टेक इन्फो : जग बदलणारे इंटरनेट

टेक इन्फो : जग बदलणारे इंटरनेट
Published on
Updated on

येणार्‍या काळात इंटरनेटचा वेग कैकपटींनी वाढेल. त्याचबरोबर आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या आधारावर इंटरनेट सेवेत कोणकोणते बदल होतील, हे पाहणे रंजक ठरणार आहे. चॅटजीपीटीसारख्या तंत्रज्ञानाने इंटरनेटच्या आधाराने बौद्धिक क्षमता न वापरताही काम कसे करता येते, याची झलक दाखवली आहे. आज (दि. 29) जागतिक इंटरनेट दिन. त्यानिमित्ताने…

सुमारे 54 वर्षांपूर्वी म्हणजेच 29 ऑक्टोबर 1969 रोजी इंटरनेटवरून पहिला संदेश पाठवला गेला. आज संपूर्ण जगभरातील बहुतांश लोकसंख्येचे इंटरनेटशिवाय पानही हलत नाही, अशी स्थिती आहे. इंटरनेटने जग जवळ आणले आहे. जगाच्या कोणत्याही कोपर्‍यात घडणार्‍या घटनेची माहिती एका क्लिकद्वारे झटक्यात मिळू लागली आहे. पूर्वी एखाद्या गोष्टीचे संदर्भ शोधायचे असतील, तर त्यासाठी पुस्तकांची संग्रहालये पालथी घालून शोध घ्यावा लागे आणि पुस्तकातील माहिती वाचून संदर्भ गोळा करावे लागत असत. आज इंटरनेटमुळे माहितीचा अजस्त्र स्रोत तर खुला झाला आहेच; पण, त्याचबरोबर मित्र-मैत्रिणींचे जाळे विणून ते अधिक घट्ट करण्यासाठीही त्याचा उपयोग होऊ लागला आहे.

संगणकाचा शोध लागल्यानंतर 1960 च्या दशकापर्यंत मोठ्या प्रयोगशाळा आणि संरक्षण संस्थांमध्ये संगणक वापरण्यात येत होते. संगणकाच्या मदतीने अवघड आकडेमोड करणे आणि महत्त्वाची माहिती पाठवणे, हा हेतू होता. मात्र, या माहितीचे हस्तांतर करणे जिकिरीचे होऊ लागले तेव्हा दूरवरच्या संगणकांना एका दुव्यात जोडणार्‍या नेटवर्कची गरज भासू लागली. या गरजेतूनच अमेरिकेत 1969 मध्ये 'अर्पानेट'चा उगम झाला. यातून सुरुवातीला लॉस एंजल्सचे कॅलिफोर्निया विद्यापीठ आणि स्टॅण्फर्ड संशोधन संस्था यांचे संगणक जोडण्यात आले. यातच पुढे, उराह विद्यापीठही समाविष्ट करण्यात आले. 'अर्पानेट'च्या कार्यक्षमतेपुढे, या नेटवर्कमधील सदस्यांची संख्या वाढू लागली. दर वीस दिवसाला एक याप्रमाणे 1981 पर्यंत 'अर्पानेट'नेटवर्कची संख्या 213 पर्यंत पोहोचली. 'अर्पानेट' म्हणूनच इंटरनेटची सुरुवात मानण्यात येते.'अर्पानेट'च्या कार्यक्षमतेपुढे इतरही देशांमध्ये अशाच तंत्रज्ञानाची गरज भासू लागली. 1974 मध्ये ब्रिटनमधील शिणि आणि संशोधन संस्थांना जोडण्यासाठी डएठउपशीं चा उदय झाला. यालाच नंतर 'जानेट' असेही संबोधण्यात येऊ लागले. यानंतर 'कॉम्प्युसर्व्ह', 'अमेरिका ऑनलाइन', 'फिडोनट' अशी अनेक नेटवर्क्स उदयास आली आणि यातून पर्सनल कॉम्प्युटरपर्यंत नेटवर्कची सुविधा मिळण्यास सुरुवात झाली. हीच इंटरनेटच्या उगमाची सुरुवात मानण्यात येऊ लागली.

