

मनोरंजनाच्या क्षेत्रामध्ये दिग्गज मानल्या जाणार्या ऑस्कर पुरस्कारांकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिलेले असते. यंदाच्या ऑस्कर सोहळ्यात बॉक्स ऑफिस गाजवलेल्या 'ओपनहायमर' या सिनेमाने बाजी मारली आहे. ऑस्करमध्ये या सिनेमाला 13 नामांकन जाहीर झाले होते. त्यापैकी सात पुरस्कारांवर या सिनेमाने आपलं नाव कोरलं आहे.
दरवर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये जाहीर होणार्या ऑस्कर पुरस्कारांकडे जगभरातील कलाप्रेमींचे आणि रसिक चाहत्यांचे लक्ष लागून राहिलेले असते. 'अँड अॅास्कर गोज टू…' यापुढे येणारे नाव ऐकण्यासाठीची उत्कंठा शिगेला पोहोचलेली असते. अमेरिकेतील अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्टस् अँड सायन्स या चलचित्र अकादमीमार्फत चित्रपट क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणार्यांना गौरवण्यासाठी हे पुरस्कार दरवर्षी दिले जातात. मेट्रो-गोल्डिन-मेयर स्टुडिओचे लुईस बी. मेयर यांनी या अकादमीची स्थापना केली, तसेच ऑस्कर पुरस्कारांचीही सुरुवात केली. पहिला ऑस्कर पुरस्कार सोहळा 16 मे 1929 रोजी हॉलीवूड रुझवेल्ट हॉटेलमध्ये अंदाजे 270 जणांच्या उपस्थितीत झाला. या सोहळ्याला पाच डॉलर तिकिटाचा दर होता. 1953 मध्ये ऑस्कर सोहळा प्रथमच टीव्हीच्या माध्यमातून अमेरिकेत दाखवला गेला. 1969 पासून ऑस्कर सोहळा जगभर प्रक्षेपित केला जाऊ लागला. सध्या हा सोहळा 200 पेक्षा अधिक देशात पाहता येतो. पहिल्या सोहळ्यात ऑस्कर विजेत्यांची नावे सोहळ्याच्या तीन महिने आधीच जाहीर केली गेली होती. मात्र, पुढील वर्षापासून विजेत्यांची नावे पुरस्कार सोहळ्यापर्यंत गुप्त ठेवण्यात येऊ लागली. सोहळ्याच्या आधीच विजेत्यांची यादी वर्तमानपत्रांकडे पाठवली जायची आणि सोहळ्याच्या दिवशी रात्री 11 वाजता ती वर्तमानपत्रांनी प्रसिद्ध करायची, असे ठरवण्यात आले. ही पद्धत इ.स. 1940 पर्यंत पाळली गेली. परंतु लॉस एंजेलिस टाइम्सने ऑस्कर विजेत्यांची यादी सायंकाळीच प्रसिद्ध केली. त्यामुळे सोहळ्याला उपस्थित राहणार्या सर्वांना ती सहज उपलब्ध झाली. यामुळे पद्धत बदलणे भाग झाले. इ.स 1941 पासून बंद पाकिटात विजेत्यांची नावे देण्याची पद्धत सुरू झाली. पहिल्या सोहळ्यात 15 ऑस्कर पुरस्कार दिले गेले होते. सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचे पहिले ऑस्कर एमिल जॅनिंग्ज यांना, तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचे पहिले ऑस्कर जेनेट गेनर यांना दिले गेले होते.
