

पुणे; पुढारी वृत्तसेवा: कोकण व मध्य महाराष्ट्रासह राज्यात पुढील दोन दिवसांत पावसाचा जोर कमी होणार आहे. काही भागांत पुढील एक ते दोन दिवस पावसाच्या हलक्या सरी कोसळतील. तुरळक भागांतच पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. कमी दाबाचा पट्टा दक्षिणेकडे मूळ जागेवर सरकतानाच अरबी समुद्रातून बाष्पाचा पुरवठा झाल्याने राज्यात गेल्या आठवड्यात अनेक भागांत जोरदार पावसाने हजेरी लावली.
पावसासाठी पोषक असलेली ही स्थिती क्षीण होत असल्याने पावसाचा जोर घटणार आहे. गुरुवारी (15 सप्टेंबर) मुंबईसह कोकणात बहुतांश भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. पश्चिम महाराष्ट्रात महाबळेश्वरसह काही भागांत, तर उत्तर महाराष्ट्रात नाशिक आणि विदर्भात अकोला, अमरावती आदी भागांत हलक्या सरींची नोंद झाली.
पुढील एक ते दोन दिवस मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, नाशिक, पुणे, सातारा आदी जिल्ह्यांत मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. त्यानंतरच्या काळात राज्यात तुरळक भागांत विजांच्या कडकडाटात हलक्या पावसाची शक्यता आहे.