. मस्कने गेल्या वर्षी केलेल्या दाव्यानुसार, न्यूरल चिप ही स्मार्ट फोनमधील बॅकअप मेमरीप्रमाणे लोकांच्या आठवणी साठवून ठेवण्यास मदत करेल. यानुसार लोकांची स्मरणशक्तीही वाढेल. अर्थात, या चिपमुळे दुरुपयोगाची शक्यताही अधिक आहे. एखाद्या विद्यार्थ्याला चिप दिली, तर तो अभ्यासच करणार नाही आणि परीक्षेचा संदर्भच बदलून जाईल. एखाद्या गुन्हेगाराच्या हाती चिप लागली, तर तो किती गंभीर गुन्हे करू शकतो, याची कल्पनाच न केलेली बरी; मात्र पोलिसांना या चिपचा चांगला लाभ मिळू शकतो आणि भविष्यात आरोपी वाचण्याची शक्यता राहणार नाही. या चिपची चाचणी यशस्वी झाल्यानंतर प्रत्येकांनाच ही चिप हवीहवीशी वाटणार आहे. आपल्या जुन्या चांगल्या आठवणी लक्षात ठेवाव्या असे कोणाला वाटणार नाही? स्मृतिभ्रंशसारख्या आजारांवर उपचार करण्यासाठी या चिपची मदत मिळणार आहे. त्यामुळे 'न्यूरल चिप' ही जगभरातील लाखो लोकांसाठी वरदान ठरू शकते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news