अनेक नेटवर्क्स उदयाला आल्यामुळे या सर्व नेटवर्क्सना एकत्रित ठेवणारे 'नेटवर्क'असण्याची गरज निर्माण झाली. अशा प्रकाररचे नेटवर्क म्हणजे इंटरनेट, अशी संज्ञा 1974 मध्ये प्रथम वापरण्यात आली. 1980 च्या सुरुवातीला 'अर्पानेट' आणि 'एनएसएफ नेट' यांना जोडण्यात आले आणि या नेटवर्कला 'इंटरनेट' असे संबोधण्यात आले. याच तंत्रज्ञानाचा विकास होत इंटरनेट जगभर पोहोचले आणि 1992 पर्यंत इंटरनेट प्रत्येक सामान्य नागरिकांच्या बोटापर्यंत पोहोचले. इंटरनेटच्या उदयाबरोबरच असंख्य वेबसाईट उदयास आल्या. यामध्ये सर्च इंजीन्सनी आघाडी घेतली. सुरुवातीला 1995 मध्ये 'याहू' हे सर्च इंजीन अल्पावधितच लोकप्रिय झाले होते. मात्र, 1999 मध्ये 'गुगल'चा जन्म झाला आणि सर्च इंजीनवर गुगलचे साम्राज्य सुरू झाले. आजमितीला या व्यवसायातील 80 टक्क्यांपेक्षा अधिक व्यवसाय एकट्या 'गुगल'चा आहे. याशिवाय मायक्रोसॉफ्टचे 'रेडीफ', 'बिंगो', अशी सर्च इंजीन्स उपलब्ध आहेत. मात्र सहज आणि सोपी शैली, प्रचंड वेग यामुळे 'गुगल'ची लोकप्रियता सर्वोच्च स्थानी आहे. केवळ माहितीच्या हस्तांतरासाठी उदय झालेले इंटरनेट आता एक मोठा व्यवसाय बनले आहे. सर्वाधिक लोक वापरत असणारी आणि सहज उपलब्ध असणारी ही जगातील एकमेव सेवा आहे.

या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून नवे 'माहिती तंत्रज्ञान युग' अवतरले आहे. आधुनिक जगातील अर्थव्यवस्थांच्या विकासाच्या प्रक्रियेमध्ये इंटरनेटने किती मोलाचे योगदान दिले आहे, याचे उत्तम उदाहरण आज खुद्द भारतानेच जगापुढे मांडले आहे. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर म्हणजेच डीबीटीमुळे सरकारी योजनांमधील भ्रष्टाचाराला कशा प्रकारे भारत सरकारने कुलूप घातले आणि त्यातून किती हजारो कोटींची बचत झाली, याचे दाखले आपल्या डोळ्यांसमोर आहेत. वैयक्तिक आयुष्यात बँकिंग आणि अन्य आर्थिक व्यवहारांमध्ये आलेली सुलभता-पारदर्शकता आपण दररोज अनुभवत आहोत. हातातील स्मार्टफोनच्या साहाय्याने क्षणार्धात पैसे हस्तांतरित करण्याची सुविधा इंटरनेटमुळेच उपलब्ध झाली. कोव्हिड काळात तर इंटरनेटने अक्षरशः देवदूताची भूमिका बजावली. इंटरनेटमुळे आपले जीवनव्यवहार, भावनिक आयुष्य, शिक्षण, आरोग्य, अर्थकारण, समाजकारण, कृषिव्यवस्था अशा सर्वांना गुंफण घातली आहे.

इंटरनेट सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्याची सुरुवात 1980 च्या दशकात झाली. या प्रवासात इंटरनेट अनेक चांगल्या-वाईट अनुभवातून गेले. ई-कॉमर्ससारख्या वाढत्या व्यापाराच्या संकल्पनेमुळे इंटरनेट वरदान मानण्यात येऊ लागले. 'डॉट कॉम बबल' फुटल्यानंतर मात्र सर्वांनी इंटरनेटच्या नावानेच खडे फोडले होते; पण आज इंटरनेटमुळेच 'जग हे एक खेडे' हा जागतिकीकरणाचा मूलमंत्र खर्‍या अर्थाने मूर्त रूपात आला आहे. आज इंटरनेटच्या जगात एक मिनीट म्हणजेच 60 सेंकदात सर्वकाही बदलते. प्रत्येक मिनिटाला फक्त अमेरिकेत 380 नवी संकेतस्थळे सुरू होतात. फेसबुक, मेसेंजर आणि व्हॉट्स अ‍ॅपवर एका मिनिटात 71.6 दशलक्ष मेसेज फॉरवर्ड होतात. दर मिनिटाला ट्विटवर 87,500 ट्विट पोस्ट होतात. यूट्यूबही यात मागे नाही. यूट्यूबवरचे सक्रिय यूजर्स हे दर मिनिटाला पाचशे तासांचे नवीन व्हिडीओ अपलोड करतात. इन्स्टाग्रामवर दर मिनिटाला 6,95,000 स्टोरी शेअर होते. दर मिनिटाला गुगलवर 3.8 दशलक्ष सर्चिंग केले जाते. त्याचवेळी दर मिनिटाला फेसबुक, यूट्यूब आणि अ‍ॅमेझॉन या शब्दांचा सर्वाधिक सर्च होतो.

