

कोल्हापूर : मार्च महिन्यातच सूर्य आग ओकत आहे. यामुळे गेल्या तीन दिवसांपासून कोल्हापुरात कमालीचा उकाडा पाहायला मिळत आहे. मंगळवारी कमाल तापमान तब्बल 37.7 अंशांवर गेले होते. यामुळे कोल्हापूरकर अक्षरशः घामाघूम झाले होते. उन्हाचा तडाखा वाढल्याने अतिनील किरणांसह उष्माघाताचा धोका वाढला आहे. दुपारी 1 ते 2 च्या सुमारास काही काळासाठी अल्ट्राव्हायलेट रेज इंडेक्स (यूव्ही इंडेक्स) 12 पर्यंत जात असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. यूव्ही इंडेक्सची ही धोकादायक पातळी समजले जाते.
काय आहे यूव्ही इंडेक्स
अतिनील किरणांची तीव—ता आणि त्याचा शरीरावर होणारा परिणाम अल्ट्रा व्हायलेट इंडेक्सच्या माध्यमातून मोजला जातो. यूव्ही इंडेक्स 0 ते 2 व 3 ते 4 पर्यंत असल्यास त्याचा सर्वात शरीराला सर्वात कमी धोका असतो. 5 ते 6 दरम्यान मध्यम धोका व 7 ते 10 दरम्यान अधिक धोका असतो. 10 च्या पुढे यूव्ही इंडेक्स असल्यास धोका सर्वाधिक असतो.
अशी घ्या काळजी
दुपारी उन्हात फिरताना सनकोट, टोपी, छत्री, यूव्ही प्रोटेक्टेड सनग्लासेसचा वापर करा. याशिवाय उन्हात फिरताना सनस्क्रीमचा वापर करा. भरपूर पाणी प्या, हाय प्रोटीन डाएट टाळा, आहारात पालेभाज्यांचे प्रमाणा वाढवा.
उष्माघात धोकादायक
पारा 38 अंशावर गेल्याने उष्माघाताचा धोका वाढला आहे. या वाढलेल्या उष्म्यामुळे स्नायूमध्ये गोळे येणे, पोटाच्या स्नायूत मुरडा पडणे, खूप घाम येणे, ताप, नाडीचे ठोके वाढणे अशा समस्या दिसू लागल्यास त्वरित वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
उन्हाचा तडाखा वाढल्याने नागरिकांनी दुपारच्या उन्हात फिरणे शक्यतो टाळावे. पारा 38 अंशावर असल्याने उष्माघाताचा धोका वाढला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रावर उष्माघात कक्ष स्थापन करण्यात आला आहे. उष्माघाताची लक्षणे दिसू लागल्यास त्वरित वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
– डॉ. संजय रणवीर, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी