बहार विशेष : ‘सहावं पाऊल’ … अतिवेगाचं!

बहार विशेष : ‘सहावं पाऊल’ … अतिवेगाचं!
Published on
Updated on

केंद्र सरकारने 6-जीच्या दिशेने वेगाने पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. जगातील अनेक देशांत 6-जी इंटरनेट सुविधा सुरू करण्यासाठी आधीच प्रयत्न सुरू आहेत. दक्षिण कोरियात 2028 पर्यंत ही सेवा सुरू होणार आहे. 5-जीच्या तुलनेत 6-जी सेवा 100 पटीने जलद असणार आहे. एक हजार जीबीचा व्हिडीओ एका सेकंदात डाऊनलोड करण्याची किमया 6-जीमुळे साधली जाणार आहे. साहजिकच, यामुळे अनेक क्षेत्रांमध्ये एक मोठी डिजिटल क्रांती आगामी काळात घडून येणार आहे.

माहिती-तंत्रज्ञानाच्या युगामध्ये इंटरनेट सेवा हे सर्वांत आवश्यक असणारे साधन ठरले आहे. कोणत्याही संदेशाचे-माहितीचे-डेटाचे आदानप्रदान करण्यासाठी इंटरनेटचा वेग हा महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असतो. त्यामुळे वेगवान गतीने डेटा उपलब्ध करणार्‍या तंत्रज्ञानाच्या प्रगतीसाठी जगभरातील तंत्रज्ञ, शास्त्रज्ञ आणि सरकारे दिवसरात्र काम करत आहेत. भारतामध्ये गतवर्षाच्या अखेरीस 5-जी सेवेचे लाँचिंग करण्यात आले होते. या तंत्रज्ञानाचा प्रसार अद्यापही प्राथमिक अवस्थेत असताना आणि देशात 5-जी सेवांचा वापर मोजक्याच ठिकाणी केला जात असताना 6-जीचे बिगुल वाजवण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच 6-जी साठीच्या व्हिजन डॉक्युमेंटचे अनावरण केले. त्यानुसार 2030 पर्यंत देशामध्ये 6-जी सेवा सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

जगातील अनेक देशांनी 6-जी इंटरनेट सेवा सुरू करण्याच्या दिशेने काम सुरू केले आहे. 2028 सालापर्यंत ग्राहकांना देशात 6-जी नेटवर्क सेवा मिळणे सुरू होईल, अशी घोषणाही दक्षिण कोरिया सरकारने केली आहे. कोरियन सरकारने स्थानिक कंपन्यांना 6-जी नेटवर्कमध्ये वापरल्या जाणार्‍या वस्तूंचे उत्पादन करण्यास सांगितले आहे. कोरियाला 6-जी सेवा वेळेवर सुरू करून, असे करणारा जगातील पहिला देश बनायचा आहे. या प्रकल्पावर कोरियन सरकार 3,900 कोटी रुपयांहून अधिक खर्च करत आहे. दक्षिण कोरियाचे विज्ञानमंत्री लिम हेई यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या देशात सध्या उपलब्ध असलेल्या नेटवर्कपेक्षा 6-जी इंटरनेटचा वेग पन्नासपट जास्त असेल. दक्षिण कोरिया सरकारने 6-जी नेटवर्कशी संबंधित वस्तू बनवण्यासाठी स्थानिक कंपन्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सबसिडी जाहीर केली आहे. दक्षिण कोरिया सरकार या तंत्रज्ञानाशी संबंधित पुरवठा साखळी मजबूत करण्यावर भर देत आहे. 5-जीच्या विस्तारात दक्षिण कोरियाची भागीदारी 25.9 टक्के आहे, तर चीनचा यामधील वाटा 26.8 टक्के इतका आहे.

याखेरीज अमेरिका, चीन, जपान हे देशही 6-जी नेटवर्क प्रदान करण्यासाठी काम करत आहेत. अमेरिकेने यासाठी 'नेक्स्ट जी अलायन्स' सुरू केली आहे. या युतीमध्ये अ‍ॅपल, एटी अँड टी, क्वालकॉम, गुगल आणि सॅमसंग या कंपन्यांचा समावेश आहे. 2022 च्या शेवटी, चीनने त्यांच्या दूरसंचार संशोधन संस्थेने लिहिलेल्या श्वेतपत्रिकेद्वारे 6-जीसाठीचा आराखडा जाहीर केला आहे.

वास्तविक पाहता, सद्य:स्थितीत मोबाईल इंटरनेटसाठी वेगाच्या द़ृष्टिकोनातून 5-जी इंटरनेट सेवा पुरेशी ठरणारी आहे. परंतु, जर 6-जी इंटरनेट सेवा सुरू झाल्यास तिचे कव्हरेज क्षेत्र 10 किमी असेल. यामुळे नेटवर्क गायब होण्याचा त्रासच संपणार आहे. तज्ज्ञांच्या मते, 6-जी तंत्रज्ञानामुळे इंटरनेटचा वेग 5-जीपेक्षा 100 पटीने जास्त असेल. तांत्रिक भाषेत सांगायचे झाल्यास 6-जीचा वेग हा 100 जीबीपीएसपर्यंत असणार आहे.

6-जी हे पुढील पिढीचे सेल्युलर तंत्रज्ञान आहे. 1991 मध्ये आलेल्या 2-जी तंत्रज्ञानामुळे कॉल, एसएमएस आणि इंटरनेटची सुविधा उपलब्ध झाली. त्यानंतर 10 वर्षांनी म्हणजे 2001 मध्ये 3-जीचे आगमन झाले आणि वायरलेस, वेब ब्राऊजिंग, ई-मेल, व्हिडीओ पिक्चर शेअरिंग यांसारख्या सुविधा मोबाईलवर उपलब्ध झाल्या. त्यानंतर 9 वर्षांनी 2010 मध्ये 4-जीची मुहूर्तमेढ रोवली गेली. या चौथ्या जनरेशनने वेगवान इंटरनेट, क्लाऊड कॉम्प्युटिंग, व्हिडीओ कॉन्फरन्सिंग, थ्रीडी टेलिव्हिजन यांसारख्या सुविधांचा वापर सुरू झाला. जवळपास 12 वर्षे हे तंत्रज्ञान वापरले जात आहे. 2022 मध्ये बिगुल वाजवण्यात आलेल्या 5-जीमुळे इंडस्ट्रीयल आयओटी, इंटरअ‍ॅक्टिव्ह व्हिडीओ यांची सुरुवात होणार आहे. हा प्रवास थक्क करणारा आहे. मुळातच, इंटरनेट तंत्रज्ञान जसजसे विकसित होत गेले तसतसा फाईल्स डाऊनलोड-अपलोड करण्याचा कालावधी कमी कमी होत गेला आहे. उदाहरणार्थ, एखादी फाईल डाऊनलोड करण्यासाठी 4-जीमध्ये सुमारे 50 मिलीसेकंद लागत असतील, तर 5-जीमध्ये त्यासाठी 5 मिली सेकंदांपर्यंत वेळ लागतो. 6-जी आल्यानंतर हा वेळ फक्त एक मिलीसेकंद इतका कमी होईल. याचा अर्थ, प्रचंड मोठा डेटा काही मिली सेकंदांमध्ये हस्तांतरित किंवा डाऊनलोड करणे येणार्‍या काळात शक्य होणार आहे.

5-जीच्या आगमनानंतर, भारतात मोबाईल नेटवर्कचा वेग आणि गुणवत्ता यामध्ये बरीच सुधारणा झाली आहे. जागतिक स्तरावर इंटरनेट स्पीड आणि नेटवर्कचे सर्वेक्षण करणार्‍या ओकला या प्लॅटफॉर्मने नुकताच एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार, भारतात सरासरी डाऊनलोडचा वेग 115 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. सप्टेंबर 2022 मध्ये हा वेग 13.87 एमबीपीएस होता, तो जानेवारी 2023 मध्ये 29.85 एमबीपीएस झाला आहे. म्हणजेच, आता भारतात सुमारे 30 एमबी प्रती सेकंद या वेगाने डेटा डाऊनलोड केला जात आहे.

6-जीबाबत सध्याच्या अंदाजांनुसार, 100 जीबीची फाईल एका सेकंदामध्ये डाऊनलोड करण्याची किमया या तंत्रज्ञानात असेल, असे सांगितले जात आहे. यामुळे नव्या पिढीला नेटफ्लिक्स विशेषतः आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशिन लर्निंग या नव्या युगाच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानासाठी 6-जी वरदान ठरणार आहे. मशिन ते मशिन आणि मशिन ते मानव यांच्यातील संवाद सुलभ करण्यासाठी हे तंत्रज्ञान साहाय्यभूत ठरणार आहे. तसेच ऑग्मेंटेड रिअ‍ॅलिटीसाठी 6-जी वरदान ठरेल. 5-जी तंत्रज्ञानाबाबत असे सांगितले जाते की, सर्वोत्कृष्ट रेंजमध्ये असताना या तंत्रज्ञानाद्वारे प्रती सेकंद 10 गिगाबाईट इतका स्पीड मिळू शकतो. 6-जीमध्ये हा वेग 1 टेराबाईट इतका असेल. याचे कारण कमीत कमी कालावधीत जास्तीत जास्त डेटा हस्तांतरित करण्याची क्षमता यामध्ये अधिक आहे. याला अल्ट्रा लो लेटेन्सी असे म्हटले जाते. साहजिकच, 6-जी आल्यानंतर ऑनलाईन मीटिंग्जपासून गेमिंगपर्यंत सर्वच गोष्टी अधिक सुस्पष्ट, अचूक होणार आहेत. रिअल टाईममध्ये सर्व काही पाहता येणे आणि ऐकता येणे शक्य होणार आहे.

सध्या असणारे 4-जी तंत्रज्ञान ही 3-जी तंत्रज्ञानाची अपग्रेड केलेली आवृत्ती आहे. पण 5-जी आणि 6-जी तंत्रज्ञान या दोन वेगवेगळ्या वायरलेस कनेक्टिव्हिटीच्या आवृत्त्या आहेत. म्हणूनच 6-जी हे 5-जी तंत्रज्ञानाची जागा घेणार नाही, असे सांगितले जाते. 6-जी तंत्रज्ञानावर संशोधन आणि विकासाची प्रक्रिया 2020 मध्येच सुरू झाली होती. त्यामुळेच 5-जीच्या विस्तारापूर्वीच 6-जीचा घंटानाद करणे शक्य झाले. यातून भारताची डिजिटलायझेशनच्या क्षेत्रातील भरारीची क्षमता दिसून येते, हे लक्षात घ्यावे लागेल.

6-जीच्या वेगाचे आणि त्यामुळे होणार्‍या बदलांचे सुपरिणाम जाणून घेतानाच, याची दुसरी बाजूही लक्षात घ्यायला हवी. यामध्ये ई-कचर्‍याचा आणि मोबाईल वापरामुळे उद्भवत चाललेल्या मानसिक समस्यांचा विचार अधिक गरजेचा आहे. आज 4-जी तंत्रज्ञानासाठी अनुकूल असणारे स्मार्टफोन्स येत्या काही महिन्यांत वापरासाठी कालबाह्य ठरणार आहेत. थोडक्यात, त्यांचे रूपांतर ई-कचर्‍यामध्ये होणार आहे. 2020 मध्ये करण्यात आलेल्या एका पाहणीनुसार, देशामध्ये 607 दशलक्ष 4-जी मोबाईल आहेत. हा आकडा 829.3 दशलक्षहून अधिक झाल्याचे सांगितले जाते. साधारणतः 2025 पर्यंत 5-जीचा सबंध देशभरात सर्वदूर वापर सुरू झाल्यास 800 दशलक्ष मोबाईल हँडसेट 'कचरा' बनून राहणार आहेत. त्यानंतर 2030 मध्ये 6-जी आल्यास पुन्हा हा कचर्‍याचा डोंगर वाढणार आहे. आज तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात इतकी प्रचंड क्रांती होत असताना, या गंभीर प्रश्नाबाबत काहीतरी उपाययोजना केली जाणे गरजेचे आहे. अन्यथा, ई-कचर्‍याचे आव्हान दिवसेंदिवस जटिल बनत जाणार आहे.

दुसरे म्हणजे वेग.. अतिवेग.. अधिक अतिवेग… हा सिलसिला पुढे पुढे नेत असताना या वेगवानतेसोबत येणार्‍या नवनव्या फीचर्सचा, साधनांचा मानवी मनावर होणार्‍या परिणामांचाही विचार व्हायला हवा. व्यावसायिक पातळीवर त्याचे अनेक फायदे असतील यात शंकाच नाही; पण वैयक्तिक पातळीवर जेव्हा इतक्या प्रचंड वेगवान इंटरनेट सुविधा मिळू लागतील तेव्हा त्याचा वापर विधायक कामासाठी, उत्पादकता-गुणवत्ता वाढवण्यासाठी, सर्जनशीलता वाढवण्यासाठी कसा होईल याबाबतचे प्रबोधन करणारी व्यवस्था आपल्याला तयार करावी लागेल. अन्यथा, या वेगवान इंटरनेटच्या साहाय्याने आभासी जगात रममाण होणार्‍यांचे प्रमाण आणि कालावधी वाढत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे नवतंत्रज्ञानाच्या आगमनाचे गोडवे गाताना त्याचा प्रभावी, परिणामकारक आणि उत्पादनशील वापर कसा होईल, हे पाहण्यातच सुज्ञपणा आहे.

महेश कोळी,
आय. टी. तज्ज्ञ 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news