आता कमाईकडे जाऊ. गुगल हे एका मिनिटात 1,28,234 डॉलर कमावते. जी-मेलचा विचार केला, तर एका मिनिटात 232.4 दशलक्षपेक्षा अधिक ई-मेल जगाच्या कानाकोपर्‍यात पाठविले जातात. याहू आणि बिंगसारख्या सर्च इंजीनवर एका मिनिटात अनुक्रमे 3,52,134 तसेच 5,74,026 सर्च होते. याहूदेखील एका मिनिटात 9452 डॉलर कमावते. एका मिनिटात 7812 डॉलर बिंग कमावते. 2021 मध्ये नेटफ्लिक्सवर दर मिनिटाला 28,000 ग्राहकांनी त्याच्या अ‍ॅपवर काही ना काही पाहिल्याचे सिद्ध झाले आहे. एका मिनिटात डेटिंग अ‍ॅप टिंडरवर 20 लाख प्रोफाइल स्वाईप केले जाते. तसेच लोक सोशल मीडियाकडे केवळ टाइमपास म्हणून पाहत नाहीत, तर प्रोफेशनल नेटवर्किंगही करतात. म्हणून लिंकडेनवर दर मिनिटाला 9,132 नवीन कनेक्शन जोडले जातात. इंटरनेटवर किती शॉपिंग होते, याचा अंदाज बांधणे कठीण आहे. कारण 2021 मध्ये दर मिनिटाला इंटरनेटवर 16 लाख डॉलर खर्च झाले आहेत.

मानवी उत्क्रांतीच्या इतिहासात काही टप्पे असे मानले जातात, ज्यांनी मानवाचे आयुष्यच बदलून टाकले. उदाहरणार्थ, आगीचा शोध लागल्यानंतर मानवाचे आयुष्य बदलून गेले. चाकाचा शोध लागल्यानंतर जीवनाला गती मिळाली. इंटरनेटचा शोध लागला, तेव्हा हा शोध उत्क्रांतीच्या इतिहासातील महत्त्वपूर्ण टप्पा ठरेल असे कुणाला वाटलेही नसेल. सुरुवातीपासूनच या शोधाचा व्यावसायिक पैलू विकसित होण्यास सुरुवात झाल्यामुळे इंटरनेट आधी विकसित देशांची मक्तेदारी बनून राहिला होता. परंतु हळूहळू विकसनशील देशांच्या दिशेने इंटरनेटची पावले वळली आणि आता जगभरात इंटरनेट हा मानवी जीवनाचा एक महत्त्वपूर्ण पैलू बनून गेला आहे. सुरुवातीपासून इंटरनेटचा वापर केवळ इंग्रजी भाषेतून होत होता.

अनेक वर्षे इंग्रजी हेच इंटरनेटचे माध्यम राहिले. परंतु आता अनेक भाषांमध्ये इंटरनेटचा वापर करता येतो. अगदी स्थानिक, प्रादेशिक भाषांमध्येही इंटरनेट उपलब्ध झाले आहे. त्यामुळे हे माध्यम वापरणार्‍यांची संख्या अचानक अनेक पटींनी वाढली आहे. स्मार्टफोनच्या वाढत्या वापराने 'सर्च' अधिकाधिक स्थानिककेंद्री झाला आहे. म्हणजेच 'ग्लोबल' होता होता 'सर्च' आता 'लोकल' होऊ लागला आहे. भारतात स्मार्टफोनधारकांची वाढती संख्या हे त्यामागील महत्त्वाचे कारण आहे. याला एका अर्थाने इंटरनेटचे लोकशाहीकरण म्हणावे लागेल. आता येत्या काळात स्पीच रेकग्निशन तंत्रावर आधारित सर्च प्रोग्राम विकसित करण्यावर गुगलसह सर्वच टेक्नो कंपन्यांनी भर दिला आहे. इंटरनेटच्या वापरासाठी विशिष्ट भाषेचे ज्ञान असण्याची अपरिहार्यता यामुळे संपुष्टात येत आहे.

येणार्‍या काळात इंटरनेटचा वेग कैकपटींनी वाढेल, यात शंकाच नाही. पण त्याचबरोबर आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या आधारावर इंटरनेट सेवेत कोणकोणते बदल होतील, हे पाहणे रंजक ठरणार आहे. चॅटजीपीटीसारख्या तंत्रज्ञानाने इंटरनेटच्या आधाराने बौद्धिक क्षमता न वापरताही काम कसे करता येते, याची झलक दाखवली आहे. याकडे क्रांती म्हणून पाहिले जात असले तरी इंटरनेटच्या माध्यमातून मानवी मेंदूची विचारशक्ती, कल्पनाशक्ती, ग्रहणशक्ती कमकुवत करण्याची रणनीती तर आखली जात नाहीये ना, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे इंटरनेटच्या पोतडीतून येणार्‍या काळात कोणते आविष्कार जन्माला येतात, यापेक्षाही त्यांच्या वापराबाबतचे तारतम्य आणि विवेक न बाळगल्यास होणार्‍या हानीची चर्चा आज अधिक प्रमाणात होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news