

सांगली : नऊ महिने होऊन गेलेले… प्रसूती केव्हाही होऊ शकत होती… तरीही ती नागपूर ते कोल्हापूर असा रेल्वे प्रवास करीत होती, तेही एकटी. सातारा जिल्ह्यातील मसूर स्थानकात रेल्वे थांबताच तिला त्रास होऊ लागला. रेल्वेतील महिला पोलिसांनी हा प्रकार पाहिला. रेल्वे कराडमध्ये थांबविली. अन्य महिला प्रवाशांच्या मदतीने तिची स्थानकातच प्रसूती केली. तिने बाळाला जन्म दिला.
शुक्रवारी सकाळी सव्वानऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
मिरज लोहमार्ग पोलिस ठाण्यातील महिला पोलिस नीशा खांडेकर यांनी वेळेवर लाखमोलाची मदत केली. शिवानी सिंह पटेल (वय 27, रा. मध्य प्रदेश) असे मातेचे नाव. तिचे पती कामानिमित्त कोल्हापुरात राहतात. त्या काही दिवसांपूर्वी मध्य प्रदेशला गेल्या होत्या. प्रसूती जवळ आल्याने त्या गुरुवारी सायंकाळी गोंदिया-कोल्हापूर महाराष्ट्र एक्स्प्रेसमध्ये बसल्या.
प्रवास रात्रीचा… सोबत कोणीही नातेवाईक नाहीत. प्रसूती केव्हाही होऊ शकत होती. या ताणामुळे त्यांना झोप लागली नाही. पहाटे पुण्यात रेल्वे आली. त्यांनी थोडा चहा घेतला. पुन्हा रेल्वे सुटली. जेजुरीत सहा वाजता आली. तेव्हापासून त्यांना त्रास होऊ लागला. त्यांना चैन पडेना. नीरा, लोणंद सोडल्यानंतर पोटात खूपच दुखू लागले. याचवेळी रेल्वेत गस्त घालणार्या महिला पोलिस खांडेकर यांचे त्यांच्याकडे लक्ष गेले. त्यांनी संवाद साधला. तोपर्यंत मसूर रेल्वेस्थानक आले. खांडेकर यांनी वरिष्ठ अधिकार्यांशी चर्चा केली. कराड स्थानक जवळ आलेले. वेदना खूपच वाढल्या होत्या. कराड स्थानकात रेल्वे थांबताच खांडेकर यांनी अन्य महिला प्रवाशांची मदत घेऊन शिवानी यांना स्थानकावर उतरवून घेतले आणि तेथेच महिलांच्या मदतीने चारही बाजूने चादरी लावून प्रसूती केली. त्यांना मुलगा झाला.
खांडेकर यांनी शिवानी यांच्या पतीशी मोबाईलवर संपर्क साधून याची माहिती दिली. पतीही काही तासांत दाखल झाला. त्यानंतर रुग्णवाहिकेतून आई व बाळाला कराडमधील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. दोघेही सुखरूप आहेत. त्यांच्या बाळाच्या आयुष्याचा प्रवास सुरू झाला, तो कराड रेल्वेस्थानकापासून.
महिला पोलिस नीशा खांडेकर यांनी वेळीच मदत केल्याबद्दल पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर अधीक्षक गणेश शिंदे व निरीक्षक संभाजी काळे यांनी खांडेकर यांचे कौतुक केले.