

केडगाव; पुढारी वृत्तसेवा : भरधाव टेम्पोने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात पुणे-सोलापूर महामार्गावरील बोरीपार्धी (धायगुडवाडी) गावच्या हद्दीत हॉटेल जोगेश्वरीसमोर गुरुवारी (दि. १६) दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास घडला.अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या दोघांची नावे किस्तुरचंद गडालाल शर्मा (वय ६६, रा. नागपूर) आणि गिरीधरलाल शिवकरजी शर्मा (वय ४७, रा. राजस्थान) अशी आहेत.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, केडगाव बाजारपेठेतून तेल पॅकिंग घेऊन टेम्पो (एमएच ४२ बी ९५७६) सोलापूरकडे निघाला होता. यावेळी बोरीपार्धी येथे या टेम्पोने दुचाकी (एमएच १२ सी एल ५३९५) ला धडक दिली. यावेळी टेम्पोच्या पुढील चाकात दुचाकी अडकली होती. टेम्पोने तशीच ही दुचाकी काही अंतर फरफटत नेली. या भीषण अपघातात दुचाकीवर असलेल्या किस्तुरचंद शर्मा आणि गिरीधरलाल शर्मा यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान मृत्यूमुखी पडलेले दोघेही या परिसरात कोळशाचा व्यापार करीत होते, अशी माहिती मिळत आहे.
अपघात घडलेल्या ठिकाणी महामार्गावर रस्ता क्रॉसिंगसाठी जागा ठेवली आहे. यापुर्वी देखील याच ठिकाणी तीन वेळा अपघात घडले आहेत. हा क्रॉसिंग मार्ग बंद करण्याची मागणी परिसरातून होऊ लागली आहे.