देशातील पहिला कचर्‍यातून हायड्रोजन निर्मितीचा प्रकल्प पुण्यात !

देशातील पहिला कचर्‍यातून हायड्रोजन निर्मितीचा प्रकल्प पुण्यात !
Published on
Updated on

पुणे; पुढारी वृत्तसेवा : शहरात तयार होणार्‍या महाकाय कचर्‍याच्या डोंगराची डोकेदुखी येत्या दिवाळीपर्यंत बंद होणार आहे. महापालिका प्रशासन केंद्राच्या मदतीने दररोज 350 टन कचर्‍यापासून 9 मेट्रिक टन हायड्रोजनची निर्मिती करणार आहे. पुण्यातील उद्योजकांना आता चीनकडून येणार्‍या गॅस पुरवठ्याची गरज राहणार नाही. महापालिकेत घनकचरा व्यवस्थापन करणारा मोठा विभाग आहे. दररोज सुमारे 500 टनापेक्षा जास्त घनकचरा तयार होतो. या कचर्‍याचे वर्गीकरण रोज होत असते.

मात्र त्यापासून इंधननिर्मितीसाठी पैसा उभारायचा कसा हा प्रश्न होता. तो आता सुटला असून, केंद्र सरकारच्या मदतीने हडपसर येथे कचर्‍यापासून हायड्रोजन निर्मितीचा प्रकल्प उभा राहतोय. त्याचे काम 70 टक्के पूर्ण झाले असून, लोकसहभागातून हा प्रकल्प चालवला जाणार आहे. येत्या दिवाळीपर्यंत हा प्रकल्प पूर्णपणे तयार होऊन हायड्रोजन निर्मितीच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.

चीनकडून मिथेन गॅसच्या आयातीची गरज नाही

दिल्ली येथील एक खासगी कंपनी हा प्रकल्प उभारण्याचे काम करीत असून, दिवाळीत हा प्रकल्प सुरू होण्याची शक्यता आहे. पुणे शहरातील बरेच उद्योग उत्पादनासाठी मिथेन गॅसचा वापर करतात. मात्र, या प्रकल्पामुळे मिथेन गॅस उद्योजकांना आता पुण्यातच मिळेल, त्यामुळे चीनकडून तो आयात करण्याची गरज पडणार नाही.

अशी होईल हायड्रोजन व मिथेन निर्मिती

हे तंत्रज्ञान भाभा अ‍ॅटॉमिक संशोधन संस्था व आयआयटी बंगरुळूने विकसित केले असून, कचर्‍याचे विलगीकरण, ओल्या कचर्‍यातून जैविक खत तयार होईल. सुक्या कचर्‍यावर प्रक्रिया करून प्लाझ्मा गॅसिफिकेशन तंत्राने हायड्रोजन वायू तयार केला जाईल. घनकचरा भूगर्भात कॅपिंग करून त्यातून मिथेन वायूची निर्मिती केली जाणार आहे. कचरा शास्त्रोक्त पद्धतीने कॅपिंग केल्यानंतर मोठ्या प्रमाणात मिथेन वायू तयार होतो. यातून निर्माण होणारा गॅस घरगुती तसेच व्यावसायिक वापरासाठी उपयोगी ठरणार आहे. कार्बन उत्सर्जनदेखील कमी होण्यास हातभार लागणार असल्याने हा पायलट प्रोजेक्ट म्हणून यशस्वी झाला तर राज्यात सर्वत्र अशाच प्रकारचे हायड्रोजन प्रकल्प उभारण्याचे नियोजन केले गेले आहे.

देशातील पायलट प्रोजेक्ट म्हणून पुण्यातील हडपसर येथे कचर्‍यातून हायड्रोजन निर्मितीचा प्रकल्प उभा राहत आहे. वाढत्या शहराबरोबर कचर्‍याचीही समस्या निर्माण झाली आहे. या प्रकल्पामुळे समस्या सुटण्याबरोबरच उद्योगांना लागणारा हायड्रोजनदेखील पुरवण्याचे काम केले जाईल.

– आशा राऊत , उपायुक्त,
पुणे महापालिका.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news