

चंद्रपूर, पुढारी वृत्तसेवा
मागील महिनाभरापासून पोंभूर्णा तालुक्यातील अनेक गावात पट्टेदार वाघिणीने धुमाकूळ घालत, तिघांचा बळी घेतला तर पंधरा जणांना जखमी केले. त्यामुळे शेतकरी व नागरीकांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांना वाघ-वाघिणीच्या दहशतीमुळे शेतातील पिक काढण्याचे काम थांबवावे लागले तर काही ठिकाणी वनविभागाच्या बंदोबस्तात काम केले.
वाघाचे वाढते हल्ले शेतकऱ्यांना धोकादायक ठरल्याने पट्टेदार वाघांचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे. वनविभागाने ठिकठिकाणी शेतात वन कर्मचाऱ्यांना तैनात ठेवून वाघावर पाळत ठेवली होती. तसेच पिंजरे लावून पकडण्याचा आटोकाट प्रयत्न करण्यात आला. परंतू वाघिणीने प्रत्येक वेळी वनविभागाला हुलकावणी दिली. अखेर काल गुरूवारी (23 डिसेंबर) ला पोंभूर्णा तालुक्यात पोंभूर्णा चेक आष्टा मार्गावर एका बकरीची शिकार केल्यानंतर वाघिण वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात अडकली. त्यामुळे वन विभागाने त्या पट्टेदार वाघिणीला पकडल्याने शेतकरी, शेतमजूर व नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला.
पोंभुर्णा रोज विविध ठिकाणी वाघाचे दर्शन होत आहे. यामुळे पोंभुर्णा परिसरातील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशातच काल गुरुवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास पट्टेदार वाघिणीने पोंभूर्णा चेक आष्टा गावाजवळ एका बकरीची शिकार केली. याची माहिती गावकऱ्यांना होताच त्या वाघिणीला पळवून लावण्यासाठी गावकरी एकवटले. त्यावेळी ती वाघिण एका पुलाखाली शिरली. पुलाचा पुढील भाग बंद असल्याने ती तिथेच अडकली.
पुलाखाली वाघिणी शिरल्याची माहिती पोंभुर्णा वनविभागाला मिळताच वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पाईपमध्ये जाणारा रस्ता बंद केला. अखेर सात तासांच्या अथक प्रयत्नानंतर वाघिणीला पकडण्यात वनविभागाला यश आले. या वाघिणीची माहिती तालुक्यात वाऱ्यासारखी पसरताच नागरिकांनी एकच गर्दी केली होती.
दोन तास ठेवावा लागला रस्ता बंद
रेस्क्यू टीम वाघिणीला जेरबंद करत असताना दोन्ही बाजूने रस्ता बंद करत वाहतूक थांबवण्यात आली होती. सुमारे दोन तास हा रस्ता बंद ठेवण्यात आल्याने वाहतूक विस्कळित झाली होती. वाहने आणि नागरिकांच्या गर्दीमुळे वनविभागाच्या रेस्क्यू पथकाला अडचणी निर्माण झाल्या होत्या.
तिघांचा बळी, तर पंधरापेक्षा अधिक नागरिक जखमी
यावर्षी मार्चमध्ये पोंभुर्णा तालुक्यातील चेक आष्टा येथील शेतकऱ्याला वाघाने ठार केले होते. गेल्या महिन्यात कसरगट्टा येथील कापूस वेचण्यासाठी गेलेल्या महिलेला कवीटबोळी शिवारात वाघाने ठार केल्याची घटना घडली होती. ही घटना ताजी असतानाच वेळवा येथे फिरायला गेलेल्या महिलेवर वाघाने हल्ला करून ठार केले. वाघाच्या हल्ल्यात आजपर्यंत तिघांचा बळी गेला. शिवाय पंधरापेक्षा अधिक नागरिक जखमी झाले.
हेही वाचा