ऑस्करचा इतिहास हा उत्साहजनक, वादग्रस्त आणि तितकाच मनोरंजक राहिलेला आहे. तथापि, आजही या पुरस्कारांचे महत्त्व कमी झालेले नाहीये. यंदाच्या 96 व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यामध्ये 'ओपनहायमर' या चित्रपटाचा सर्वाधिक दबदबा पाहायला मिळाला. तीन तासांच्या बायोपिक प्रकारात मोडणार्या या हॉलीवूडपटाने आधी बॉक्स ऑफिसवर राज्य करत अब्जावधी डॉलरचा गल्ला जमवला आणि आता तब्बल सात ऑस्कर पुरस्कारांवरही आपलं नाव कोरलं आहे. सर्वोत्कृष्ट सिनेमा, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्याची बक्षिसं 'ओपनहायमर'ने पटकावली आहेत. ख्रिस्टोफर नोलन या जागतिक कीर्तीच्या दिग्दर्शकाला पहिल्यांदाच ऑस्करची बाहुली प्रदान करण्यात आली. या चित्रपटातील अभिनेता किलियान मर्फी याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार देण्यात आला. हॉलीवूडमध्ये हा चित्रपट यशस्वी ठरला आहे. हा दिग्दर्शक नोलन यांचा तिसरा हिट चित्रपट आहे. त्याअगोदर त्याचा बॅटमन मालिकेतील दुसरा आणि तिसरा चित्रपट ब्लॉकब्लस्टर राहिला आहे. प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा 'ओपनहायमर' हा चित्रपट भारदस्त संवाद, उत्कृष्ट दिग्दर्शन, कलाकारांचे कसदार अभिनय आणि तितक्याच ताकदीचे सादरीकरण या चारही कसोट्यांवर परिपूर्ण ठरल्यामुळे प्रेक्षकांबरोबरच ऑस्कर ज्युरींच्याही पसंतीस उतरला. या चित्रपटात अॅक्शन दृश्ये फारशी नाहीत. तरीही प्रेक्षकांना चित्रपटातील एकही प्रसंग कंटाळवाणा वाटत नाही.
हा चित्रपट महान भौतिकशास्त्रज्ञ जे. रॉबर्ट ओपनहायमर यांच्या जीवनावर आधारित आहे. हायमर यांनी जगातील पहिल्या अणुबॉम्बचा शोध लावला. हाच अणुबॉम्ब जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकीवर टाकण्यात आला होता. या महाविनाशकारी हल्ल्यानंतर दुसर्या महायुद्धाचा शेवट झाला. हा चित्रपट शास्त्रज्ञ ओपनहायमर यांच्या कार्यातील नैतिक बाजूवर प्रकाश टाकणारा आहे.
ज्युलियस रॉबर्ट ओपनहायमर यांचा जन्म 22 एप्रिल 1904 रोजी न्यूयॉर्क शहरातील एका ज्यू कुटुंबात झाला. जर्मन स्थलांतरित असणारे त्यांचे वडील कपड्यांचे व्यावसायिक होते. आई एला फ्रिडमन ही चित्रकार होती. 1942 मध्ये न्यू मेक्सिकोतील लॉस अलामोस येथील एका शस्त्रास्त्र प्रयोगशाळेत संचालक म्हणून रॉबर्ट यांची नियुक्ती झाली. या प्रयोगशाळेला एका अणुबॉम्बची निर्मिती करायची होती. त्याचे कोड नेम 'मॅनहॅटन प्रोजेक्ट' असे होते. या प्रकल्पासाठी अमेरिकेतील अनेक ठिकाणी गुप्तपणे प्रयोगशाळा सुरू करण्यात आल्या होत्या. लॉस अलामोसमध्ये ओपनहायमर यांनी फिजिक्समधील अनेक दिग्गज शास्त्रज्ञांना एकत्र आणले होते. अडीच वर्षांच्या कठोर मेहनतीनंतर त्यांना यामध्ये यश आले. 1945 मध्ये अमेरिका सरकारने या शास्त्रज्ञांना युरेनियम बॉम्ब आणि प्लुटोनियम बॉम्ब बनवण्याचे आदेश दिले होते. 16 जुलैला त्यांनी प्लुटोनियम बॉम्बची पहिली चाचणी केली. जॉन डोनेच्या कवितेवर आधारित त्यांनी या चाचणीला 'ट्रिनिटी टेस्ट' असं नाव दिलं. लॉस अलामोसपासून 210 मैल दक्षिणेला असलेल्या 'जर्नी ऑफ डेथ' नावाच्या ठिकाणाची या चाचणीसाठी निवड करण्यात आली होती. पहाटे साडेपाचला चाचणी यशस्वी झाली आणि अणुयुगाची नांदी झाली. यानंतर तीन आठवड्यांमध्ये 6 ऑगस्ट 1945 ला या बॉम्बने जपानचे हिरोशिमा हे शहर उद्ध्वस्त केलं. त्यानंतर तीन दिवसांनी 9 ऑगस्टला नागासाकीचा संहार झाला. या दोन स्फोटांमध्ये किमान दोन लाख लोकांनी आपला जीव गमावला.
