जगातील व्यापाराचा आलेख नव्याने उसळी घेणार

जगातील व्यापाराचा आलेख नव्याने उसळी घेणार
Published on
Updated on

कोल्हापूर : कोरोना काळात उद्योग-व्यापार क्षेत्रामधील पडझड व महामारीचा काळ संपताच रशिया-युक्रेन व इस्रायल-हमास युद्धांमुळे जागतिक व्यापाराला मोठी खीळ बसली होती. हे दुष्टचक्र नव्या आर्थिक वर्षात सरणार आहे. संयुक्त राष्ट्राच्या व्यापार व विकास परिषदेने याविषयी दिलासादायक भाकीत केले आहे.

या वर्षात जागतिक व्यापाराचा घसरलेला आलेख पुन्हा उसळी मारून नवी चढण पकडेल, असे या परिषदेचे म्हणणे आहे. तथापि, अलीकडच्या काळामध्ये व्यापारातील दळणवळणाची जोखीम मात्र कायम राहणार असल्याचे परिषदेने नमूद केले आहे.

संयुक्त राष्ट्राच्या व्यापार व विकास परिषदेचा एक अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला. यात जागतिक महागाईचा दर कमी होत असल्याचे तसेच आर्थिक विकासाचा दर वाढत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. विशेषतः पर्यायवरणपूरक वस्तूंच्या मागणीत या वर्षात मोठ्या प्रमाणात वाढ होईल आणि पुन्हा जागतिक व्यापाराचा कल नव्या वळणावर येईल, असे नमूद करताना परिषदेने मालवाहू जहाजांना तांबडा समुद्र, काळा समुद्र आणि पनामा कालवा येथे असलेल्या दळणवळणातील अडथळ्यांकडे लक्ष वेधले आहे. या अडथळ्यांमुळे वाहतुकीच्या खर्चात मोठी वाढ होत आहे. साहजिकच, पुरवठा साखळीवर त्याचा परिणाम होतो आहे, असेही परिषदेचे म्हणणे आहे.

सेवा क्षेत्रात 8 टक्क्यांची वाढ

सन 2023 मध्ये जागतिक व्यापारात सुमारे एक लाख कोटी डॉलर्स इतकी कपात झाली. वर्षापूर्वी जागतिक व्यापार 32 लाख कोटी डॉलरच्या उच्चांकी पातळीवर गेला होता. भारतात याचा परिणाम वस्तू व्यापारावर झाला. हा व्यापार 2022 च्या तुलनेत 5 टक्क्यांनी घसरला. यामध्ये सेवा क्षेत्रातील 8 टक्क्यांची वाढ मात्र दिलासा देऊन गेली. चालू आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत जगातील बर्‍याच अर्थव्यवस्थांमध्ये सुधारणा दिसून येत आहे. तथापि, सरासरी चित्र मात्र अद्याप निराशानजनक असले, तरी नव्याने सुरू होणारे आर्थिक वर्ष दिलासा देऊ शकते, असे या परिषदेचे म्हणणे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news