असे सांगितले जाते की, ओपनहायमर स्वतःही आपल्या कामामुळे झालेल्या या विध्वंसाने थक्क झाले. अणुचाचणीनंतर त्या नियंत्रण कक्षात असताना 'मी जग उद्ध्वस्त करणारा मृत्यू आहे' ही भगवान श्रीकृष्णांनी विश्वरूपाबद्दल म्हटलेली गीतेतील ओळ ओपनहायमर यांना आठवली. त्यामुळे नंतरच्या काळात त्यांनी हायड्रोजन बॉम्बच्या निर्मितीला कडाडून विरोध केला. नोकरी सोडल्यानंतर जगभरातील विज्ञानाशी संबंधित संस्थांमध्ये व्याख्यानं देण्यासाठी प्रवास केला. 1930 च्या सुरुवातीला ओपनहायमर संस्कृत शिकले होते. गीता आणि कालिदासाच्या मेघदूतचं त्यांनी वाचन केलं होतं. ते गीतेचे प्रशंसक होते.
खगोलशास्त्रज्ञ नील डीग्रेस टायसन आणि थिरोटॉकिल शास्त्रज्ञ ब्रायन ग्रीन यांनी अलीकडेच समाजमाध्यमातील एका वाहिनीवर या चित्रपटाबाबत चर्चा केली आहे. यात त्यांनी काही मुद्दे मांडले. त्यामध्ये ट्रिनिटी टेस्टमुळे पृथ्वीवरील जीवसृष्टीच नष्ट होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असून 'ओपनहायमर'मध्ये याच शक्यतेकडे लक्ष वेधण्यात आले आहे. यात एक दृश्य असून अभिनेता मॅट डॅमन हा ओपनहायमरशी याच मुद्द्यावर बोलताना दिसतो. या प्रसंगात ओपनहायमर हे याच शक्यतेबाबत बोलताना दिसतात. ओपनहोयमरचे पात्र सिलियन मर्फीने साकारले आहे. सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा ऑस्कर पुरस्कार जिंकणारा सिलियन हा पहिला आयरिश अभिनेता आहे.
ओपनहायमर चित्रपटात रॉबर्ट डाऊनी (ज्युनिअर), जॉश हर्टनेट, डेव्हिस क्रमहोल्टस्, फ्लोरेन्स पुघ, एमिली ब्लंट यांच्यासह अन्य कलाकारांचा समावेश आहे. या बहुचर्चित चित्रपटाने आतापर्यंत 960 दशलक्ष डॉलरची कमाई केली आहे. हा चित्रपट एक अब्ज डॉलर उत्पन्नाचा आकडा गाठेल, असे अंदाज व्यक्त होत आहेत. यंदाच्या पुरस्कार सोहळ्यामध्ये महाराष्ट्रातील ज्येष्ठ कलादिग्दर्शक दिवंगत नितीन देसाई यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. अर्थात सालाबादप्रमाणे 'भारतीय चित्रपटाला ऑस्कर कधी मिळणार', हा प्रश्न यावेळीही अनुत्तरित राहिला. यंदाच्या पुरस्कारांसाठी भारताच्या 'टू किल अ टायगर' या माहितीपटाला नामांकन मिळाले होते. या माहितीपटाकडून भारतीयांच्या खूप अपेक्षा होत्या. टोरांटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात या माहितीपटाचा प्रीमियर झाला होता. त्यावेळी या माहितीपटाला सर्वोत्कृष्ट कॅनेडियन फिल्म श्रेणीत 'एम्प्लिफाई व्हॉईसेस' पुरस्कार मिळाला होता. 13 वर्षीय मुलीचे अपहरण आणि तिच्यावरील लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात न्याय मिळवून देण्यासाठी रणजीत नावाच्या व्यक्तीने केलेल्या खडतर संघर्षाचे चित्रण या माहितीपटात करण्यात आले आहे. या माहितीपटाची निर्मिती कॉर्नेलिया प्रिन्सिप आणि डेव्हिड ओपेनहाइम यांनी केली आहे. पण ऑस्कर न मिळाल्याने पुन्हा एकदा भारतीयांचे स्वप्न भंगले आहे.